दिनांक १२ जुन २०२४,श्रीगोंदा:
शनी चौक परिसरात उभारलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याबाबत नपा प्रशासन उदासीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरातील अनधिकृत होर्डिंग्जमुळे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोन? असा सवाल शनी चौकातील नागरिक करत आहेत.
शासनाने १०/१५ आकाराच्या बॅनरचा परवाना दिला असताना, या परिसरात उभारलेले मोठे बॅनर आणि होर्डिंग्ज कोणाच्या आशीर्वादाने उभारले आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, शनी चौकातील होर्डिंग्जला सन २०२३ साली मान्यता देण्यात आली होती. परंतु, शासनाचा नवीन अध्यादेश २०२४ साली जारी करण्यात आल्याने, या होर्डिंग्ज मालकांना नव्याने आदेश दिले गेले आहेत. जर त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही, तर लवकरच त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या मान्सून जोरावर असून, वारेही वेगाने वाहत आहेत. शनी चौकातील आनंद हॉटेलवरील बॅनरमुळे वादळात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा दिला जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ खबरदारी घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा, संभाव्य दुर्घटनेस जबाबदार धरून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शनी चौकातील अनधिकृत होर्डिंग्जला परवानगी कोणत्या अधिकारात दिली गेली.? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. इतर ठिकाणी बॅनरला बंदी असताना, येथे कशा प्रकारे मान्यता दिली गेली.? याबाबतही प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती..)


