लोणी येथे दलित दांपत्यास मारहाण; दोघांवर अट्रोसीटी गुन्हा दाखल..

दिनांक ३० जुन २०२४, लोणी:

जाहिरात..

लोणी येथे एका दलित दांपत्यास मारहाण केल्याच्या आरोपावरून महेश जालिंदर आहेर आणि विशाल जालिंदर आहेर या दोघा भावांवर अट्रोसीटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संध्याकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की, अरुण प्रभाकर सौदागर हे श्री अमोल बलभीम आहेर यांचे गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. त्या दिवशी संध्याकाळी ६:०० वाजता, श्री अमोल आहेर यांच्या सांगण्यावरून अरुण सौदागर त्यांच्या घरासमोर गाडी लावण्यासाठी जात होते. तेव्हा, महेश आहेर यांना गाडी लावण्यास अडथळा येत होता. अरुण सौदागर यांनी महेश आहेर यांना बाजूला होण्यास सांगितले असता, महेश आहेर यांनी अरुण यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या भावाला बोलावून घेतल्यानंतर दोघांनीही अरुण सौदागर यांना जबर मारहाण केली. या गोंधळात अरुण यांची पत्नी स्वाती सोडवायला गेली, तेव्हा तिलाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

अमोल आहेर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु महेश आणि विशाल आहेर कुणाचेही ऐकत नव्हते. या प्रकरणात जातिवाचक शिवीगाळ केली गेल्याचा आरोप आहे. शेवटी, महेश आणि विशाल आहेर यांचे वडील जालिंदर आहेर यांनी हा प्रकार थांबवला.

मारहाणीनंतर, अरुण सौदागर आणि त्यांची पत्नी स्वाती लोणी पोलीस स्टेशनला गेले, पण तिथे त्यांचे म्हणणे कुणीही ऐकले नाही. अरुण यांची प्रकृती खालावल्याने त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. दोन दिवस उपचार चालू होते, परंतु प्रशासनाने त्यांची तक्रार ऐकली नाही.

यामुळे दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत, लोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितले. तक्रार नोंद झाल्यानंतर, डी. वाय. एस.पी. साहेब शिर्डी यांनी लोणी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. श्री वाघ यांना अट्रोसीटी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. गुन्हा नोंद झाल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, तसेच पीडितांना केस माघे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

दलित महासंघाचे राहता तालुका अध्यक्ष श्री अमोल जगधने, श्री योगेश बुऱ्हुडे, श्री सागर राक्षे, विकी राक्षे, दिलीप जगधने, कुणाल जगधने, महिला आघाडीच्या सौ. हिना उबाळे, सागर उबाळे, ज्ञानेश्वर कनगरे, बबलू कनगरे आदी कार्यकर्ते पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading