शासकीय आदेशाची पायमल्ली करणाऱ्या ग्रामसेविका सुरेखा कुसाळकर यांच्या बदलीसाठी उपोषण..
दिनांक २७ जुलै, श्रीगोंदा:
तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुरेखा कुसाळकर यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचानींच श्रीगोंदा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. मात्र, (विस्तार अधिकारी) कैलास जगताप यांनी (गटविकास अधिकारी) प्रशांत काळे यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करून, आंदोलकांच्या अपेक्षित मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी उपस्थित असलेले ग्रामस्थ हे कुसाळकर यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज असल्याने आक्रमक झाल्याचे पाहण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेविका सतत गैरहजर राहत आहेत, त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी त्या ग्रामपंचायती मध्ये येतात व मनमानी पद्धतीने निघून जातात, शासकीय कामांमध्ये हलगर्जीपणा करत आहेत, आत्तापर्यंत गावांमध्ये covid-19 ने १० ते १२ लोकं मयत झालेली असतांना, परस्पर सरपंचानां विश्वासात न घेता शासकीय कामं किंवा अजेंठावर अर्ज देणे कामी सहीसुद्धा घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोना महामारी संदर्भात आजपर्यंत कसलीही दक्षता कमिटी त्यांनी स्थापन केली नसल्याने त्याबाबत सभेत साधी चर्चा सुद्धा करण्यात आलेले नाही. साथ प्रादुर्भावामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेविका गावामध्ये असणे बंधनकारक असतांना त्या गैरहजर राहिल्या. Criminal charges will be filed against public servants and casteist leaders for dereliction of duty ..!
त्यांना याबाबत लेखी व तोंडी विनंती अर्ज देऊनसुद्धा त्यांच्या कामात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे काल दिनांक २६ जुलै रोजी श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेविका सुरेखा कुसाळकर यांची बदली होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निश्चय करण्यात आला. परंतु, स्थानिक पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नमूद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
या आंदोलना बरोबरच गावठाण जागेत केलेले अतिक्रमण नियमित करणे व कर आकारणी नोंद लावणेबाबत ग्रामसेविका सुरेखा कुसाळकर यांच्याकडे अनेकदा अर्ज करूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नसून, शासनाचा आद्यादेशच पायदळी तुडवला जात असल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. याबाबत आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सूचना देऊनही, पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश पत्रकं ग्रामपंचायतला देऊनसुध्दा कुसाळकर मॅडम आकारणीसाठी व नमूद कारवाईसाठी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करत होत्या. याप्रकरणीही त्यांची बदली व्हावी. म्हणून, कचरू गंगाराम लष्करे, सुरेगाव ता. श्रीगोंदा हेही नमूद आंदोलनात सक्रिय होत आमरण उपोषणासाठी बसले होते.
नमूद आंदोलनामध्ये सौ. मंगल प्रसाद रामफळे (सरपंच), कचरू गंगाराम लष्करे, सुनिल ओहोळ (जिल्हा प्रभारी बसपा), आबासाहेब रामफळे, प्रसाद रामफळे, रामकृष्ण नामदेव रोडे, भगवान तुकाराम भालसिंग, अनिल मोरे, अनिल रोडे, गुलाबराव रामफळे, रंगनाथ लष्करे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई न झाल्यास येणाऱ्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेविका सुरेखा कुसाळकर यांच्या बदलीबाबत आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायतीच्या भवितव्यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
असल्या लोकसेवक व जातीवादी पुढार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार:
श्रीगोंदा तालुक्यामध्ये अतिक्रमित भूमिहीन लोकांना सरकारी आदेशाप्रमाणे अतिक्रमित घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी काही सरकारी कर्मचारी, ग्रामसेवक तसेच जातीवादी गावगुंड विरोध करून, केवळ राजकीय व जातीयद्वेषातुन सरकारी आदेश नाकारत आहेत. त्यांचे हे कृत्य सर्व पीडितांना त्यांच्या हक्कापासून उपेक्षित ठेवत असून, अशा पूर्वग्रहदूषित लोकसेवक, जातीवादी मानसिकता असणाऱ्या गावातील पुढाऱ्यांवरती संविधानिक मार्गाने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. असे सुनिल ओहोळ (जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी, अहमदनगर) यांनी नमूद प्रकरणाच्या अनुषंगाने माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(निवेदन व दिनांक २६ जुलै रोजी झालेले आंदोलन)
