गायीच्या दुधाला सरसकट १० रु. लिटर अनुदान व दूध पावडरला प्रति किलो ५० रु.अनुदान शासनाने द्यावे.

दिनांक २० जुलै,श्रीगोंदा:

महाराष्ट्रामधील शेतक-यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन,बाजरी, बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतक-यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतक-यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या काळामध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये १५० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी ३० लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. ३० लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.

या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतक-यांना व दुध उत्पादकांना शासनाने वा-यावर सोडले आहे.

गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी बांधव आमदार बबनराव (दादा) पाचपुते साहेब यांचे मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट २०२० रोजी दुध संकलन बंद आंदोलन करीत असल्याबाबतचे निवेदन आज श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री, दुग्धविकास मंत्री. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार याना पाठविण्यात आले यावेळी युवा नेते विक्रमसिंह बबनराव पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष उमेश बोरुडे, भाजपा शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, नगरसेवक सुनील वाळके, संतोष क्षिरसागर, कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे, सोशल मिडिया चे महेश क्षिरसागर उपस्थित होते.

(स्रोत:संदीप नागवडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading