श्रीगोंदा: शहरात आनंदाच्या नावाखाली अराजकता; राजकारण्यांची प्राथमिकता विकास प्रश्नांपेक्षा राजकीय शक्ती प्रदर्शनाकडे..?

दिनांक २९ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून सामाजिक उपक्रमांच्या नावाखाली तरुणांना व नागरिकांना भुलवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा नवीन फंडा राबविला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, विविध शक्तिप्रदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करून, तरुणांना यामध्ये झुलवण्याचा प्रयत्न होत आहे. विविध सेलिब्रिटींना आणि तारकांना शहरात आणून, डीजेच्या आवाजाच्या आणि प्रकाशाच्या सीमा ओलांडून कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन गटांमध्ये वाद होऊन डोके फुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत, तर काही मद्यपी तरुणांनी पोलिसांसोबत वाद घातल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

तथापि, सामाजिक कार्यक्रमांच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शक्तिप्रदर्शनाला अनेकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. दहीहंडी किंवा महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून आनंद साजरा करण्यात कोणाचाही विरोध नाही. परंतु, आनंदाच्या नावाखाली अराजकता माजवून, लोकांना आकर्षित करण्यासाठी कायद्याचे निकष बाजूला ठेवून, ध्वनी प्रदूषणाच्या थैमानाने शहरातील शांती भंग होत आहे. त्यामुळे, या प्रकाराच्या विरोधात लोकं प्रश्न उपस्थित करीत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. तालुक्यातील हजारो तरुणांना कामाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना, आणि तालुक्यातील रोजगाराचे मुद्दे आजही आ वासून आहेत. या समस्यांकडे लक्ष न देता, काही राजकारण्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शनाच्या तमाशाचा आधार घेतल्याचे दिसत आहे.

एकीकडे यकृत प्रत्यारोपणासाठी संघर्ष करणाऱ्या श्रीगोंद्यातील एका कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज असताना त्याच वेळी, लाखो रुपयांच्या डीजे समोर, हजारोंचा जनसमुदाय राजकारण्यांच्या आगामी निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शनाचा बळी ठरतोय का.? असा सवाल उपस्थित होत आहे.

या परिस्थितीत कोणत्याही नेत्याला किंवा पुढाऱ्याला त्यांच्या उपक्रमांबद्दल दोष देण्याचा उद्देश नाही, परंतु तालुक्यातील उपस्थित प्रश्नांकडे आणि लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, हे नेते मंडळींनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या महागड्या आनंदासोबतच सर्वसामान्यांच्या व्यथा, दशा आणि दुर्दशेकडे या नेत्यांनी कधीतरी डोकवावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading