दिनांक १४ मार्च,अहमदनगर:
टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटरर्सनीही याबाबत माहिती देण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश
अहमदनगर, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा अद्याप जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, जे नागरिक परदेशातून आले आहेत, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या,नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटरर्सनीही त्यांच्या स्तरावर या नागरिकांना आवाहन करावे आणि त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. आरोग्य यंत्रणानी अशी माहिती आल्यास संबंधितांची तपासणी करेल, असे ते म्हणाले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात यापूर्वीच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने सकारात्मक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटरर्स तसेच चित्रपटगृहांचे मालक- व्यवस्थापक यांची बैठक घेऊन यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी यावेळी उपस्थित होते.
(वृत्तसंस्था)
