लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार..! सरपंच सौ.मनिषा नाहाटा यांना अपात्र ठरविण्याची मागणी..

श्रीगोंदा, दि. २८ ऑगस्ट २०२५:

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीचे प्रत्यक्ष कारभार पाहणारे बाळासाहेब नाहाटा आणि ग्रामसेवक प्रवीण कराळे यांच्यावर करण्यात आला आहे. सरपंच मनिषा बाळासाहेब नाहाटा यांना अपात्र ठरविण्यासह ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे, ॲड. बाळासाहेब काकडे, अजित काकडे, संतोष गोरखे यांनी केली.

या पत्रकार परिषदेला लोणी व्यंकनाथ गावातील दादासाहेब मडके, संदीप डांगे, रविंद्र डांगे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

भ्रष्टाचाराचा लेखाजोखा उघड..

पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेल्या अहवालानुसार, लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक वनीकरण क्षेत्रातील वृक्षतोड कोणतेही टेंडर न काढता करण्यात आली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. वृक्षतोड ठेक्याच्या बदल्यात बाळासाहेब नाहाटा यांनी गणेश साके यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये कमिशन स्वीकारल्याचा फोन पे व्यवहाराचा पुरावा सादर करण्यात आला.

याशिवाय,

  • ग्रामनिधीतील अनियमितता: २६,२७,३८३ रुपये
  • पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता: ५२,७८५ रुपये
  • बाजार लिलाव भ्रष्टाचार: १,७३,००० रुपये
  • चौक सुशोभिकरण खर्च: ७,२०,००० रुपये (काम न झाल्याचे आरोप)
  • सदस्य बोर्ड लावण्याच्या नावाखाली दोन वेळा: ८०,५०० रुपये काढल्याचे नमूद.

या सर्व बाबींचा सविस्तर चौकशी अहवाल पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला.

“पती-पत्नी पुण्यात, कारभार गावात”

राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब नाहाटा हे ग्रामपंचायतीचे सदस्यही नसताना कारभार सांभाळत आहेत. त्यांच्या पत्नी मनिषा नाहाटा या सरपंच असून पुण्यात वास्तव्यास आहेत. या परिस्थितीत ग्रामपंचायतीतील प्रशासनिक कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप काकडे यांनी केला.

सरपंच अपात्रतेची आणि ग्रामसेवक बदलीची मागणी..

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा संपूर्ण कारभार नाहाटा यांच्याद्वारे चालविला जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या भ्रष्टाचारात थेट सहभाग असल्याने सरपंच मनिषा नाहाटा यांना अपात्र ठरवून भ्रष्टाचारात हातभार लावल्याने ग्रामसेवक प्रवीण कराळे यांची बदली करण्याची मागणीही करण्यात आली.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार”

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या श्रीगोंद्यात सभेसाठी येणार असून या वेळी त्यांची भेट घेऊन लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार असल्याचे राजेंद्र काकडे यांनी स्पष्ट केले. “गावातील कारभारातील गैरव्यवहाराविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही ठाम आहोत,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्रोत:(पत्रकार परिषद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading