श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत शिवसेना उपनेत्यांनी राजीनामा द्यावा – बाळासाहेब दुतारे..
दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधाताई नागवडे यांचा पराभव झाल्यानंतर तालुक्यातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवसेना नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपनेत्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

काष्टी व शेडगावमध्ये पराभवाचा धक्का:
काष्टी गावाचे सरपंच साजन पाचपुते यांच्या गावात शिवसेनेच्या मशाल चिन्हाला केवळ १३१५ मते मिळाली, तर विरोधी उमेदवाराने ६२४७ मते मिळवून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. तसेच शेडगावचे सरपंच विजय शेंडे यांच्या गावामध्ये मशालीला केवळ १६९ मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या गॅस टाकी चिन्हाला १२९४ मते मिळाली. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गावांतच पक्षाची अशी दुर्दशा होणे गंभीर असून, यामुळे पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

“पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करा” – बाळासाहेब दुतारे
शिवसेनेचे उपनेते आणि तालुकाप्रमुख यांच्याविरोधात पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. दुतारे यांनी उपनेत्यांवर हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत उपनेत्यांनी उमेदवारासाठी प्रचार न करता निष्क्रिय भूमिका घेतली. मतमोजणी केंद्रावरही उपस्थित न राहिल्याने पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे तालुक्यातील जुन्या, निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देऊन पक्षाची संघटना बळकट करावी, अशी मागणी दुतारे यांनी केली.

शिवसेना बचाव मोहीम उभारणार..
नगर दक्षिणमधील निष्ठावंत शिवसैनिकांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. “शिवसेनेचे उपनेते आणि तालुकाप्रमुख यांची पदावरून उचलबांगडी केली जावी, अन्यथा पक्षसंघटनेत मोठ्या प्रमाणावर अंतर्गत असंतोष निर्माण होईल,” असे मत दुतारे यांनी व्यक्त केले.

“मातोश्रीशी निष्ठा, सत्ता असो वा नसो”
श्रीगोंदा तालुक्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे आदेश पाळण्यासाठी कटीबद्ध असून, सत्ता असो वा नसो, शिवसेना पक्षप्रमुखांसाठी कायमस्वरूपी निष्ठावान राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उपनेत्यांनी राजीनामा देऊन पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अन्यथा शिवसैनिक योग्य ती कारवाई करतील, असा इशाराही दुतारे यांनी दिला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
