दिनांक १८ सप्टेंबर(काष्टी/श्रीगोंदा):
काष्टी येथील मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद ठेवण्याची मागणी सचिन पाचपुते व विक्रम पाचपुते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मालमत्ता क्रमांक १७५५ या ग्रामपंचायतीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला साधारण सहा ते आठ कोटी रुपयांचा निधी पुनर्बांधणीसाठी व अत्यावश्यक सुविधांसाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषद अहमदनगरकडे उपलब्ध करून प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आला आहे. परंतु, येथील अतिक्रमनांमुळे नियोजित प्राथमिक आरोग्य केंद्रास कमी जागा शिल्लक राहिली आहे. शासकिय जागेवर योजना राबवण्यासाठी जागा होती. मात्र, त्या जागेवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमनामुळे प्रस्थावित नवीन आरोग्य केंद्र बांधण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.
यामुळे बांधण्यात येणारे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यायाने शाळेच्या आवारामध्ये बांधकाम झाल्यास, येणाऱ्या कालखंडात रुग्णांची मोठ्या प्रमाणात होणारी वर्दळ शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करू शकते. येथील आजारी रुग्णांच्या माध्यमांतून तसेच रस्त्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी व अत्यावश्यक रुग्णांसाठी होणाऱ्या जलदगती रुग्णवाहिका तसेच शववाहिका या सर्व प्रक्रियेसाठी एकच रस्ता असल्याकारणामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांसह स्थानिकांना जीवितास मोठया प्रमाणात धोका होण्याचे चित्र निर्माण होत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व बाबी विचारात घेत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास किंवा भविष्यात नमूद कोणत्याही कारणामुळे विद्यार्थ्यांस धोका निर्माण झाल्यास, त्यासाठी सर्वस्वी शासन/प्रशासन जबाबदार राहील. असेही पाचपुते यांनी निवेदनात नमूद केले आहे.
स्रोत:(सचिन पाचपुते व विक्रम पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन)
