श्रीगोंदा दिनांक २३ जुन २०२५:
श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दि. २३ जून २०२५ रोजी तुळशीदास मंगल कार्यालय, श्रीगोंदा येथे “आमसभा २०२५” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीगोंदा-नगर मतदारसंघाचे आमदार मा. विक्रम बबनराव पाचपुते यांनी भूषवले, तर सभेचे सचिवपद मा. गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी निभावले.

या आमसभेत विविध विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आमदारांनी कौतुक केले तर काहींना चुका सुधारण्याचा सल्ला दिला. याच कार्यक्रमात आमदार पाचपुते यांनी एक महत्वाची घोषणा करत सांगितले की, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” २०२५ पासून सुरु करण्यात येणार आहे.

एकूण १६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्हा परिषद गटातून २ ग्रामपंचायती निवडल्या जातील.
या स्पर्धेतील पुरस्कार रक्कम पुढीलप्रमाणे वाटप करण्यात येईल –
- प्रथम क्रमांक – ₹५५ लक्ष
- द्वितीय क्रमांक – ₹२५ लक्ष
- तृतीय क्रमांक – ₹११ लक्ष
- उर्वरित १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ₹१ लक्ष

➡️ एकूण पारितोषिक निधी – ₹१ कोटी ४ लाख
स्पर्धेच्या अटी व नियम लवकरच जाहीर करण्यात येणार असून, स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना मिळणारी रक्कम स्थानिक सरपंच व ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली खर्च करण्याचा अधिकार राहील, असेही आमदारांनी स्पष्ट केले.

यावेळी मा. तहसीलदार श्रीगोंदा, मुख्याधिकारी – श्रीगोंदा नगरपालिका, सर्व विभागाचे अधिकारी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ग्रामविकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी ही एक सुवर्णसंधी असून, सर्वांनी यात सहभागी व्हावे”, असे आवाहनही आमदार पाचपुते यांनी शेवटी केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
