दिनांक १५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील मांडवगण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन समाज बांधवांच्या उपस्थितीत समाज मंदिरात मोठ्या आनंदात संपन्न झाला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे (जिल्हा प्रभारी) सुनिल ओहोळ व चळवळीतील कार्यकर्ते एन.डी.घोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुनिल ओहोळ यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाची माहिती नमूद केली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना प्राप्त झालेले ज्ञान त्यांनी सबंध मानवजातीला सांगितले. त्यानंतर त्या धम्माचे अनुसरण चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांनी अंगीकारले. तो दिवस अशोका विजयादशमी म्हणून ओळखला जातो. या महत्वाच्या दिनाला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण धर्मशास्त्रांच्या अभ्यासानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांचा मानवतावादी धम्माचा स्वीकार करण्याचा निर्णय १४ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी केला. व त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केली.
यावेळी लक्षावधी बांधवांनी हिंदू धर्माच्या जाचक रूढी, परंपरा झुगारून समता मूलक तत्त्वज्ञान असलेल्या धम्माचा स्वीकार केला. असे बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले. पुढे ते म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा जीवनसंघर्ष केला आहे. हिंदू कोडं बिल, पुणे करार सह भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अमूलाग्र क्रांतीबाबत ओहोळानीं उल्लेख केला. देशातील वंचित, शोषित, पीडित, दुर्लक्षित, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवांसह महिलांच्या प्रगतीचा आणि उन्नतीचा मार्ग घटनेत नमूद करून, सर्वांना न्याय देण्याचे काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे ओहोळ यांनी उपस्थितीतांना सांगितले.
या प्रबोधन कार्यक्रमामध्ये एन.डी.घोडके यांनीही धम्माबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मांडवगण पंचक्रोशीतील समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्रिसरण, पंचशील ग्रहण केले.
या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार दत्तू जावळे यांनी मानले. नमूद कार्यक्रमात संदीप चव्हाण, राजू घोडके (पत्रकार), धनंजय शिंदे, सिद्धार्थ घोडके, बाबा चव्हाण सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(सुनील ओहोळ)

