दिनांक १५ जून २०२४, श्रीगोंदा:
NEET २०२४ या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशभरात झालेल्या प्रचंड घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी, आज अहमदनगर जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळण्यात आला. या घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अनावश्यक ग्रेस मार्क देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
विशेषतः, परीक्षेतील सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी ७५% विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बिहारमधील पाटणा येथे पेपरफुटीच्या आरोपांनंतर काही लोकांना अटक करण्यात आली होती. परंतु, NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने पेपरफुटीचा आरोप नाकारला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी सांगितले की, “सर्वसामान्य घरातील विद्यार्थी मेहनत करून परीक्षेची तयारी करतात. त्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या पालकांच्या त्यागाची कदर न करता, पैसेवाल्यांनी घोटाळे करून परीक्षेतून प्रवेश मिळवणे हे अत्यंत निंदनीय आहे.”
या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत एक SIT (विशेष तपास पथक) गठीत करण्यात यावे आणि परीक्षा पुन्हा CBSE (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) द्वारे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या निषेध आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा शेलार, प्रशांत दरेकर, मनोहर पोटे, सुनीताताई दरवडे, संजय आनंदकर, उत्तमराव नागवडे आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. युवक काँग्रेसच्या वतीने सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.
स्रोत: (प्रसिद्धी पत्र)


