दिनांक ११ जुन २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात तसेच कुकडी लाभक्षेत्रातील कर्जत, करमाळा, जामखेड या भागांत अलिकडच्या काळात झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याची स्थिती थोडी सुधारली असली तरी, याठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे कुकडी डाव्या कालव्याचे पिण्याकरीता चालू असलेल्या आवर्तनामधून विसापुर धरणात पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी केली आहे.
राजेंद्रदादा नागवडे यांनी सोमवार, १० जून रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. मागील काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यात व विशेषतः कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे कुकडी डाव्या कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. परंतु, अलीकडच्या काळात या भागात काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे परिस्थिती थोडीशी सुधारली आहे. याशिवाय, मान्सूनचे आगमन होत असल्यामुळे येत्या काळात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
राजेंद्रदादा नागवडे यांनी मांडलेल्या मागणीनुसार, कुकडी डाव्या कालव्यातून सोडलेल्या पिण्याचे पाण्याचे आवर्तनामधून श्रीगोंदा तालुक्यातील साठवण तलाव भरून घेण्यात यावेत. तसेच, विसापुर धरणात पाणी सोडून ते भरून घेतल्यास कुकडी आणि विसापुर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनांना फायदा होईल.
या मागणीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या मागणीवर तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुकर होणार असल्याचे दिसून येत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


