परितक्त्या महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज – निवासी आयुक्त आर. विमला..

दिनांक १३ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर:

परितक्त्या महिलांना सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक अनेक समस्या भेडसावत असून, या महिलांना दान नव्हे तर संधी आणि सन्मानाची गरज आहे. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले.

शहरातील आम्रपाली गार्डन येथे आयोजित दोन दिवसीय ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’ या उपक्रमाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, दै. लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्रतिमाताई कुलकर्णी, विनायक देशमुख, नितेश बनसोडे, योगिता सत्रे, प्रवीण कदम तसेच *‘उमेद’*चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते.

मान्यवरांनी महिलांच्या उत्पादित मालाला योग्य पॅकिंग, ब्रँडिंग व बाजारपेठ मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा प्रशासनाकडून महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही आनंद भंडारी यांनी दिली.

प्रदर्शनात महिलांनी स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित हस्तकला, पारंपरिक व आधुनिकतेचा संगम असलेली उत्पादने मांडली. मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. हे प्रदर्शन १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

स्रोत:(DIO)

Leave a Reply