श्रीगोंदा दिनांक २३ जुन २०२५:
कर्जत तालुक्याचे भूमिपुत्र आणि सध्या लातूर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक असलेले सुरेशकुमार राऊत यांना त्यांच्या उत्कृष्ट तपास कार्याबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान करण्यात आले. पुण्यातील पोलिस संशोधन केंद्र येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

हा सन्मान मिळवणाऱ्या राऊत यांचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलिस महासंचालक दीपक पांडे, सुहास वारके, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची उपस्थिती लाभली होती.

ऑक्टोबर २०२१ मध्ये शिरूर तालुक्यातील घोडनदी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर झालेल्या धाडसी दरोड्याचा अवघ्या दहा दिवसांत यशस्वी छडा लावल्याने राऊत यांना हा सन्मान लाभला आहे. पाच दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या अडीच कोटींचे दागिने व रोकड लुटली होती. परंतु सुरेशकुमार राऊत यांनी तंत्रशुद्ध तपास करत सर्व आरोपींना गजाआड करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता.

या कामगिरीसाठी त्यांना २०२२ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पुरस्कार जाहीर झाला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते ‘पोलिस महासंचालक पदक’ देखील देण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा ३० वर्षांचा यशस्वी पोलिसी कार्यकाळ आहे. त्यांनी मुंबई, वाशिम, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, शिरूर, सोलापूर (मोहोळ) अशा विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा दिली आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी:
राऊत यांचे मूळ गाव कर्जत असून, त्यांचे वडील नानासाहेब राऊत हे शिस्तप्रिय शिक्षक होते आणि आई जानकी राऊत यांनी त्यांच्यावर सद्गुणांचे संस्कार केले. त्यांचे बंधूही प्राथमिक शिक्षक आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य उच्चशिक्षित असून, त्यांच्या पत्नी स्वाती राऊत या पुणे महापालिकेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचा मुलगा अमेरिकेतील नामवंत कंपनीत कार्यरत आहे.

त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, अमरनाथ विद्यालय आणि महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. पुण्यात कृषी पदवी घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस सेवेत प्रवेश केला आणि आपल्या सेवेत सातत्याने समाजोपयोगी कार्य करून अनेक राष्ट्रीय-राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
