श्रीगोंदा नगरपालिकेच्या कारभारावर जनतेची नाराजी, नगरसेवकांवर आरोप.. विकासकामांच्या नावाखाली टक्केवारीचे राजकारण; निकृष्ट दर्जामुळे नागरिक मात्र त्रस्त..!

श्रीगोंदा नगरपालिकेच्या कारभारावर जनतेचा रोष; नगरसेवकांच्या पुनर्निवडीवर प्रश्नचिन्ह.. निकृष्ट दर्जाची कामे, टक्केवारीचा खेळ आणि अकार्यक्षम प्रशासनामुळे नागरिक त्रस्त..

(चार वेळा मोबाईल टावरच्या ऑप्टिकल फायबर पसरवण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते आणि कंपन्यांकडून मिळालेला मलिदा कोणा कोणापर्यंत पोहोचला.? फुटपाथची दुर्दशा कोणामुळे.? रस्त्यांची दुरावस्था कोणामुळे.? लक्षावधी रुपयांची पथदिवे बंद असण्यात कारणीभूत कोण.? घनकचऱ्याच्या व्यवस्थापनातील घोटाळा काय.? पाणी वाटपात होणाऱ्या चोरीचे कनेक्शन कोणाच्या विहिरीपर्यंत.? रस्त्यातील सिमेंट कोणी खाल्ले.? बायपासच्या रस्त्यावर दुरुस्ती करताना डांबर कुणी गिळले.? महात्मा फुले उद्यानातील अवैद्य प्रकाराचे सूत्रसंचालक कोण.?)..

दिनांक १२ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा :

श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना, शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रशासकीय प्रक्रियेद्वारे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत नसले तरी मतदारांच्या मनामध्ये एक प्रश्न सतत घुमतोय – याच नगरसेवकांना पुन्हा संधी का द्यावी?”

🔹 निवडणुकीत पुन्हा हजेरी लावणारे नगरसेवक:

कार्यकाल संपल्यानंतर बराच काळ बेपत्ता असलेले नगरसेवक आता चौकाचौकात, गल्लीबोळात पुन्हा दिसू लागले आहेत. चार-पाच समर्थकांसह “आम्ही किती मोठी कामे केली” असे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे. परंतु वास्तवात वेगळेच चित्र आहे.

🔹 निकृष्ट दर्जाची विकासकामे:

नागरिकांच्या आरोपानुसार, नगरपालिकेच्या हद्दीतील एकही विकासकाम गुणवत्ता राखून झालेले नाही.

  • रस्त्यांवर खड्डेच खड्डे, दुभाजकांमध्ये वेड्या बाभळींचे साम्राज्य,
  • महागडी पथदिवे बंद अवस्थेत,
  • सौरदिव्यांच्या प्लेट्स आणि बॅटऱ्या गायब,
  • फुटपाथची दुर्दशा,
  • महात्मा फुले उद्यानातील अनागोंदी आणि अवैध उद्योग,

हे सर्व प्रकार नगरसेवकांचा कारभार उघड करतायेत.

🔹 आरोग्य आणि स्वच्छतेचा बोजवारा:

फॉगिंग व जंतुनाशक फवारणीचा पूर्ण अभाव असल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साथीच्या रोगांनी थैमान घातले असून, रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, दवाखान्याचा वैद्यकीय कचरा आणि मोकाट फिरणारी जनावरे, नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहेत. नगरपालिकेच्या घंटा गाड्यांमधून पसरत असलेला दुर्गंध तर शहरभर रोगराई पसरवतोय.

🔹 टक्केवारीच्या खेळावरून नागरिक नाराज:

नागरिकांचा थेट आरोप आहे की, टक्केवारीच्या राजकारणासाठी ठेकेदार, नगरसेवक आणि अधिकारी संगनमत करून शासनाचा निधी गिळंकृत करत आहेत. घरकुल योजनेतील अनेक लाभार्थी वंचित राहिले, तर निवडक लोकांनाच लाभ दिल्याच्या तक्रारी आहेत.

🔹 उप मुख्यमंत्री येण्यापूर्वी तात्पुरते मुरुमीकरण:

उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये माती-मुरुम टाकून तात्पुरता दिखावा करण्यात आला. मात्र त्यामुळे शहरात अपघात व दलदल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

🔹 ज्वलंत प्रश्नांची मालिका:

  • महादजी शिंदे मुले ते काळकाई चौक दरम्यानचा सिमेंट रस्ता एवढ्या लवकर का खराब झाला?
  • सौरदिव्यांची साधने (बॅटऱ्या आणि सोलर प्लेट्स) कोणत्या भंगारवाल्याकडे विकली गेली?
  • ऑप्टिकल फायबरसाठी वारंवार खणलेल्या रस्त्यांचा पैसा कोणाच्या खिशात गेला?
  • घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचार कोणाचा?
  • पाणी चोरीचे कनेक्शन कुणाच्या विहिरीत?
  • उद्यानातील अवैध उद्योगाचे सूत्रधार कोण?

हे प्रश्न नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत.

या परिस्थितीमुळे तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट करावे की, “जनतेचा निधी गिळंकृत करणाऱ्या नगरसेवकांना उमेदवारी देणार नाही,..!

जेणेकरून सर्वसामान्यांच्या विकास कामाचा निधी गिळंकृत करणाऱ्या भस्मासुरांना आळा घालता येईल. अन्यथा “पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण धनदांडग्यांसाठी हिताचे आणि लोकशाहीसाठी घातकीचे ठरेल..” असे बोलले जात आहे..

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading