दिनांक ११ जुन २०२४, श्रीगोंदा:
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे दलित समाजातील महिलेवर झालेल्या मारहाणीच्या आणि अत्याचाराच्या घटनेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ने कडक कारवाईची मागणी केली आहे. या घटनेतील आरोपींना जामीन मिळू नये, अशी मागणी आरपीआयच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
आरपीआयच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंद्याचे राजा जगताप, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, राहाता तालुका अध्यक्ष करण कोळगे, अमित काळे, अजय सोनवणे, स्नेहल सांगळे, वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, गोरेगाव येथील घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ६ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार केल्याच्या कारणाने विखे समर्थक प्रितेश पानमंद यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी व आईला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. लंके समर्थकांनी पीडित महिलांच्या अंगावरील कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व पोटात लाथा मारल्या. घटनेनंतर पीडित महिलेला पोलीस स्टेशनलाही जाता येऊ नये असे दहशतीचे वातावरण निर्माण केले.
या घटनेमुळे पीडित कुटुंबीय अजूनही भीतीच्या सावटाखाली असून गावातही तणावाचे वातावरण आहे. राजकीय वैमनस्यातून घडलेले हे कृत्य निंदनीय असून, पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, त्यांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मंत्री आठवले लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पारनेर येथे येणार आहेत. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, अशी मागणी सुरेंद्र थोरात यांनी केली आहे. राजकीय दबावातून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम झाले तर संपूर्ण जिल्ह्यात आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)


