दिनांक ११ जून २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहर व तालुक्यातील विजेचा लपंडाव सुरू असून दिवसेंदिवस लाईट येत नसल्याने उद्योजक, व्यापारी आणि नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत २० मे २०२४ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी एस.डी.ओ. श्रीगोंदा यांच्या वतीने ३१ मेपूर्वी सर्व मेंटेनन्सची कामे करून, खाजगी ठेकेदार नियुक्त करण्याचे आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाही. उलट सद्य परिस्थितीत २०-२२ तास वीज गायब असते.
अशा गंभीर परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदामध्ये रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नाही. पोलिस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील, पंचायत समिती, भूमि अभिलेख, मा.वरिष्ठ स्तर न्यायालय या ठिकाणीही कामे ठप्प पडली आहेत. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
२८ मे २०२४ रोजी कंत्राटी कर्मचारी यांच्या थकीत वेतन संदर्भात ६ जून रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी देखील लेखी आश्वासनामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे आज वैतागून नागरिकांनी भीक मांगो आंदोलन केले. श्रीगोंदा शहरात जुनी लाईन दुरुस्त करण्यासाठी अजूनही साहित्य पुरवठा झालेला नाही. कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार नाही. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
या आंदोलनात सतीश बोरुडे, राजू गोरे (उपनगराध्यक्ष), ऋषिकेश गायकवाड, विशाल सकट, राम घोडके, गणेश काळे, युवराज पळसकर, वसीम शेख, वसीम ताडे, पांडुरंग पोटे, शनी चौक, तेली गल्ली, होनराव चौक (शिवाजी चौक), संत रोहिदास चौक, झेंडा चौक, दिल्ली वेस, बाजार तळ, बस स्टँड, भैरवनाथ चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, मार्केट यार्ड परिसर, महावितरण कार्यालय परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी सहभागी झाले होते.
या आंदोलनात ३५७० रुपये जमा झाले. त्यातील १० टक्के रक्कम अधीक्षक अभियंता खांडेकर (३५७ रुपये), कार्यकारी अभियंता माळी (३५७ रुपये), लोक प्रतिनिधींसाठी (३५७ रुपये) अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आले.
श्रीगोंदा शहरातील भीक मांगो आंदोलन प्रतीनिधिक स्वरूपात केले असून, भीक घेतल्यामुळे तरी अधिकारी सुधारतील अशी अपेक्षा आहे. आता आमचा संयम संपला आहे. वीज प्रश्न न सुटल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बांधून ठेवणार आहे. त्या वेळी मात्र कायदा हातात घेऊन कुणाचीही हयगय ठेवली जाणार नाही.
– टिळक भोस
श्रीगोंदा शहरात विजेचा खेळखंडोबा मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. त्यात सुधारणा व्हायला तयार नाही. त्यामुळे आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. अधिकाऱ्यांना वठणीवर आणू..
– सतीश बोरुडे
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


