फकिरा..
” हं ! ” फकिरानं होकार दिला आणि आत्तार एकदम नरमाईन बोलू लागला ,
” आरं , उन्हाच्या रनक्यात दगडाची लाही व्हतीया नि तुम्ही कुठं रं , पळताय ?
” आम्ही लस्कर बधाय जातूया … ” फकिरा म्हणाला आणि आतार पुन्हा चिडला , तो म्हणाला , ” काय बघताय रं , लस्कर ? त्याच्या वाटणीचं त्या इठूबाच्या बागेत जाऊन वानरं कान्हाय बघीत ?
” आमचं पाय भाजत्यात . ” फकिरा आवाज चढवून म्हणाला .
” मग मी काय करू ? ” आत्तार गुरकला .
” आमास्नी जाऊद्या .
” मग जा की ! ” आत्तारानं लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली . घोडं दुडक्या चालीनं निघालं .
आणि ती पोरं फासक्यातून पाखरं सुटावी, तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली. सडकेच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडांच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला. कुणी आंग टाकलं.
सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आंबराईत गोरे लोक लोळत होते . मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या . जागोजाग गोरे गार्ड बंदुकी घेऊन पहारा देत होते . त्यांचा तो विचित्र पोशाख , खाली गुडघ्यापर्यंत घागरे , लांब हाताचे डगले , लालभडक रंग , बसकी नाकं , गुबगुबीत गाल , चमत्कारिक आवाज -हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली . त्यांचा सारा शीण दूर झाला . ती हसू लागली .
एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला . त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकाळली ; काही दुगाण्या झाडू लागली . लष्करी शिपायांनी किंचित वळून त्याच्याकडे पाहिलं . तो छावणीत गेला . उशीर परत आला नाही . बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता .
बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला ,
” ह्यो बघ , त्यो शिगावचा बापू खोत . ह्येनंच राणूनानाला मारलं .
” त्याचे ते शब्द ऐकून फकिरा गंभीर झाला . त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले . त्यो हळू आवाजात म्हणाला , ” आबाला मारलं- ‘ त्याच्या आवाजात दु : ख , चीड यांचं मिश्रण झालं- ” आन आमचा गबरूबी मारला ‘ वजच्या मुळीवर बसत धम्या म्हणाला ,
” नुसता भुताच्या पोटचा हाय भडवीचा ! ”
” आनि ह्यो त्या सायबाचा मैतर हाय वाटतं ? ” बळी म्हणाला .
” मग ह्ये लस्कर बी खोताच्याच जातीचं असंल. ” घम्यानं शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला , ” आरं , असंल कसलं , हाईच ! …. “
मग नगं आमास्नी ह्ये लस्कर . निघू या ! ” फकिरा त्रागा करीत म्हणाला ,
इतक्यात खोत त्या मोठ्या सायबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेनं येऊ लागला . आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला . सारी पोरं भयभीत झाली .
सात पोरं एकाएकी गडप झाल्याचं लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला . जो तो पोरांना शोधण्यासाठी पळत सुटला . त्यांचे आईबाप रडत ओरडत धावू लागले . गलबला ऐकून राधा बाहेर आली . एकटा साधू पाहून तिनं विचारलं , ” साधू … फकिरा कुटंय ? ” त्यावर त्यानं फक्त ओठ उफराटा केला . तो काहीच बोलला नाही . राधाचंही काळीज हाललं . ती हाका मारीत निघाली . तोच दौलती आला . पोरं गेली – कुठं गेली – गलका वाढला . पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले . सावळा मांगही हातात कु – हाड घेऊन आला .
हा सावळा मध्यम उंचीचा , सडपातळ व मजबूत होता . हेकट , रागीट आणि सापासारखा डूख धरणारा , म्हणून ‘ डौखेल सावळा ‘ असं त्याला लोक म्हणत . तो बिलंदर, चोरटा , तसाच धाडसी पण होता . अंमलदार त्याला पाण्यात पहात आणि तो त्यांना . आसपासच्या सर्व डागीळ माणसांशी त्याची मैत्री होती . गुन्हेगार लोकांत त्याला बराच मान होता . चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी , असा त्याचा बोल असे . ऐट त्याला आवडत नसे . पण स्वतः मात्र तो फारच घमेंडखोरी करी . म्हणूनच त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव ‘ घमांडी ‘ असं ठेवलं होतं आणि हा घरात जे जे करी , ते ते सारं मांगवाड्यात फिरून घमांडी सांगे . घमांडी नाहीसा झाला , तो फकिराच्या नादानं कुठं गेला असावा , असं वाटून सावळा फकिरावर आणि दौलतीवर चिडला . भुवया चढवून , डोळे वटारून तो दौलतीला म्हणाला , “
” नाना , तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा .
हे ऐकून दौलतीही चिडला. इतक्या चढ्या आवाजात त्याला कुणीच बोलत नव्हता; पण आज सावळा बोलला, तेव्हा दौलती म्हणाला, ” तुझं चालीचं बाळ मला ठावं हाय . त्येच्या पायाला दावं बांधून लावून टाक. आरं, मूळचाच नायटा, त्येला बिघडाय कशाला पायजी?
” सावळ्याचं डोकं हे उद्गार ऐकताच अधिक फिरलं . तो तावातावानं पुढं सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला , ” असं बोलू नका . माझं पोर देवावानी हाय . माझ्या पोरानं काय चाल केली ? “
” मग आमच्या पोरानं तुझं पोर बिगडवलं कसं ? ” दौलती म्हणाला .
” हे कसं – कुटं परागंदा झालं ? “
” मग त्याला फकिरानं न्हेलं , हे खरं कशावरनं ? “
” तुम्ही त्येचा लाड करता “
आम्ही आमच्याचा लाड करतो . ” दौलती भडकला .
” तू तंडू नगं- “
एवढ्यात कोंडी महार महारकीतून परत आला . त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला , “ थांबा . एकमेकांवर येऊ नगा . मघाशी पाच सहा पोरं माळानं पळत गेली . त्यात घम्या साऱ्यांच्या पुढे उड्या मारीत व्हता .
” ऐकलंस ? ” दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले . आपण दौलतीवर उगाच गुरकलो , याची लाज वाटून सावळा हिरमुसला . तो गुमान चालू लागला . पण मनातून घम्यावर संतापला .
राधाचे भरलेले डोळे फकिराला धुंडू लागले. त्या अफाट माळानं येत असलेला फकिरा दिसावा, आपण त्याला उचलून पोटाशी धरावा , त्यानं आता उशीर करू नये – तिचं मन वेडं झालं . आईची वेडी माया , वेडे विचार करू लागली . ती तुपाप्रमाणे वितळली . तिची नजर तिच्यापुढं दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली . फकिरा लौकर दिसावा , म्हणून ती चरफडू लागली . ती एकदम थबकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकिराची पावलं पाहू लागली . तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली ,
” आतू .. , हे बघा माझ्या फकिराचं पाऊल . तो इकडंच गेलाय . “
” राधा , धीर धर . फकिरा कुठं जानार न्हाई . ” राहीनं तिची समजूत काढली .
त्या सर्वांनी पाहिलं लवण ओलांडलं . इतक्यात पुढून चंदू आत्तार आला . त्याला पाहून सर्व उभे राहिले . आत्तारानं विचारलं ,
” आरं , का धडपडताय ? कुठं निघाला ? “
” दुपारच्यानं पोरं कुठं गेल्याती … ” दौलती म्हणाला . “
कुठं जात्याती? गेल्याती लस्करी छावणीवर . ” चंदू हातातील लगामाशी चाळा करीत म्हणाला , ” मला आढळली ती . आता परतली असतील . ‘
” परतली , म्हंजी बरं झालं ! ” दौलती सुटकेचा निःश्वास टाकीत म्हणाला आणि चंदू मध्येच म्हणाला , ” मग कुटं जात्याती ? दौलूनाना , तो तुझा नातू वाटतं ? चांगलं पोर निपजलं बघ , बापासारखंच . आन् ही रडतीय , ती त्येची आई वाटतं ? आँ ? रडाय काय झालं ? त्यो काय छावणीवर हल्ला कराय गेलाय ? नाना – पोराला जपा . वाघ व्हईल , वाघ ! वाघाच्या पोटी वाघ जन्मतो , कोल्हा न्हाय . आणि ए सावळा , ते शेंडीवालं रत्न तुझंच का ? झ्याक हाय तुझ्यावानीच मरीआई ! ” हे ऐकून सारेच हसले . आत्तार पुढं गेला आणि सावळा चिडला .
त्यांनी तो माळ ओलांडला आणि ते राजेवाडीच्या माळावर आले . एकदम त्यांची गती मंद झाली . ती सात पोरं पुढं भन्नाट धावत येत होती . त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला .
चेहऱ्यावरची काळजी दर झाली . मग सर्वांनी माळाला बैठक दिली . तंबाखूच्या चंच्या सुटल्या .
पण राधा थांबली नाही . ती तशीच धावत पुढं गेली. अगदी धावत वाऱ्यासारखी. फकिरा वरमून जवळ आला. त्याला मटकन उचलून तिनं पोटाशी धरला . त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचा घाम पुसला. त्याच्या पायांची धूळ झटकली. तिचे ओठ थरारले, ” फकिरा, कुठं गेला व्हतास ? ‘
‘ लस्कर बधाय. ” फकिरानं आईकडे न बघताच उत्तर दिलं.
घम्या जवळ येताच . सावळानं नारळाएवढे दोन दगड उचलले . तो डोकीचं पागोटं मागं सरकवून म्हणाला,“ये लेका , तुला जिवंत मारतू .”
” आरं, आरं – थांब ! “
” सोडा , बहिरूदाजी. या भडवीच्याच आंगात सारी गोम हाय ! “
” आरं, पर मारून का व्हनार ? ” आप्पानं खेकसून विचारलं आणि सावळा रडकुंडीला येऊन म्हणाला, ” ह्येच्यापायी मी आज दौलूनानाला टाकून बोललो. मी आज ह्येला पुरूनच टाकणार ! मला सोडा गा “
गप बस . ” दौलती डोळे वटारून म्हणाला , “ पोर नि ढोर सारखं असतं . “
या दाबानं सावळा शांत झाला. पोरं जवळ आली. राधाकाकू आपल्याला मारू देणार नाही, याची त्या सर्वांना खात्री होती. मग सारे वाटेगावाकडे निघाले. घम्या मात्र हातधोंड्याच्या अंतरानं पाय ओढीत येत होता.
अंधारात पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली . पहिली ऊनऊन भाकरी घेऊन फकिरा व साधू घरात येऊन खात बसले . राहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता .
सर्वत्र सामसूम होती . भाकरी आणि चटणी चावीत चावीत आणि नाक फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला , “ लस्कर बघितलंस ? “
“ हो बघितलं , मर्दा .
” कसलं काय त्ये ? “
“ समदी गोरी मानसं . बंदुकी , तलवारी , घोडी- “
” ती नेसत्यात काय ? “
” आरं , तुमानी नि वर बुटावानी टोप्या . “
” मला न्हाय न्हेलंस ! टाकून गेलास . “
” साधू , लई पाय भाजलं . फोड आलंत पायाला माझ्या.
” ” जवातवा असंच म्हनतोस . रातचं कार्ट दिवसाचं फोड . मग आमास्नी
आतान्हाय आता न्हाय तसं म्हननार . “
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
