देवदासी आणि नग्नपूजा…
ओढून मारत होते . माझ्या सभोवार सर्वत्र मारामारी चालू होती . मी घाबरून पुन्हा हॉटेलमध्ये गेलो . हॉटेलमालक आपल्या हॉटेलवर हल्ला होईल या भीतीने सर्व वस्तू एका पोत्यात भरत होता . त्याने माझी शबनग बॅगही पोत्यात टाकली . मी बॅग बाहेर काढली . हॉटेलवाला सर्व हॉटेलच्या वस्तू पोत्यात भरून निघून गेला. मी तिथेच थांबलो. बॅग गळ्यात अडकविण्याऐवजी हातातच दुमडून धरली . पाच मिनिटे गेली . एकदाची शांतता निर्माण झाली . माझे डोळे समोर थांबलेल्या बसकडे लागले . मी चोहोबाजूला पाहिले . कोणीच दिसले नाही . धावत जाऊन बस पकडावी म्हणून विचार केला . पुन्हा एकदा मागे – पुढे पाहिले . क्षणाचाही विलंब न लावता मी धावू लागलो . वीस – पंचवीस पावले गेलो असेन – नसेन तोच उदंऽऽ उदंऽऽ म्हणत समोरून पन्नास – साठ जणांची टोळी आली . मी घाबरलो . आपले काय होणार ? हे समजत नव्हते . टोळीने मला धरले . एकाने बॅगकडे बोट करीत विचारले , “ कॅमेरा आहे का ? ” मी उत्तर देण्यापूर्वीच दुसऱ्याने जोराचा हिसका मारून बॅग हिसकावून घेतली आणि तो धावू लागला . मी बॅग बॅग म्हणत ओरडताच दुसऱ्या एकाने मला लाथ मारली . जमलेल्या इतरांनीही लाथा – बुक्क्या मारल्या . दोन – तीन मिनिटांतच सर्वजण निघून गेले .
मी कसाबसा उभा राहिलो . माझी बॅग घेतलेला तरुण पन्नास फुटांवर उभा होता . बॅग पुन्हा मिळवावी म्हणून मी त्याच्या दिशेने धावू लागलो . निम्मे अंतर कापले . तेवढ्यात माझ्या दिशेने आणखी एक टोळी आली . मी धावताना त्यांनी पाहिले . नांगरलेल्या जमिनीतील मातीची ढेकळं माझ्यावर फेकण्यास त्यांनी सुरुवात केली . मी पुन्हा बसच्या दिशेने धावत सुटलो . बसच्या दारात उभा राहिलो . बसमधील प्रवासी बसचे दार उघडण्यास तयार नव्हते . ते म्हणाले , “ तू कार्यकर्ता आहेत , पत्रकार आहेस , तुला बसमध्ये घेतले की लोक आम्हालाही मारतील . ” मी प्रवाशांना विनंती करू लागलो . पण त्यांनी दरवाजा काही उघडला नाही . मी मागे वळून पाहिले तर हल्ला करणारी टोळी माझ्याच दिशेने धावत येत होती . टोळी खूप जवळ आली . काय करावे सुचेना . मी बसच्या मागील बाजूस आलो आणि सरळ शिडीवरून बसच्या टपावर चढू लागलो . तेवढ्यात एकाने उडी मारून माझा पाय ओढला . मी खालीच आदळलो असतो , पण माझे डोके , माझे पाय ओढणाऱ्याच्या छातीवर जोरात आदळले . त्याला जोरात मार बसला . तो छाती धरून खाली बसला . मी धावत जाऊन काही एक विचारपूस न करता सरळ ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसलो आणि त्याला म्हणालो , “ साहेब माझा जीव धोक्यात आहे . कृपया गाडी सुरू करा , थांबवू नका . ” त्यांनी गाडी सुरू केली . मी चोरट्या नजरेने बस बाहेर पाहिले . संतप्त जमावाने आतापर्यंत बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर हल्ला चढविला होता . पोलीस वाट दिसेल तिकडे धावत होते . आमची बस डोंगराच्या दिशेला लागली .
चंद्रगुत्तीच्या स्टँडवर बस थांबली . मी खाली उतरलो . मनातील भीती अद्याप कायम होती . कोण कधी हल्ला करेल याचा नेम नव्हता . देवस्थान समितीच्या कार्यालयात तरी आसरा घ्यावा म्हणून तिकडे धावलो . नग्नसेवेला जाणारे लोक मोठ्या प्रमाणात दिसत होते . आता त्यांना रोखणारे कोणीच नव्हते . अत्यंत आनंदाने व भक्तिभावाने ते जाताना दिसले . काही मिनिटांनी नग्नपूजेसाठी येणारी एक मिरवणूक बघून तर मला धक्काच बसला . भीतीने छाती धडधडू लागली . कारण त्या मिरवणुकीत भक्तांनी पोलीस , फौजदार व दोन महिला यांनाच नग्न करून मिरवणुकीत ओढलेले दिसले . कालपर्यंत ज्यांच्या अंगावर सरकारी गणवेश होता त्यांना संतप्त भक्तांनी नग्न केले होते . रस्त्यावरचे लोक त्यांना बघून हसत होते . पुढे हलगी कडाडत होती . पाठीमागे नग्न पोलीस खाली मान घातलेले . लज्जेने शरमिंदा झालेले . वर मान करण्याचे धाडस त्यांना होत नव्हते . मागे ‘ उदं ग आई उदं ‘ म्हणणारा भक्तांचा जमाव . मिरवणूक माझ्याजवळून गेली . मी अंग चोरून उभा होतो . हळूच तेथून निघालो .
भक्तांनी पोलिसांची गाडी पेटवली . समाजकल्याण खात्याची गाडी पेटवली . काही पोलीस भिऊन वाट दिसेल तिकडे पळू लागले . भक्तांनी त्यांनाही झोडपले . त्यांची टोपी हिसकावून घेतली . भक्तच ती टोपी घालून मिरवताना दिसले . पुढे नग्नावस्थेत डोंगरावर जाण्यास भाग पाडण्यात आलेल्या पोलीस महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची वार्ताही कानावर आली . संपूर्ण चंद्रगुत्तीत अशा प्रकारे हिंसक वातावरण बनले होते . ‘ उदंड उदंऽऽ ‘ म्हणत भक्त निर्विकार चेहऱ्याने जात होते . नग्नावस्थेतील या भक्तांना पाहून किळस येत होती . माझ्यासमोर दिसत होते ते देवस्थान समितीचे कार्यालय . माझ्या पावलांना विलक्षण गती आली . मी केवळ पाच मिनिटांत देवस्थानच्या कार्यालयासमोर आलो . पाहतो तो भक्तांनी कार्यालयाचा घेराव घातला होता . नग्नसेवेविरुद्ध तेथे मांडलेले चित्रांचे प्रदर्शन फाडून टाकण्यात आले होते . सर्वत्र एकच गोंधळ दिसत होता . समितीच्या कार्यालयासमोर असलेल्या लाऊडस्पीकरमधून आवाज येत होता , ” भक्तांनी कृपया शांतता पाळावी . कोणीही नग्नसेवेची छायाचित्रे घेऊ नयेत . तसे केल्यास तो गुन्हा ठरेल . ” लाऊडस्पीकरवरील आवाहन ऐकणाऱ्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी . हे दृश्य बघून माझी छाती परत धडधडू लागली . उगीचच माझी नजर माझ्या कपड्यावर गेली. मी तेथून निघालो. उन्हाचा चटका वाढला होता. अंग होरपळून निघत होते. घशाला कोरड पडली होती. गेल्या चोवीस तासात जेवायला मिळाले नव्हते. भूकही जाणवू लागली. पाय दुखत होते. मदत देण्यासाठी कोणीच नव्हते. कार्यकर्ते पळून गेले होते . पोलिसांची ही अवस्था . देवस्थान समिती आणि पोलीस ठाण्याला घेराव . कुठं जायचं ? मनाला कुरतडणारा भयाण प्रश्न. घशाची कोरड वाढतच गेली. पाणी तरी प्यावं म्हणून चौकातल्या हॉटेलमध्ये गेलो .
हॉटेलमधील चुलीशेजारीच टाकलेल्या बाकड्यावर अंग चोरून बसलो . सभोवार बसलेल्या माणसांची भीती वाटू लागली . इतक्यात एक कार्यकर्ता आत आला. त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. चेहेऱ्यावर भीती होती. तो माझ्या शेजारी बसला. बोटाने खुणावूनच त्यानं दोन चहाची ऑर्डर दिली. चहा आला. तो माझ्याशी काहीच बोलत नव्हता. रिकामा कप टेबलावर ठेवीत तो उठला. माझ्याशेजारी येऊन हळूच म्हणाला, “ सर , दे आर कमिंग बॅक. ” (ते मारेकरी पुन्हा येत आहेत.) एवढे बोलून तो निघून गेला. त्याचे हे वाक्य हॉटेल मालकाने ऐकले. तो माझ्याजवळ आला. अत्यंत विनयाने म्हणाला, “ सर, गेट आऊट प्लीज ”. मी मुकाट्याने उठलो. काय करावे सुचत नव्हते. डोंगराकडे अथवा नदीकडे जाऊ शकत नव्हतो . उदंऽऽ उदंऽऽ म्हणत घोळका आला की अंगावर काटा उभा राहायचा . इतक्यात सोरबला (तालुक्याचे ठिकाण) जाणारी एस.टी. येऊन थांबली. काही एक विचार न करता एस.टी.मध्ये बसलो. एस.टी सोरबकडे निघाली .
वरदा नदीच्या स्टॉपवर एस.टी. थांबली. लोकांनी एस.टी.ला घेराव घातला. काहीजण एस.टी.त चढले. पत्रकार, छायाचित्रकार आणि कार्यकर्ते यांचा ते शोध घेऊ लागले. एस.टी.त त्यांपैकी कोणी नसल्याचे कंडक्टर वारंवार सांगत होता. तरीही लोक एस.टी.त चढून बघतच होते. तेवढ्यात समोरून एक एस.टी. आली. आमच्या एस.टी.त चढलेले लोक गडबडीने खाली उतरले. त्यांनी समोरच्या एस.टी.ला घेराव घातला. कंडक्टरने डबल बेल मारली. आमची एस.टी. सुरू झाली. सोरब येईपर्यंत मला काही सुचत नव्हते. एकदाचे सोरब आले. मी खाली उतरलो. स्वत : वरच एक नजर टाकली. कपडे मातीत लोळल्याने रंगले होते. फाटले होते. किती वाजले बघावे म्हणून मनगटावर नजर टाकली. घड्याळ बेपत्ता झाले होते. मनगटावर नुसताच पट्टा होता. मनात अनेक विचारांचे काहूर घेऊन चालू लागलो. हॉटेल ‘गंधर्व’मध्ये मी ठेवलेली माझी सुटकेस घेतली. शिमोग्याला जाणाऱ्या एस.टी.त बसलो. तिथून कोल्हापूरला आलो.
नग्नसेवा! ती बंद व्हावी म्हणून कार्यकर्त्यांनी केलेला विरोध, त्यामुळे झालेली मारामारी देशभर गाजली. वृत्तपत्रांतील रकाने या घटनेने भरून आले. अग्रलेख, लेख व बातम्या छापून वृत्तपत्रांनी या प्रथेला विरोध दर्शविला..
क्रमशः
स्रोत:(देवदासी आणि नग्नपूजा या उत्तम कांबळेंच्या पुस्तकातुन)
