दिनांक ४ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
महापुरुषांना नमन करून बसप उमेदवार ॲड. महेंद्र शिंदे यांच्या प्रचाराचा श्रीगोंद्यात शुभारंभ..
बसप संत महापुरुषांच्या विचारांवर चालणारा पक्ष- सुनील ओहोळ..
बहुजन समाज पार्टीच्या (बसप) श्रीगोंदा विधानसभेसाठी उमेदवार असलेले ॲड. महेंद्र शिंदे यांच्या प्रचाराची सुरुवात विविध महापुरुषांना नमन करून करण्यात आली. श्रीगोंद्याचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीला पुष्पचादर अर्पण करीत तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून हा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात बसपचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, श्रीगोंदा मतदारसंघात जे उमेदवार आहेत त्यात बहुतांश साखर कारखानदार आहेत, ज्यांनी शेतकरी व कामगारांचे शोषण केले आहे. अनेकांनी खाजगी कार्यक्रमांसाठी कामगारांचे वेतन कपात केले, वाहन मालकांचे भाडे अदा न करता आर्थिक संकट निर्माण केले. तसेच, शेतकऱ्यांचे पैसे बुडवून त्यांच्या कुटुंबांचे हाल केले आहेत. हे कारखानदार शिक्षण संस्था चालवत असले तरी त्या फक्त पैसे कमविण्याचे साधन म्हणून वापरल्या जात आहेत. त्यांनी शाळा, महाविद्यालये चालवून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण चालवले आहे, असेही ओहोळ यांनी नमूद केले.

ओहोळ यांनी शिवसेना व भाजपावर टीका करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पचविणे या पक्षांना अवघड आहे. हे पक्ष मराठवाडा नामांतराला विरोध करतात. या दोन्ही पक्षांनी केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.” याच विचारांच्या आधारे बसप बहुजन समाजाचे हित साधण्यासाठी काम करत असून येणाऱ्या निवडणुकीत महेंद्र शिंदे यांच्या विजयाने भूमिहीन, दलित, आदिवासी व अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे आश्वासन ओहोळ यांनी दिले.

या प्रचार प्रारंभाच्या कार्यक्रमाला बसप जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, उमेदवार ॲड. महेंद्र शिंदे, विठ्ठल मस्के, कानीफ बर्डे, भीमराव घोडके, शहानवाज शेख, उमाशंकर यादव, नितीन जावळे, अंबादास घोडके, सखाराम पालकर, दीपक घोडके, प्रमोद जाधव, रावसाहेब घोडके, डॉ. राम ससाने, संतोष साळवे, योगेश साळवे, काका साळवे, अशोक साळवे, त्रिंबक साळवे, आसाराम काळे, रावसाहेब इंगावे, दत्तात्रय सोनवणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)




