देवदासी आणि नग्नपूजा..
तेथे असलेल्या एका कार्यकर्त्याने त्याला दूर केले. पथनाट्य संपेपर्यंत असे न करण्यास सांगितले . पण जोगप्पा ऐकेना. शेवटी तो म्हणाला, “ मला दारूसाठी एक रुपया देणार असशील तर मी गप्प होईन . ‘ कार्यकर्त्याने एक रुपया त्याच्या हातात ठेवला , पैसे हातात पडताच तो शांत झाला .’ आम्माला रुपया मिळाला आता मी जातो ‘, असे सांगून अक्षरश : तो पळाला .
खेड्यापाड्यांत पथनाट्ये होत होती. चंद्रगुत्तीतील नग्नपूजेविरुद्ध जनजागरण चालू होते. पण प्रत्येक खेड्यात एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आली ती म्हणजे खेड्यातील गौडर लोक पथनाट्याला विरोध करत होते . एका खेड्यात तर काठ्याकु – हाडी घेऊन ते कार्यकर्त्यांवर धावून आले .
१९८४ साली नग्नपूजेविरुद्ध कर्नाटकातील काही साप्ताहिकांमध्ये आणि परदेशातील काही नियतकालिकांमध्ये छायाचित्रे व बातम्या प्रसिद्ध झाल्या . या गोष्टीचे पडसाद कर्नाटक विधिमंडळात उमटले . यावर यंदा (१९८६) नग्नपूजा बंद करण्याची जनजागरण मोहीम सुरू करू , असा निर्णय गृहमंत्री राचय्या यांनी जाहीर केला . यात्रा केवळ १५ दिवसांवर आली असताना हा निर्णय झाला. त्यानंतर प्रसिद्धी, समाजकल्याण व पोलीस खाते गावोगाव जाऊन नग्नपूजेविरुद्ध प्रचार करू लागले . काही सेवाभावी संस्था व महिला मंडळेही त्यात सहभागी झाली. भित्तिपत्रिका चिकटवण्यात आल्या . त्यावर ‘ नग्नपूजा मानवतेला कलंक ‘ असे लिहिले होते . याशिवाय सरकारी अधिकारी या पूजेसंबंधी रेडिओवरून भाषण करत होते . अशा प्रकारे ‘ दलित संघर्ष समिती ‘ व शासनाने सर्वत्र प्रचार सुरू केला . देवस्थान समितीलाही त्यांनी विश्वासात घेतले . पण या समितीची भूमिका विश्वासार्ह वाटली नाही. ‘ आमचाही नग्नपूजेला विरोध आहे . आम्ही लोकांना नग्न होऊन या म्हणून सांगणार नाही. समजा कोणी नग्न होऊन आलेच तर आम्ही त्यांना मातंगीच्या मंदिराजवळ अडवू . रेणुकांबाच्या मंदिरात येऊ देणार नाही ; असे देवस्थान समितीने सांगितले . ‘ नग्न भक्तांना मातंगीच्या मंदिरापर्यंत येऊ देऊ ‘ या म्हणण्यालाही तसा काही अर्थ नव्हता . कारण मातंगी व रेणुकांबाचे मंदिर यांच्यात केवळ १० – १२ फुटांचे अंतर आहे .
गावोगावी नग्नपूजेविरुद्ध कार्यकर्त्यांनी जी मोहीम सुरू केली होती त्याविरुद्ध स्थानिक जोगम्मा व जोगप्पांनी मोहीम सुरू केली . सरकार आणि कार्यकर्ते धर्म बुडवायला निघाले आहेत ; नग्नपूजेचा नवस केलेल्यांनी अशी पूजा न केल्यास देवीचा कोप होईल, अशी भीती ते भक्तांच्या मनात निर्माण करताना दिसत होते .
या सर्व प्रचार मोहिमेत या भागातील दोन मोठे राजकीय नेते मात्र कोठेच दिसले नाहीत . त्यापैकी एक जे. एच. पटेल हे मंत्री होते, तर दुसरे एस. बंगारप्पा. यांना लोक देवाप्रमाणे मानतात. नग्नपूजेविरुद्ध त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. या कालावधीत रे बंगळूरमध्ये होते. या भागात ते फिरकले नाहीत. याशिवाय इतर कोणत्याच राजकीय पक्षाचे लोक दिसले नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने नग्नपूजेला पाठिंबा देतात अशी तक्रार मात्र दलित संघर्ष समितीचे नेते प्रा . कृष्णप्पा वारंवार करत होते .
शेकडो वर्षे चालत आलेल्या नग्नपूजेला प्रथमच विरोध झाल्याचे पाहून भक्त हादरले होते . पण पूजा बंद होणार नाही, याबद्दल कार्यकर्त्यांमध्येसुद्धा साशंकता होती. कारण नग्नपूजेविरुद्ध प्रचार फक्त शिमोगा जिल्ह्यातच झाला होता. प्रत्यक्षात धारवाड, चित्रदुर्ग, बेल्लारी आदी जिल्ह्यांतूनही बरेच लोक नग्नपूजा करण्यासाठी येतात. त्यांच्यापर्यंत नग्नपूजा करण्यास चाललेला विरोध पोहोचला नव्हता. वृत्तपत्रांतून मजकूर प्रसिद्ध होत होता, पण ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी वृत्तपत्रे पोहोचत नव्हती. जेथे पोहोचत होती तेथे सर्वच जणांना वाचता येत नव्हते. या सर्व पार्श्वभूमीवर नग्नपूजेच्या भवितव्यासंबंधी संभ्रम निर्माण करणारे चित्र तयार झाल्याचे जाणवले.
अखेर बुधवार १९ मार्च १९८६ हा नग्नपूजेचा दिवस उजाडला. आदल्या दिवशी रात्री सर्व कार्यकर्ते वरदा नदीवर मुक्कामाला होते . कारण वरदा नदीत आंघोळ करून , काही धार्मिक विधी करून, तेथेच नग्न होऊन देवीला जायचे, अशी प्रथा आहे. नदी ते देवीचे मंदिर हे अंतर अंदाजे चार किलोमीटर आहे. एवढे सर्व अंतर नग्नावस्थेतच तोडले जाते. बुधवारी पहाटेपासून नग्नपूजा सुरू होईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते आणि ते खरेही ठरले . खरे तर पहाटे कडाक्याची थंडी होती. सर्वत्र धुके मोठ्या प्रमाणात पडले होते . तशातच हजारो भक्त उदंऽऽ उदंऽऽचा घोष करत चालत, बैलगाड्या , ट्रक , ट्रॅक्टर व टेंपोंनी येत होते . पहाटे चारच्या सुमारास चार वर्षांच्या मुलासह एक जोडपे नदीत आले . त्यांनी आंघोळ केली . धार्मिक विधी केला. ते आता नग्न होणार इतक्यात कार्यकर्ते तिकडे धावले. ‘ नग्न होऊन पूजा करू नका . करायची असेल तर वस्त्रानिशी करा . ‘ अशी विनंती ते त्यांना करू लागले . पण ते जोडपे ऐकायलाच तयार होईना. त्यातील महिला तर रडायला लागली. ती म्हणाली , ‘ आम्माच्या कृपेनेच मला हा मुलगा झाला. त्याबद्दल तीन वर्षे नग्नपूजा करण्याचा मी नवस केला आहे. दोन वर्षे नग्नपूजा करण्याचा नवस पुरा झाला . आता शेवटचे वर्ष राहिले आहे . मला नग्नपूजा करू द्या. मी तुमच्या पाया पडते, हात जोडते. ‘ पण कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढली. शेवटी हे जोडपे नग्न न होता अंगाला लिंबाच्या डहाळ्या लावून मंदिराकडे निघाले. कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे पहिला विजय मिळवला.
बुधवारी नग्नपूजा करणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात नव्हती. कारण ‘ खरी यात्रा ‘ गुरुवारपासून सुरू होणार होती. तरीही कार्यकर्ते नदीवर ठाण मांडून होते. या दिवशी सुमारे पाचशे लोक नग्नपूजेसाठी नदीवर आले. पण कार्यकर्त्यांनी सर्वांची समजूत घालण्यात यश मिळवले. पण मंदिराकडे जाताना वाटेतच अंगावरचे कपडे फेकून नग्न होऊन बाराजण देवीला गेले. तर वरदा नदीवर न येताच इतर ठिकाणी स्नान करून ३२ जण छुप्या पद्धतीने नग्न होऊन देवीस गेले. अशा प्रकारे ४४ जणांनी पहिल्या दिवशी नग्नपूजा केली. त्यात लहान मुले, महिला व पुरुष या सर्वांचाच समावेश होता. पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी नदीवर केवळ १०-१५ पोलीस नदीपासून दहा मीटरवरच थांबले होते . त्यांच्या हातात काठी नव्हती . कमरेला बेल्ट नव्हता. कारण धार्मिक स्थानाजवळ या गोष्टी न्यायच्या नसतात असे ते सांगत. नग्नपूजा करणाऱ्याला कार्यकर्ते विरोध करत, पण पोलीस मात्र प्रेक्षकांची भूमिका घेताना दिसले. एका तरुणाला नग्नपूजा करताना कार्यकर्त्यांनी अडवले. पण तो कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून आला. आठ – दहा कार्यकर्त्यांनी त्याला गच्च पकडून त्याच्या अंगावर कपडे घातले. तो तेथून निघाला , पण अर्ध्या – पाऊण तासाने तो पुन्हा परतला तो नग्न होऊन आणि हातात तळपणारी तलवार घेऊन. तलवार नाचवत तो नदीत गेला . आता मी नग्नपूजा करणार आहे. कोणी आडवे आल्यास खांडोळी करीन, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे त्याच्यासमोर जाण्याचे धाडस कोणाला होईना. पोलीसही जवळ येत नव्हते . कार्यकर्त्यांची संख्या ३०-४० च्या पुढे नव्हती. सर्वजण बघत राहिले. तो तरुण मात्र उदंऽऽ उदंऽऽ म्हणून निघून गेला.
पोलीस गप्प राहतात. नग्नपूजेला विरोध करत नाहीत म्हणून ते देवस्थान समितीच्या बाजूने आहेत असा कार्यकर्त्यांचा समज झाला , तर पोलीस हे काही दिवस कार्यकर्त्यांबरोबर फिरत आहेत म्हणून ते त्यांच्याच बाजूचे आहेत. नग्नपूजा करणाऱ्यांस कार्यकर्ते विरोध करतात तरी पोलीस काही भूमिका घेत नाहीत म्हणून कार्यकर्त्यांच्या बाजूचे आहेत असा भक्तांचा समज झाला. अशा प्रकारे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाल्याचे दिसले . नदीच्या आवारात छायाचित्रे घेण्यास बंदी घालावी अशी मागणी देवस्थान समितीने केली. पण तसे केल्यास वृत्तपत्र स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्यासारखे होईल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही.
बुधवारची रात्र मात्र खलबताने गाजली. नग्नपूजा बंद झाल्यास येथील यात्राच बंद होईल म्हणून अनेक जोगम्मा व जोगप्पा भक्तांमध्ये जाऊन नग्नपूजेचा प्रचार करताना दिसू लागले. “ आम्मा
क्रमशः
स्त्रोत:(उत्तम कांबळे यांच्या देवदासी आणि नग्नपूजा या पुस्तकातुन)
