दिनांक २८ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
नगर दौंड रस्त्यावर बाबूर्डी फाट्यावर आज सायंकाळी ६:०० ते ६:३० वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. समोर चाललेल्या दुचाकी चालकाने अचानक वळवल्यामुळे लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात लक्झरी बसचा चालक आणि दुचाकी चालक जागीच ठार झाले.
दुचाकी चालक बाबूर्डी घुमट गावातील होता, तर मयत झालेला बस चालक गुजरात राज्यातील असल्याची माहिती समजली आहे. दुचाकी चालकाच्या अचानक वळण्यामुळे बस चालकाने तात्काळ ब्रेक मारला, पण लक्झरी बसचा वेग जास्त असल्यामुळे बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर बस एका खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या भीषण अपघाताचा आवाज काही किमी अंतरावर ऐकू आला. स्थानिक व्यवसायिक व तरुणांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत, लक्झरी बसमधील सात ते आठ प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे, कारण हे ठिकाण अपघातासाठी संवेदनशील ठरले आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)





