उपरा.लक्ष्मण माने.(भाग २).

उपरा.लक्ष्मण माने..

पुरी माहिती होती ? आज कैकाडी जमातीच्याच पोटशाखा १४३ च्या आसपास आहेत . आणि पुढे किती सापडतील कुणास ठाऊक ?

बाकीच्या जातींची तीच स्थिती दिसते आहे . प्रत्येक जमातीची भाषा वेगळी , चालीरीती वेगळ्या , परंपरा वेगळ्या , संस्कृती वेगळी . सारं जीवन जातींनी कुंपण घालून बंदिस्त केलंय . काही जमाती या गुन्हेगार जमाती ठरवलेल्या . माणूस जन्मत : गुन्हेगार असतो , अशी समजूत इथल्या कायद्याच्या रखवालदारांची आहे . एक पोलिस इन्स्पेक्टर सांगत असतो , पारध्यांची दोन – दोन वर्षांची पोरं गुन्हेगार असतात , आणि महाराष्ट्रात अशा अनेक केसेस चालू आहेत . दोन – दोन वर्षांची पोरं . केवळ पारध्यांची पोरं असणं हा गुन्हा झालाय . कंजारभाट , कैकाडी , वडार , टकारी , भामटा , वैदू , गोसावी असणं हेच गुन्हेगार असण्यासाठी पुरेसं समजलं जात आहे . उदाहरण सांगायचं झालं तर लातूरला मसणजोगी समाजाची एक बाई नवं लुगडं नेसली आणि गावात कुणाचं तरी लुगडं हरवल्याची नोंद पोलिस स्टेशनला झाली . तर पोलिसांनी काय करावं ? भर रस्त्यात त्या बाईच्या अंगावरचं लुगडं फेडून घेतलं ! बिचारी अब्रू वाचवायला शेजारच्या झोपडीत पळाली . लोकांनी तिच्या अंगावर पांघरूण घातलं . अब्रू वाचली . आम्ही मोठा मोर्चा काढला . पोलिसांचं म्हणणं , ‘ मसणवट्यात राहणाऱ्या बाईकडं नवं लुगडं घ्यायला पैसा कुठला ? तिनं नक्की ते उचललं असलं पाहिजे . तर कलेक्टर साथं निवेदन घ्यायला आला नाही . हजारो माणसं उन्हात ताटकळत होती . औरंगाबादला संशयित गुन्हेगारी निर्मूलन परिषद ‘ चालू असते . हजारो लोक जमलेत , महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते जमलेत . व्यासपीठावरून क्रांतीच्या गोष्टी चालू असतात आणि पोलिस स्टेशनमध्ये पंधरा – वीस वैदू बडवले जात असतात . कुणीतरी येऊन सांगितलं म्हणून गेलो . वैदूंना मारल्याचं कारण विचारलं . लोक परिषदेला आलेले . पण पोलिसांचं म्हणणं , वैदूंकडं रेडिओ ट्रान्झिस्टर कुठून येणार ? रेडिओची खरेदीची पावती दाखवली तरी हे नाव त्याचंच कशावरून ? उमरग्याला अशीच परिषद चालू असते . पोलिस स्टेशनमध्ये त्याच वेळी लमाणांच्या तांड्यावरून आठवीतली दोन पोरं आणि ऐशी वर्षांचा म्हातारा यांना आणून मारहाण चालू असते . कारण काय , तर अंडी चोरल्याचा संशय ! ह्यांच्याशिवाय कोण चोरी करणार ?

तर किती सांगावं ?

गेलं वर्षभर पुण्याच्या सकाळमध्ये मी ‘ बंद दरवाजा ‘ नावाचं सदर चालवतोय . त्यात लिहिलंय . पारधी आई . वय साधारण पन्नाशीचं . तिचा नवरा जन्मठेपेला गेलेला. घरात तरुण पोरगा . झालं , मायलेकरांचे संबंध हा पंचायतीचा विषय . सारी जात भडकलेली आणि ही बाई आणि मुलगा त्यांच्या संबंधांचं समर्थन करत असतात . मी तर घामाघूम झालो होतो . सारं त्यांच्याच भाषेत चालू असतं . तर पंचांनी तिला शिक्षा केली . सारे जाऊन मातीत मुतले , तिला मातीचा चिखल करायला लावला . त्या चिखलाच्या पंचासमोर भाकरी करायला लावल्या आणि पंच्याहत्तर हजार रुपये दंड केला , जो त्यांच्या पिढ्यान्पिढ्या फेडला जाणार होता ! सारंच किळसवाणं होतं . मी तिला विचारलं . ती म्हणाली , “ दादा , वाळूक म्या लावलं , म्या खाल्लं , गुन्हा कंचा केला ? आता मला पाचवा नवरा करायचा न्हाय . पयल्याच्या पोटचा हा पोरगा . त्यानं इकली तवा दोन पोरं व्हती , दुसऱ्यानं इकली त्याची तीन पोरं आन् आता तुरुंगात हाय त्यो चौथा हाय . आता मला पाचवा नवरा नगं हाय , चौथा हाय त्याची चार पोरं हायेत , आता मला लगीन – ऋण करायचं न्हाय . बाप्याच हाय माझा पोरगा .

” तिची व्यथा समजत असते . पण हेच काय ! याहूनही भयावह समाजजीवन मी पाहतोय . आपलंच डोकं ठिकाणावर राहील की नाही एवढं प्रचंड शोषण चालू आहे . आणि अज्ञानाचं काय सांगू ? मी केवळ पांढरपेशी कापडं घालून तांड्यावर गेलो आणि गैरसमजानं जी दगडफेक झाली त्यातनं बचावलो , ते केवळ मला येत असलेल्या भाषेमुळं . नाहीतर सभा काय असते ? एक माणूस बोलतो आणि बाकीच्यांनी ऐकायचं हेही माहीत नाही- अगदी पुण्याजवळ हडपसरच्या माकडवाला वसाहतीतही .

या वस्तीत सभा चालू होती तीन तास , आणि मी एकच शब्द बोलत होतो . ‘ अल गप्प खानिग्यो ” ( आरं , गप्प बसा ) . या वाक्याच्या पुढे जाताच आलं नाही . एकाला गप्प करायचो तर दुसरीकडून एकदम सारे बोलायचे. सभा म्हणजे जात- पंचायतच. बेळगावच्या बेरडापासून औरंगाबादच्या लमाण तांड्यापर्यंत जातोय . नुसत्या गाण्यांच्या स्वरानं शब्दार्थ न समजताही माणसं ढसढसून रडतात , एवढं करुण स्वरातलं गाणं लमाण बंजारा तांड्यावर ऐकलंय. तर कंजारभाटांच्या देवाच्या पूजेतलं गाणं ऐकलंय , मरी तुजा गूखायेल , तुझा मूत पियेल ‘ हा प्रार्थनेचा पहिला चरणही ऐकलाय , आणि तुफान वेगानं पळणारा पारधीही पाहिलाय . गेलं दीड वर्ष भटक्या – विमुक्तांची चळवळ वेगळ्या वाटेनं चालू आहे . जाणिवा येताहेत . मी माझ्या परीनं वाटा उचलतोय . पण मनातून प्रचंड अस्वस्थ आहे .

आपलं कौतुक करणारी समाजातली ही सुजाण मंडळी, खरंच, आपल्या समाजाच्या चौकटी मोडून या बेघर, बेसहारा जनावरांसारखं खुरडत जगणाऱ्या उपऱ्यांना आपल्यात सामावून घेतील ? या शंकेनंच मी हादरून गेलोय .

साडेतीन टक्क्यांची संस्कृती असं जेव्हा मी बोललो , तेव्हा हीच शंका जबरदस्तपणे त्यामागे उभी होती . खरंच , आपल्या लोकांचं जीवन बदलेल ? ते आतून बदलतील ? समाज त्यांना बदलू देईल ? कुठंतरी ही माणसं स्थिर होऊन नव्या जीवनाचा स्वीकार करतील ? नव्या संस्कृतीचे वाटेकरी म्हणून जीवनाची मार्गक्रमणा सुरू करतील ? सत्ता , संपत्ती , प्रतिष्ठा , चिंतन , कला या साऱ्या विभागांत त्यांच्या माथीचा ‘ उपरा ‘ हा कलंक पुसला जाऊन मानवी संस्कृतीत हा भटक्या – विमुक्तांचा ओहोळ मिसळून जाईल ? यांच्याही माणूसपणाला किंमत येईल ? अन्न , वस्त्र , निवारा या यांच्या मूलभूत गरजा पुऱ्या होतील ? माणूस म्हणून समाज यांचा स्वीकार करील ? या सगळ्याच प्रश्रांनी मी हबकून गेलोय .

कधी कधी खूप निराश व्हायला होतं . एवढं आपसात शोषण चालू असतं आणि कशाचंही कुणालाही भान नाही . आपण मुळात माणसं आहोत, याचंही भान नाही. माणूसपण हरवलेला हा समाज निराशा यावी एवढा मागं राहिलाय .

पण उभारी येते , जागृती होऊ लागलीय यानं . औरंगाबादच्या संशयित गुन्हेगार निर्मूलन परिषदे’नं प्रतीकात्मक गुन्हेगारीचं प्रतीक म्हणून बेड्या जाळल्या . आणि लाचारीचं प्रतीक म्हणून झोळ्या जाळल्या . केवढा प्रचंड उत्साह दिसत होता ! डॉ. बाबा आढाव शपथ सांगत होते, “ आम्ही माणूस म्हणून जन्मलो . गुन्हेगार, भिकारी, लाचार म्हणून जन्मलो नाही. आम्ही भिक्षावृत्ती , गुन्हेगारी जीवन यांचा त्याग करतो . आम्ही गुन्हेगार , भिकारी नाही . समाज आम्हाला तसं समजतो. आता आम्ही माणूस म्हणून जगू इच्छितो . आम्हाला माणूस म्हणून जगू द्या . आमचं पुनर्वसन करा . ” गेलं वर्षभर पुनर्वसनाची मागणी चालू आहे . गेल्या वर्षी २६ जानेवारीला मोर्चा निघाला . घोषणा होती , ‘ स्वातंत्र्याचं झालं काय ? आमच्या हाती आलं काय ? ‘ डुकर , नंदीबैल , गाढवं , अस्वलं , पोपट , इत्यादी जनावरं . गोंधळी , भोपे , भराडी , दांगट , मसणजोशी , बाबा , बुवा , बैरागी , तेलीभुते परंपरागत वेशात मोर्चात आलेले असतात . सारं औरंगाबाद शहर हा लोकविलक्षण मोर्चा पाहत असतं .

आणि मुंढव्याच्या सेटलमेंटची मंडळी मोर्चात म्हणत होती,’ जनावराला न्याय, माणसांचं काय ?

सेटलमेंटचा प्रश्न म्हणजे १८७१ साली ब्रिटिशांनी लावलेली काटेरी कुंपणं आणि गुन्हेगारीचा, गुलामीचा कायदेशीर शिक्का. ब्रिटिशांनी जशी हजेरी लावली, तसाच त्यांच्या पुनर्वसनाचा विचारही केला होता . मुंबई इलाख्यातल्या बावन्न सेटलमेंटमध्ये औद्योगिक धंदेशिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. विमुक्तांसाठी स्वतंत्र ग्रँट होती . स्वातंत्र्यानंतर ह्या सगळ्याचं काय झालं ? तारा , हजेरी गेली. मुक्त झालो . हाती झोळी आली, गुन्हेगारीचा शिक्का आहेच . आजही पोलिसांच्याकडे गुन्हेगार जमातीच्या काळ्या याद्या आहेत. गुन्हा कुठेही होवो, त्याला या जमातीच जबाबदार धरून पोलिस त्यांना ठोकताहेत! बेवारस समजून .

परवा झबझब्या पारध्याची बायको सांगत होती,’ तुझ्या सरकारला सांग हामची समदी माणसं तुरुंगात घाल . म्हंजी बरं व्हईल . नायतर गोळ्या घाल . म्हंजी किटाळ जाईल . मंग न्हाय व्हायची चोरी . दादा , आमी काय मागतोरं ? उलीकसं कोपाट, अंगावर धडुतं , हाताला उलीकसं काम , आन् पोटाला आन्न .’

तर , हा मानव मुक्तीचा संघर्ष चालू झाला. खरं म्हणजे, म. जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींची व्याप्ती वाढत आहे, माणसं उभी राहताहेत, पुनर्वसनाची मागणी करताहेत . एका अर्थानं लाखो लोकांच्यासाठी बंद असलेला दरवाजा ठोठावताहेत, धडका मारताहेत . मला भीती याची वाटते आहे, की या लोकांच्यासाठी बंद असलेला दरवाजा खरोखरच उघडेल ? निदान किलकिला होईल ? मला शंका आहे आणि म्हणूनच मी अस्वस्थ आहे . आज धन्याला धत्तुरा आन् चोराला मलिदा अशी अवस्था आहे.

इथं, थांबत असताना एका गोष्टीचा नम्रपणे उल्लेख केला पाहिजे . ‘ उपरा ‘ एकटा नाही , आणि असं एकटं कुणीच नसतं . ‘ उपरा’चं यश हे एकट्याचं यश नाही . ‘ उपरा ‘ हे चळवळीला आलेलं यश आहे. मी चळवळीत वाढलो, चळवळीनंच मला मोठं यश दिलं . महात्मा जोतिराव फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी माझं आयुष्य घडवलं गेलं.’ उपरा ‘ चं यश हे या महान माणसांच्या पायवाटेनं गेल्याचं यश आहे. ‘ ग्रंथाली’सारख्या चळवळीचं, परिवर्तनवादी- समाजवादी मित्रांचं – संघटनांचं यश आहे . ते एकट्या लक्ष्मण मानेचं नाही, त्याला घडवणाऱ्या सगळ्यांचं आहे. ‘ उपरा’नं मध्यमवर्गीय वाचक ढवळून निघाला. सहानुभूतीदार झाला. पण या वाचक – मित्रांनी आपापल्या परीनं आता कृतिशील सहकार्य करावं, कृतिशील पाठीशी उभं राहवं , आपण पाठीशी उभं राहणं हे राष्ट्र उभं करण्यासारखं मोठं काम आहे. आपण सदैव पाठीशी राहाल हा विश्वास आहे .

उपरा’च्या प्रास्ताविकात मी म्हटलं होतं, ‘ पिढ्यान्पिढ्या गाढवाच्या पाठीवर बिहाडं बांधून भटकणाऱ्या मंडळींच्या वेदना समाज समजून घेऊ शकला तरी’ उपरा’चं लिहिणं सार्थकी लागलं , असं मी म्हणेन ‘ आणि दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं मी असं म्हणेन, या मंडळींच्या वेदना समजून घेतानाच या वेदनांच्या पाठीमागलं दुःख निवारण करता येईल, असं कृतिशील सहकार्यही करू या, कारण हा मानव – मुक्तीचा प्रयत्न आहे. २८ नोव्हेंबर, १९८३ म. जोतिराव फुले स्मृतिदिन सातारा

लक्ष्मण माने.

क्रमशः
स्रोत:(उपरा या लक्ष्मण माने यांच्या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading