आमची आई समान सेवा करणारी… लहानपणापासून आमचं संगोपन करणारी… आमच्या वडिलांच्या पाठची बहीण विद्या उर्फ आक्का… हिच्या दिनांक १२ मार्च या स्मृतिदिनानिमित्त…
लग्नानंतर संसारात रमून तो पार करण्याचा बराच खटाटोप व प्रयत्न केला. मात्र, सासरची मानसं व नवऱ्याकडून होणारा जाच, हाल भावाला पाहावेनात. म्हणून, भेटायला गेलेल्या भावाने आक्काला माहेरी श्रीगोंदयात आणलं. साधारण तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचा हा कालखंड.. त्यानंतर भावाला व्यवसायात गड्यासारखी मदत केली. किराणा दुकान चालवल, भावाच्या भंगाराच्या धंद्याला हातभार लावला, अगदी बाई माणसाने गड्या सारख धाडस केलं, अनं स्वतःच्या पायांवरही उभा राहूनही दाखवलं..
अनेक वर्षे सण, सूद, भाऊबीज, लग्न, कार्य भावाने तिला सासरची आठवण होऊ दिली नाही. बराच काळ सासरचा लवलेश नसतांना, सन्मानाने जगत असलेल्या एका सकाळी ३१ डिसेंबर १९९९ रोजी नवरा वारल्याची खबर मिळाली. ज्या वाटेकडे पाठ फिरवली होती, त्या वाटेने जाण्याची पुन्हा एकदा वेळ आली. नवऱ्याची मयत झाली, अंत्यसंस्कार झाले. अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सर्व काही चित्रपटासारख डोळ्यासमोरून तरळून गेलं.

कल्याण वरून परत आले. पुन्हा दिनचर्या सुरु झाली.. जगण्याचा संघर्ष चालूच… रोजचा दिवस उगवत अनं मावळत होता..भावाच्या व्यापारातही अनेक स्पर्धक तयार झाले होते. चढता आलेख उतरू लागला.. मुलं मोठी होत होती.. शाळा.. शिक्षण.. संगोपन…आणि स्वतःच जगणं.. या सर्व प्रक्रियेत धिटाने भावाला आक्कानं साथ दिली.. जगण्याची पायपीट चालू होती.. अंतर्मुख होऊन जगणारी.. दुःख गिळून मौन असलेली आक्का… आजही मला आठवते…
२००८ साली उल्हासनगर येथील लांबच्या नातेवाईकांतील एका इसमाबरोबर अक्काची गाठ बांधली.. तिचा पुनर्विवाह करण्यात आला. यासाठी तिच्या आईची (मध्याई) इच्छा, बाकी सर्व घराचा या प्रक्रियेला विरोध होता.. विशेषता भावाचा.. समाजबांधव तसेच काही घरभावांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न पार पडले.
भलं घडवण्याच्या उद्देशाने टाकलेलं पाऊल चुकीच्या ठिकाणी पडलं.. माहेरी मिळत असलेली भाकरं आत्ता सासरी करपल्या सारखी लागू लागली. घरातील सर्व काम पूर्ण केल्यावरच तिला जेवण मिळायचे.. अनेक प्रकारे तिचे घरातील सावत्र मुलं, सुना छळ करत होते. दिवस – दीवस घरातील काम करून घेणे, धुनी भांडी करणे, घरातून हाकलून लावणे, शिवीगाळ करणे, वाईट बोलणे, जीवे मारण्याची धमकी देणे, तिच्या जीवनाची झालेली ही दुर्दशा मन सुन्न करणारी होती. असा जीवनक्रम चालू असतांना, तिने कधीही माहेरी कसलीही तक्रार केली नाही.
अशातच तिला कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रासले. श्रीगोंदा, उल्हासनगर… तीन, सहा महिन्यातून तिचे येणे जाणे चालू होते. मात्र, तिच्याबरोबर होणारा शारीरिक छळ ती कधीच माहेरी बोलली नव्हती. शेवटी श्रीगोंद्यातील नवले हॉस्पिटल मधून शरीरातील कर्करोग वाढत चालल्याचे समजले…
तिचा नवरा काय अंशी याबाबत तिची काळजी घेत होता. बाकी तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य, लहान – थोर तिला विरोध करत होते. यामुळे श्रीगोंद्यात उपचारासाठी तिला आणण्यात आलं. आनंदऋषी, नवले, घोडके हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आल्या. शेवटी तिच्या नवऱ्याने उल्हासनगर मधील एका खासगी रुग्णालयांमध्ये तिचे ऑपरेशन केले. परंतु, ऑपरेशन यशस्वी झाले नाही. शरीरातील कॅन्सरची वाढ सातत्याने होत राहिली आणि शेवटी तिला पुन्हा माहेरी आणण्यात आलं. दोन दिवस येईल, आपल्या जवळ आपल्या माणसात राहील, सुख आपलं अनं दुःखही.!! म्हणत…म्हणत.. मंग सुरू झाला कॅन्सरमुळ शरीरात उठणारा वेदनेचा आगडोंब.. होणारी तगमग.. ती रात्रीची उठून ओरडायची, तिला असह्य यातना होत होत्या, आंम्ही आयुर्वेदिक उपचाराचा प्रयत्न केला होता. मात्र, आक्काच्या वेदना कमी होत नव्हत्या.. साधारण सहा महिन्यापासून तिला हृदय पिळवटून टाकणाऱ्या या यातना सहन कराव्या लागत होत्या. रात्री-अपरात्री उठून ओरडायची, किंचाळायची.. घरातील सर्व महिला तिच्यापाशी बसून रहायच्या. आई, मध्याई, मनीषा, रेश्मा, पंचशीला, रुकाआत्या, उमा सर्व तिथेच थांबायचे. मात्र, तिचे दुःख वाटून घेता येत नव्हते. अगतिक त्रास सहन करावा लागत होता तिला.
अशातच एकदा तिच्या सासर कडुन मुलं, नवरा, नातेवाईक भेटायला आले. धावत आले नी धावत परत गेले. टाकणं टाकल्यागत… पुढे गेल्यानंतर काही दिवसातच आक्काने सासरी जाण्याचा हट्ट धरला. अशा परिस्थितीमध्ये वस्तीवरून दोन किलोमीटर गावात (श्रीगोंदयात) जाण्याची तिची परिस्थिती नव्हती. तीनशे किलोमीटरचा प्रवास करणं तर अशक्य बाब.. तरीही तीच्या आग्रहास्तव तिला उल्हासनगरला नेण्यात आलं. अमर, आई, रुकाआत्या, भैय्या तिला सोडवण्यासाठी गेले होते… तिथे गेल्यावर हीच परिस्थिती.. परंतु, फोनवर सर्व व्यवस्थित असल्याचे ती सांगायची, चतकोर भाकर खाऊन एक भाकर खाल्ली बोलायची…मरणापूर्वी तिने गावी श्रीगोंदयाला महंमद बाबांच्या यात्रेला यायचे असा फोन केला होता…पण, तेंव्हा ते शक्य नव्हते..
सासरी जाण्यापूर्वी तिला एकदा भयानक त्रास होऊ लागला. त्या त्रासात तिला जुन्या घटना आठवू लागल्या, त्यावर ती रडत, रडत… भावाला जवळ बोलवून म्हणाली… “भाऊ मला लय वेदना होत्यात.. आई बापानीं नुसता जन्म दिला रं…खरं जगण्याचा संघर्ष तू शिकवलास… अश्या अनेक जुन्या आठवणींना ती आठवून सांगत होती.. त्यामुळे सर्वांची मनं हेलावली होती.
या परिस्थितीमध्ये आठ – नऊ महिने त्रास सहन करत असतांना १२ मार्च २०२० रोजी ती एकटीच वेदना सहन करत, करत सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच जग सोडून गेली. १२ तारखेला सकाळी..सकाळी पंचशीलाकडं फोन करून आक्का मृत्यू झाल्याबाबत तिच्या नवऱ्याने सांगितले होते…
या लिखाणातून आक्काची आठवण होणे साहजिक आहे. आक्का ही माझी आत्या (वडिलांची बहीण) माझ्या वडिलांना भावाप्रमाणे साथ देणारी बहीण विद्या(आक्का) आम्हांला आईप्रमाणे संगोपन करणारी ठरली. तिला मूलबाळ नव्हतं म्हणून, तिनं आम्हांला मुलां प्रमाणेच वाढवलं. अनेक अडचणींमध्ये सुखात, दुखात तिने डोक्यावर पाटीतं भाजीपाला विकला आणि कुटुंबाला आर्थिक साथ दिली. म्हणून, आयुष्याभर येवढ्या जीवनकळा भोगूनही, अंतिम काळात अनंत दुःख, यातना, वेदना सहन करणाऱ्या आमच्या आक्का प्रती ही शब्द सुमनांजली अर्पण…
माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, माझ्या बहुजन समता पत्र वृत्तपत्राकडून भावपूर्ण आदरांजली…
आक्काचा जीवनप्रवास आणि शेवटचा कालावधी आठवला की, सुरेश भट यांची ‘इतकेच मला जातांना’ ही कविता मनांत घोंगावते….
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते…मरणाने केली सुटका…जगण्याने छळले होते…घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली…जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते…मी एकटीच त्या रात्री आशेने तेवत होती…ती विझली तेंव्हा सारेच उजळले होते…
