दिनांक १५ जून २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:
विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून मन लावून अभ्यास करून आपल्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावा व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी आमदार राहुल जगताप यांनी केले. श्री कोळाईदेवी विद्यालय, कोळगाव येथे नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त आयोजित समारंभात त्यांनी हे विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक नितीन डूबल होते.
श्री कोळाईदेवी विद्यालयात इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गाच्या नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांना गुलाब पुष्प व नवीन पाठ्यक्रमाची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत व एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या आर्थिक वर्षात विद्यालयात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक कोटी दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली, असे प्रभारी पर्यवेक्षक ठोकळ सर यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना मच्छिंद्र नलगे, नितीन मोहारे, संकेत नलगे यांच्या वतीने गोड शिरा वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड, सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे, सुभाष लगड, ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष मेहत्रे, मधुकाका लगड, नितीन मोहारे, सदस्य संकेत नलगे, चिमणराव बाराहाते, गणेश लगड, धनंजय लगड, धनेश लगड, सतीश लगड, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन अमित लगड, मुख्याध्यापक शहाजी हिरडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुषा धीवर यांनी केले. परिचय व सत्कार डी. टी. गायकवाड यांनी केला तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांनी मानले.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)


