श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे रक्ताभिषेक आंदोलन..

दिनांक १४ जुन २०२४, श्रीगोंदा:

आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या मागणीसाठी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून सतत पाठपुरावा केल्यामुळे स्मारकासाठी जवळपास दीड कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मात्र, स्मारकासाठी प्रस्तावित सरकारी जागेवरील खाजगी अतिक्रमण काढण्यास महसूल प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून, अतिक्रमण करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद विठ्ठलराव कापसे म्हणाले, “स्वराज्य धर्मासाठी आत्मबलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आम्ही पाच वर्षांपासून संघर्ष करत आहोत. ३५० वर्षांनंतरही अडथळे निर्माण होणे निंदनीय आहे. आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढत राहू आणि स्मारक उभारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”

तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ राम जरे यांनी छत्रपती संभाजी महाराज चौक हा श्रीगोंदा शहरातील प्रमुख चौक असल्याचे नमूद केले. येथे स्मारक उभारल्याने नवयुवकांना प्रेरणा मिळेल. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, “जर लवकरात लवकर अतिक्रमण हटवले नाही, तर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमचे अंगठे कापून रक्ताचा अभिषेक करणार आहोत.”

संभाजी ब्रिगेडने तमाम शंभुप्रेमींना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्मारकाच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रशासनाला या विरोधाचा सामना करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या विविध मागण्यांसंदर्भात श्रीगोंदा तहसील कार्यालसमोर दिनांक १८ जुन रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

यावेळी नाना शिंदे, अरविंद कापसे, शाम जरे, गोरख घोडकेंसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, पदाधिकारी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.

आयुष्यातील तरुणपणातील ५ वर्षे स्मारकासाठी संघर्ष करण्यात घालवली आहेत. आता आरपारची लढाई आहे. आमच्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही रक्ताभिषेक घालून छत्रपती संभाजी राजेंना मानवंदना देणार आहोत.
अरविंद विठ्ठलराव कापसे, जिल्हाध्यक्ष (संभाजी ब्रिगेड)

आमचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक श्रीगोंदा शहरात उभे राहणे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. प्रशासनाच्या टाळाटाळीमुळे उद्रेक होऊ शकतो आणि याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल.
इंजि. शामभाऊ राम जरे, तालुकाध्यक्ष (संभाजी ब्रिगेड)

स्रोत:(पत्रकार परिषद)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading