बलुतं.
करतो . पुण्या – मुंबईच्या चोखंदळ श्रोत्यांपुढं असं आपण केव्हाच गांगरलो नसतो , पण ज्यांनी मला मराठी कविता शिकवली त्या सरांपुढं व ज्या महाळकरांनी आम्हाला मायेचा ओलावा दिला त्यांच्या पुढ्यात साहित्यावर कसं बोलावं , हा प्रश्न पडलेला . शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे , ही सभागृहाला नवीन माहिती . अर्थात तास – दीड तास मी श्रोत्यांना वेगळ्या जगात नेलं , एवढं मात्र खरं . मी अनेक कार्यक्रम केले ; पण ह्या कार्यक्रमाचा सुगंध मात्र बराच काळ माझ्या मनात रेंगाळत राहिला .
मुंबईत आल्या आल्या नोकरी लागणं शक्य नव्हतं . आईला पुन्हा कामाच्या घाण्याला जुंपणं क्रमप्राप्त होतं . आई कावाखान्यातील बाकीच्या बायांबरोबर मार्केटमध्ये कागद वेचायला जायची . तशी ह्या धंद्याला भांडवलाचीही गरज नव्हती . कागदाचं ओझं घेऊन आई रात्री दमूनभागून घरी यायची . बोहऱ्याच्या दुकानात कागदाच्या पिशव्या करायला हे कागद विकले जात . कावाखान्याच्या पाठीमागेच कागद विकत घेण्याचं गुदाम होतं . तिथं जुन्या चिंध्याही विकत घेत . आजुबाजूच्या बायांना नेमकं माहीत असे , की लोखंड कुठं विकावं , काच कुठं विकावी , तर तांब्या – पितळेचे तुकडे कुठं विकावेत . आई घरी येताना खाऊसुद्धा मजेशीर घेऊन येत असे . केकचा भुगा किंवा बिस्किटचे तुकडे कुठं स्वस्त मिळतात , हे तिला नेमकं माहीत होतं . हॉटेलात वापरलेली चहाची पत्ती पुन्हा वाळवीत . ती स्वस्त मिळे . हाच चहा घरात व्हायचा . आई मार्केटमध्ये कागद वेचायला जाते , याची मला कमालीची शरम वाटत असे . साले , आपण एवढं शिकलो . अजूनही आईच्या कष्टावर जगतो . आणि आईचं काम काय , तर कागद वेचणं . समाजात कोणती प्रतिष्ठा ? माझ्या मनात ह्या प्रतिष्ठेच्या कल्पना शिक्षणामुळे निर्माण झालेल्या . भोवताली ह्या प्रतिष्ठेच्या कल्पनेची कुणालाच क्षिती नव्हती . दु : खाची जाणीव नसलेलं त्यांचं आयुष्य बिनधास्त चाललेलं आणि मी मात्र एकटा पोखरत चाललेलो . झाडाला वाळवी लागावी तसा .
एम्प्लॉयमेंटच्या पायऱ्या चढत होतो . उतरत होतो . निराश मनानं घरी परतत होतो . शेड्यूल्ड कास्टची वेगळी लिस्ट असायची . आजच्यासारखी बिकट अवस्था त्या वेळी नव्हती . कॉलही यायचे ; पण इंटरव्हयूमध्ये माझी दांडी उडायची . अलिशान कचेऱ्या , ऑफिसे . खाली मखमली गालिचा . लालचुटूक ओठांनी ‘ हॅलो ‘ कुजबुजणारी रिसेप्शनिस्ट दारातच . हे जग स्वप्नासारखं वाटायचं . वस्तीचं जगमात्र खूपच भिन्न . तिथं शिव्यागाळ्या , गोधड्या आणि दगडी कोळशाचा गुदमरून टाकणारा धूर . घरात गचपण . पोट – भाडोत्री . फाडफाड इंग्रजी काही मला बोलता यायचं नाही . कुठलाही प्रश्न विचारला , तर ‘ येस किंवा ‘ नो ‘ एवढंच बोलता यायचं . इंटरव्हयूला दरदरून घाम फुटायचा .
एकदा तर पोलिस कमिशनरच्या ऑफिसमध्ये नोकरीच्या इंटरव्हयूसाठी जावं लागलं . वातावरणात कडक , पोलादी शिस्त . आपली पाळी येते तेव्हा बघतो , तो करड्या मिशीतील , मिलिटरी रुबाबातील व्यक्ती बसलेली . इंग्रजीतून आडवे – तिडवे प्रश्न . चांगले मार्क पाहून हे माझं मार्कलिस्ट नाही असा त्यांना संशय आलेला . ते लेफ्टराइट घेतात . मी शपथेवर सांगतो आहे , की हे माझंच मार्कलिस्ट म्हणून . माझी आई मोलमजुरी करते आहे , मला नोकरीची किती आवश्यकता आहे , हे डोळ्यांत प्राण आणून ऑफिसरला सांगतो आहे . ऑफिसर मात्र माझी प्रच्छन्न टवाळी करतो आहे . माझा चेहरा रडवेला . कारकुनाच्या नोकरीला कसे आपण लायक नाही , हा ऑफिसरचा अभिप्राय ऐकून मी पुरा खचलेला . बाहेर पडतो , तेव्हा मनात कमालीची घुसमट वाढलेली . कुणी पाहणार नाही अशा एकांतात जाऊन रडावंसं वाटत असतं . अशीच दांडी उडाली ती आकाशवाणीत टायपिंग येत नाही , हे कारण सांगितलं गेलं तेव्हा .
रिकामा वेळ खायला उठायचा . वाचनाचा लहानपणापासून नाद होताच . पण हवी ती पुस्तकं मिळायची नाहीत . अन्नाची जेवढी भूक लागायची , तेवढीच वाचनाची लागायची , वाचनाची भूक , थोडीशी का होईना भागविली ती नेबरहूडमधील लायब्ररीनं . कावाखान्या शेजारीच रस्ता ओलांडला की भलं मोठं चर्च होतं . त्या चर्चला लागून मिशनरी मंडळींनी चालविलेली लायब्ररी होती . राव नावाचा लायब्रेरियन होता . त्याच्याशी घसट वाढविली . तो हवी ती पुस्तकं घरी वाचायला देई . मला फी पडत नसे . अर्थात ती परवडणारी नव्हती . पाच – सहा महिन्यांत तेथील पुस्तकांचा फडशा पाडला . सर्वांत वेड लावून गेला तो शरश्चंद्र . त्यांचा श्रीकांत वाचून तर पुरा झपाटलो . श्रीकांतची मानसिकता , का कुणास ठाऊक , खूपच जवळची वाटली . असंच चटका लावून गेलं ते ‘ व्होल्गा ते गंगा ‘ हे राहुल सांकृत्यायनचं पुस्तक . रसेलचं नीतिशास्त्र इथंच वाचलं . मराठी कवितांना माझ्याशिवाय कुणीच वाचत नव्हतं . उमर खय्यामच्या भाषांतरित रुबाया गुणगुणणं हा माझा आवडता छंद . मराठीच्या एवढ्या प्रचंड भांडारात आज काही कादंबऱ्या लक्षात राहिल्यात . ह्या कादंबऱ्या मराठी समीक्षकांनी केव्हाच डोक्यावर घेतल्या नव्हत्या . डॉ . रंगनाथ देशपांडे यांची ‘ आग्या मोहोळ ‘ आणि मनोहर तल्हार यांची ‘ माणूस ‘ . ह्या कादंबऱ्यांतून बहुधा आपल्या जीवनाचं तर चित्र उमटत नसावं ना , म्हणून ह्या कादंबऱ्या आवडल्या असाव्यात .
लहानपणी पाहिलेला कावाखाना आणि ह्या वेळचा कावाखाना ह्यात सांस्कृतिक दृष्ट्या काहीच बदल झाला नव्हता . मावसचुलत्यांची आर्थिक परिस्थिती मात्र थोडी फार सुधारलेली होती . एक मावसचुलता बर्मा शेलमध्ये नोकरीला होता . मी त्यांना बाबा म्हणायचो . अडल्यानडल्यांना व्याजानं पैसे द्यायचे . त्यामुळे त्यांच्याकडं नेहमीच पैसे खुळखुळत असायचे . बोलण्यात रुबाब असायचा . बोटात सोन्याच्या अंगठ्या . घड्याळही झळकायचं . बायकोच्या अंगावर दागिन्यांची , नथ , वज्रटीका ह्यांची रेलचेल . पण हे फक्त सणासुदीला दिसायचं . ह्यांच्याकडे पैसा जरी होता , तरी बायको मात्र सकाळ झाली म्हणजे लंकेची पार्वती होऊन इतर बायकांबरोबर कागद वेचायला जायची . मला खूपच कोडं पडायचं . गरज नसताना काकुंना कागद वेचायला का पाठवतात , हा प्रश्न सतावायचा . यांचा मुलगा माझ्यापेक्षा एक – दोन वर्षांनी लहान होता . नववी दहावीत असावा . आपला बाप लोकांना कर्जानं पैसे देतोय हे मात्र ह्या मुलाला आवडायचं नाही . आमच्या दोन्ही – तिन्ही रूम्सच्या भाड्याच्या पावत्या मात्र बाबांच्या नावावर फाडल्या जायच्या . आम्ही खरं म्हणजे कायद्यानं त्यांचे पोटभाडोत्री होतो . आपल्या नावावर भाड्याची पावती असावी असं वडील किंवा तात्या ह्यांना केव्हाच वाटलं नाही . ह्यामुळं मात्र एक झालं , सारी कुटुंबं बाबाला बिचकून असायची . काकूला आम्ही खोलीत राहावयास आलो हे आवडलेलं नसतं . पण बाबांच्या धाकानं बहुधा तिचा विरोध चालायचा नाही . आजीला रात्री चहाची तलफ यायची . आजीची ही खूप जुनी सवय . म्हणतात की , चहाच्या तलफेकरिता ती शंभर रुपयांची नोटही मोडण्यास पूर्वी मागंपुढे पाहत नव्हती . पण आता वार्धक्यात तिची चहाची तलफ बाबाच्या घरी भागत असे . रात्री घरी चहा बनवत नसत . बाहेरवाल्याला ऑर्डर दिली जायची . हे बाहेरवाल्याचं खूपच फॅड होतं . चांगलं कोरड्यास नाही , तर मागव खिमापाव , आजीला रात्री झोपण्यापूर्वी चहा मिळणं म्हणजे जेवण मिळाल्यासारखं वाटत असे . चहा पीत असताना आजीच्या गप्पा चालत . त्या वेळी ह्या दोन्ही भावांनी गावाला इंग्रजी कौलांचं माडीचं घर बांधायला काढलेलं . सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात आजी म्हणते , “ महा दगडूही असंच माडीचं घर बांधील ! ” ह्यावर बाबा कुचेष्टेनं बोलतात , ” त्याला म्हणावं , तोंड धुऊन ये . घर बांधणं हे काय खायचं काम आहे ? लगीन पाहावं करून आणि घर पाहावं बांधून , म्हणतात हे काय उगीच ? ” मी हे सारं ऐकत असतो . माझा अपमान मी सहन करत नाही . पण झालेला अपमान चेहऱ्यावर न दाखवता हसत हसत मी म्हणतो , “ हे पाहा , बाबा , तुम्ही मुंबईला आलात , तेव्हा हमाली करत होता . आणि आज मी शिकून – सवरून आलो आहे . मला नोकरी लागेल ती मुळातच महिना तीन – चारशे रुपयांची असेल . तेव्हा मी घर बांधणार नाही , असं काही समजू नका . ” हे त्या वेळी मी भावनेच्या ऊर्मीत बोललो हे खरं ; पण आज मलाच माझ्या बोलण्यातला फोलपणा कळलेला आहे . घर बांधणं तर दूरच राहो , पण वडिलोपार्जित घरही मी दुरुस्त करू शकलो नाही . ह्या मुंबईत स्वत : च्या मालकीचा एखादा फ्लॅटही घेऊ शकलो नाही . आजही पत्र्याच्या भिंती असलेल्या घरात राहतोय . तात्याच्या वेळची असलेली रुपयाची किंमत आज नगण्य झाली आहे . संसाराची भोक बुजवताना आज मी थकलो आहे . नोकरी मिळवताना जसा मी थकलो होतो , तसाच . भाड्याची का होईना डोक्यावर सावली मिळावी , म्हणून किती मनस्ताप मी भोगला , कुणाकुणाकडे कितीदा तोंड वेगाडलं .
दादासाहेब आमदार होते तेव्हाची गोष्ट . बायको म्हणायची , ” साहेब तुमच्या ओळखीचे . एवढं साधं काम ते करू शकणार नाहीत काय ? ” मनातला ताठा सोडून तेव्हा त्यांच्याकडे गेलेलो . त्यांनी दुसऱ्या दिवशी आमदारनिवासावर सकाळीच बोलावलं . सकाळी गेलो , तर त्यांना एका बड्या अधिकाऱ्यानं ‘ सारंग’मध्ये ब्रेकफास्टला बोलाविलेलं . मला ते म्हणाले , ” तू माझ्याबरोवर चल , पण खाली थांब . मी लगेच दहा – पंधरा मिनिटांत येतो . ” मी ‘ सारंग’पुढील उसळत्या समुद्राच्या लाटा पाहत उभा राहिलो . साहेब खाली येतात , तो ते एकटे नसतात . बडे अधिकारी सोबत असतात . साहेब आता मला विसरून गेलेले , बड़े अधिकारी सोबत असल्यामुळं बहुधा त्यांची गोची झालेली . ते अधिकाऱ्याच्या गाडीत बसून माझ्या समोरूनच भुर्रकन जातात . मी गाडीकडे वेड्यासारखा बघत असतो . एवढी वर्ष झाली ; पण हा प्रसंग विसरू शकत नाही . एकांतात आठवण आली की ठसठसतो .
सुट्टीच्या दिवशी आजुबाजूच्या घराघरांतून जुगाराचे अड्डे बसत . जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिली , म्हणून घरमालकांना जागेच भाडं म्हणून सईन मिळे . केव्हा केव्हा घरावर पोलिसांच्या धाडी पडत . तेव्हा कायद्याच्या कचाट्यातून सोडवून घेण्याकरिता त्यांना पळता भुई थोडी होई .
माझ्याच गावच्या महादूची आठवण येते . हा एक नंबरचा जुगारी . त्याला जुगारीत पैसे उडविण्याचं विलक्षण वेड . हा मात्र कधी काम करताना दिसत नसे . पुढे हा मुंबईतून तडीपार झाला . चोऱ्या करणं हा याचा मुख्य व्यवसाय . ह्या माणसाची मला खूपच गंमत वाटायची . ह्यानं केव्हाच मोठी चोरी केली नाही . छत्र्या , दोरीवरची पातळं , अशा मामुली चोऱ्या हा करायचा . चोऱ्यांची जंत्री ह्याच्या खात्यावर जेव्हा प्रमाणापेक्षा वाढते तेव्हा त्याला गावी तडीपार केलं जातं . गावालाही हा पोरासोरांना जमवून जुगारीचा डाव मांडायचा . ह्याच्याशी बोलण्याचा प्रसंग येई , तेव्हा तो खूप छान बोलायचा . अनुभवाचे खूप किस्से सांगायचा . वाटायचं , एवढा चांगला माणूस चोर कसा असू शकेल ? पण खरी वस्तुस्थिती त्याच्या तोंडावर व्यकत व्हायची नाही , एवढं मात्र खरं . दिवसाचा जुगार आणि कावाखान्यात भगत घुमविणे हा या मंडळींचा आवडता उद्योग .
भगताच्या घुमणाऱ्या आवाजानं सारं वातावरण भीतिदायक होऊन जायचं . ह्या भगतांत वेगवेगळ्या प्रकारची भगत मंडळी येत . काही विस्तवावर चालणारे , तर काही जळती कापराची ज्योत गपकन गिळणारे . त्यांच्यापुढं रिंगण भरलेलं . रोग्याला ‘ झाड ‘ म्हणत . झाडाला ते सपासप वेताने मारत आहेत आणि झाड काळीज गोठविणाऱ्या आवाजात किंचाळत आहे , असंच दृश्य मनावर उमटलेलं . पुढं जाऊन त्यांना काही
क्रमशः
(स्रोत:बलुतं या दया पवारांच्या पुस्तकांतून)
