ब्रिक्सला अलविदा, एसटी कर्मचारीच धुणार गाड्या!

दिनांक १५ मार्च,मुंबई:

करोना विषाणुच्या पाश्वर्भूमीवर संपुर्ण जगात स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. स्वच्छतेचे आऊटसोर्सिंग करत करोडो रुपयांचे कंत्राट दिलेल्या ब्रिक्स कंपनीने समाधानकारक काम न केल्याने कंपनीला अलविदा करून एसटी महामंडळाने पुन्हा आपल्याच कर्मचार्‍यांना गाड्या धुण्याचे, स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी वरातीमागून घोडे अशी महामंडळाची अवस्था झाली आहे. दैनंदिन स्वच्छतेसाठी महामंडळाने ब्रिस्क कंपनीला 446 कोटी 99 लाख रुपयांचे ऑक्टोबर 2017 मध्ये कंत्राट दिले. 2020 पर्यंत हे कंत्राट आहे.

दोन वर्षापासून ही कंपनी राज्यात काम करत आहे.

स्थानके, आगार आणि गाड्या, कार्यालय स्वच्छ करण्याचे या कंपनीचे काम आहे. त्यासाठी कंपनीला पुरेसे मनुष्यबळ अत्याधुनिक यंत्र साहित्य वापरायचे आहे. मात्र कंपनीजवळ अपुर्‍या सुविधांमुळे एसटीची स्वच्छताच होत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले. अस्वच्छ गाड्यांमुळे एसटीची जनमानसातील प्रतिमा देखील मलिन झाली.

सध्या जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बसस्थानकांवर तसेच वाहनांमध्ये स्वच्छता राखण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यातच ब्रिस्क कंपनीने गाड्या धुण्याची सेवा बंद केली आहे. त्यामुळे जाग आलेल्या महामंडळाने आता आपल्या कर्मचार्‍यांना गाड्यांची स्वच्छता करण्यास सांगितले आहे.

त्याकरिता ज्या स्वच्छकांना ब्रिस्क कंपनीची सेवा सुरु झाल्यानंतर सहाय्यक अतांत्रिक म्हणून नेमणूक दिली होती, त्यांची नेमणूक रद्द करुन पुन्हा त्यांना स्वच्छक पदी नियुक्त करण्यात येणार आहे. याशिवाय गाड्या स्वच्छ करण्यासाठी स्थानिक पातळीवर बाह्य संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

ब्रिस्कला राजकीय पाठिंबा?

ब्रिस्क कंपनीला तोट्यातील महामंडळाने 446 कोटीचे स्वच्छतेचे कंत्राट देऊ केले होते. यामध्ये स्वच्छतेच्या विविध कामांसाठी दर दरविण्यात आले हाते. त्यामध्येही वर्षाला दहा टक्के वाढ देण्यात आली होती. ब्रिस्क कंपनीने अनेक विभागांंमध्ये क्रिस्टल या कंपनीला उपकंत्राट दिले. ब्रिस्क कंपनीचे स्वच्छतेचे काम असमाधानकारक असल्यामुळे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी ब्रिस्कचे बील थांबविले होते. परंतु राजकीय दबावामुळे ते बील अदा करण्यात आले होते.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading