दिनांक २८ डिसेंबर, श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या व्यापक कारभारात आरोग्य, पाणीपुरवठा, वीज पुरवठासह वेगवेगळ्या विभागात प्रशासकीय सह ठेकेदारी पद्धतीने काम करणारी यंत्रणा आहे. ठेकेदारांकडे बहुतांश मागासवर्गीय प्रवर्गातील लोकं काम करतात. निवडणूक कालखंडात नगरसेवकांनी कामासाठी आश्वस्त केलेल्या लोकांची मोठी भरती या कंत्राटीमध्ये आहे. अशातीलच एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याला त्या विभागातील प्रमुखाने वैयक्तिक रोषापोटी कामावरून काढले आहे. कामावर रुजू करण्यासाठी तो पीडित रोज नगरसेवक व स्थानिक प्रशासनाकडे विनवणी करतोय. मात्र हे सर्व त्याची अवहेलना करीत आहेत.
मागील चार वर्षांपासून अक्षय राजू आठवले हा इसम श्रीगोंदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहे. या विभागातील प्रशासकीय पदाधिकाऱ्याने त्याच्या वैयक्तिक विषयाचा राग मनात धरून, अक्षय आठवलेला कामावरून हुसकावले आहे.
अनेक वर्षापासून उपजीविकेचं साधन असलेल्या नगरपालिका ठेक्यातील हे काम गेल्यामुळे अक्षय आठवले वर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा त्याने नगरसेवकांच्या माध्यमातून प्रशासनाकडे विनंती केली. परंतु, श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष अनं काही नगरसेवक आठवलेंना कामावर रुजू करून घेण्यासाठी उदासीन असल्याचे दिसत आहेत.
या सर्व प्रक्रियेतून एका साधारण ठेक्यातील कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून घेणे वरिष्ठ अधिकाऱ्यासह नगराध्यक्षांच्या डाव्या हाताचा मळ इतके साधारण काम असतांना, श्रीगोंदा नगरपालिकेत तर, राजकारणच उफाळून आलयं. या विषयी ज्या ज्या नगरसेवकांना विनवणी करण्यात आली. ते ते नगरसेवक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पालिकेच्या या कामगारांनी स्वच्छता करणे, खड्डे खोदने, विषारी औषधांची फवारणी करणे, फोगिंग करणे, गटारी काढणे, चेंबरमध्ये उतरणे, घनकचरा मधील जीवघेण्या वासात कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय काम करणे, अशी बहुतेक कामे करणारी सिद्धार्थनगर/ससानेनगर येथीलच लोकं आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने अनेकदा नगरपालिकेकडून कामं करून घेण्यात आली आहेत.
अशा कामामधून आठवले यांना विना सूचना हकालपट्टी केली जाते. त्यासाठी मागील तीन महिन्यांपासून अक्षय आठवले राजकीय व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांच्यापुढे हा विषय मांडत विनवणी करत आहे. बहुतांश यंत्रणा त्यांना टाळत आहे. ठेक्यात कामं करणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत जर, श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाची ही मानसिकता असेल..! तर, प्रशासनामार्फत रुजू असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे काय हाल असतील. याचा विचार न केलेलाच बरा.!
एकंदर श्रीगोंदा नगरपालिका ठेक्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा वापर करून घेत असल्याने, नमूद आठवले प्रकरणातून श्रीगोंदा नगरपालिकाचा जातीवादी चेहरा समोर आला आहे.
याप्रकरणी पालिकेकडे मागील तीन महिन्यापासून रखडलेला पगार द्यावा व कामावर हजर करून घ्यावे. अन्यथा दिनांक ३० डिसेंबर २०२१ पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन अक्षय आठवले यांनी वरिष्ठ कार्यालयासह प्रसिद्धीमाध्यमांना दिले आहे.
स्रोत:(निवेदन)
