दिनांक ३० मार्च २०२५,श्रीगोंदा:
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचा जागर घालण्यासाठी पेडगाव येथील धर्मवीर गडावर बलिदान सप्ताह समितीच्या वतीने २६ मार्च ते २९ मार्चदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, कीर्तन, पोवाडे, पादुका पूजन यांसारख्या संस्कारक्षम व राष्ट्रभक्तीला प्रेरित करणाऱ्या गोष्टींचा समावेश होता.

धर्मवीर गडाला ऐतिहासिक महत्त्व असून, वढू बुद्रुकप्रमाणेच येथेही छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी शौर्यस्तंभ उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच बहादुरगडचे नामकरण ‘धर्मवीर गड’ करण्यासाठी शासनाने त्वरित अध्यादेश काढावा, अशीही मागणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आली.

बलिदान सप्ताह समितीची स्थापना व प्रेरणा
या कार्यक्रमाच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समितीची स्थापना करण्यात आली असून, संत मनोहर मामा भोसले यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय बलिदान आणि शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

या सप्ताहातील विविध कार्यक्रमांना अनेक मान्यवर उपस्थित होते. यात धनाजी साखळकर, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, अनिकेत भाऊ घुले, आप्पासाहेब सोनवणे, अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे, नरेंद्र सांगळे, शेखर मोडक, अमित मोहिते, माऊली चव्हाण, अशु ढावळे, आकाश फुले, ओंकार धावडे, ऋषिकेश पोमण, अक्षय पवार, भूषण खामकर आदींचा समावेश होता.

या उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा जागर संपूर्ण समाजात पोहोचण्यास हातभार लागणार असून, युवा पिढीला त्यांचा आदर्श घेण्याची संधी मिळणार आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
स्रोत:(पत्रकार परिषद)

Advertise…
