श्रीगोंदा तालुक्यातील खते विक्रेत्यांची प्रशासनाकडे अनावश्यक खते लिंकिंग बंद करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा..


दिनांक ३ जुलै २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व रासायनिक खते विक्रेत्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत, रासायनिक खतांसोबत अनावश्यक खते व औषधांची लिंकिंग बंद करण्याची मागणी केली आहे. विक्रेत्यांनी प्रशासनाला ७ दिवसांची मुदत देत, या मुद्द्यावर ठोस पावले न उचलल्यास खते खरेदी बंद करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विक्रेत्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध गावांमध्ये ते कृषी दुकानांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेली युरिया, DAP, १०.२६.२६ सारखी रासायनिक खते उपलब्ध करून देतात. परंतु मागील काही दिवसांपासून, खतांची आवश्यकता असतानाही, कंपन्या व वितरकांकडून अनावश्यक खते विक्रीसाठी बळजबरी केली जात आहे. जर विक्रेत्यांनी ही अनावश्यक खते घेण्यास नकार दिला, तर त्यांना आवश्यक खतांचा पुरवठा केला जात नाही.

विक्रेत्यांनी सांगितले की, अनावश्यक खते घेतल्यानंतरही ती विकली जात नाहीत कारण शेतकऱ्यांना त्यांची गरज नसते. परिणामी, विक्रेत्यांचे भांडवल अडकून पडते आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच, शेतकऱ्यांना सक्तीने अनावश्यक खते विकल्यास कृषी विभागामार्फत कारवाईला सामोरे जावे लागते.

मागील वर्षी देखील विक्रेत्यांनी याच विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते, परंतु कंपन्यांनी आदेशांचे पालन केले नाही. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना खतांची आवश्यकता आहे, परंतु अनावश्यक खते खरेदीची सक्ती पुन्हा केली जात आहे.

“आमची परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात ठोस पावले उचलून अनावश्यक खतांची लिंकिंग बंद करावी,” असे विक्रेत्यांनी निवेदनात म्हटले आहे. “प्रशासनाने ७ दिवसांत योग्य निर्णय घेतला नाही, तर आम्ही आंदोलन करण्यास बाध्य होऊ,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

जाहिरात..

स्रोत:(निवेदन)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading