दिनांक १२ जून २०२४, श्रीगोंदा:
यावर्षी जूनमध्येच सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करत आहेत. काही वेळा बहुतांश ठिकाणी बियाणे आणि खत कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे आणि खते मारली जातात. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते आणि संपूर्ण हंगाम वाया जातो. तसेच, कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा दिली जात नाही.
यावर्षी खरीप हंगाम २०२४ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जागृती करून बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे आणि खते खरेदी करताना दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे तसेच पेरणीनंतर बियाण्यांचे पॅकेट आणि बिल जपून ठेवावे. ज्या शेतकऱ्यांची बोगस बियाणे-खतांमध्ये फसवणूक होईल त्यांनी संभाजी ब्रिगेड सोबत संपर्क साधण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
बोगस बियाणे आणि खते तयार करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक असेल अशी माहिती संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


