श्रीगोंदा, दि. ८ सप्टेंबर २०२५:
ग्रामविकास विभागाच्या महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान मा.आ. विक्रम बबनराव पाचपुते, आमदार श्रीगोंदा विधानसभा, हे भूषविणार असून कार्यशाळा मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. तूळसीदास मंगल कार्यालय, पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे होणार आहे.

या अभियानाचा उद्देश जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देऊन त्यांची कामगिरी अधिक प्रभावी करणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी जलदगतीने करून त्यांचा लाभ गावागावात शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवणे हा आहे.

तसेच ग्रामपंचायतींमार्फत आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रात लोकसहभागातून विकास साधणे, ग्रामिण भागातील नागरिकांना सुलभ सेवा देणे आणि ग्रामविकासाचा वेग वाढवणे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कार्यशाळेमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच रोजगार सेवक यांना मार्गदर्शन केले जाणार असून त्यांना अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत प्रशिक्षण व जनजागृती दिली जाणार आहे.

गट विकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती श्रीगोंदा राणी फराटे यांनी कळविल्यानुसार, सदर कार्यशाळेला सर्व संबंधितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
