दिनांक ४ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावातील गरीब शेतकरी कारभारी धोडिंबा मदने यांची एका स्थानिक नेत्याने नोकरीचे आमिष दाखवून मोठ्या रक्कमेची फसवणूक केली आहे. मदने यांच्या मुलाने २०१५ साली डी.एडचे शिक्षण पूर्ण केले होते, याची माहिती मिळताच श्रीगोंदा तालुक्यातील नमुद नेत्याने मदने यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या शिक्षण संस्थेत मुलाला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलते.

नेत्याच्या संपर्कानंतर मदने यांना शिक्षण संस्थेच्या संचालकाने बोलावून घेतले. त्या ठिकाणी संचालकाने मदने यांना सांगितले की, “तुझ्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी चार लाख रुपये खर्च येईल.” गरिबीत दिवस काढणाऱ्या मदने यांनी घरातील सोनं-नाणं विकून व शेतीचे काही भाग विकून रक्कम गोळा केली. २०१५ साली साक्षीदारांच्या समक्ष मदने यांनी संचालकाला चार लाख रुपयांची रक्कम दिली.

रक्कम दिल्यानंतरही मदने यांच्या मुलाला नोकरी मिळाली नाही. मदने यांनी वारंवार मागणी करून मुलाला निदान क्लार्क म्हणून नोकरीत समाविष्ट करण्याची विनंती केली, पण संचालकाने खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेली. शेवटी मदने यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यांनी संचालकाला रक्कम परत देण्याची विनंती केली; परंतु संचालकाने उलट धमक्या देत मदने यांना अपमानित केले.
या घटनेमुळे मदने कुटुंब अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आहे. मुलाच्या भवितव्यासाठी रक्कम जमा करणाऱ्या शेतकऱ्याची श्रीगोंदा तालुक्यातील पुढाऱ्याने फसवणूक केली आहे. आता या प्रकरणात न्याय मिळावा, म्हणून कारभारी मदने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, फसवणूक करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या संचालकावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत ते माघार घेणार नाहीत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




