दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंद:
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातून भाजपाने माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. तथापि, स्थानिक कार्यकर्त्यांनी विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडणूक रिंगणात उतरावे, अशी मागणी केली आहे.

आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, त्यांच्या पत्नीस भाजपाकडून उमेदवारी मिळाली होती आणि त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. तथापि, प्रतिभा पाचपुते यांनी पतीची तब्येत सांभाळण्यासाठी निवडणुकीतून बाजूला राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील माऊली संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विक्रम पाचपुते यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. प्रतिभा पाचपुते यांच्या भावना आदरपूर्वक लक्षात घेत, विक्रम पाचपुते हेच उमेदवार असावेत, असा एकमुखी सुर लावला. “आमदार बबनराव पाचपुते हाच आमचा पक्ष असून, त्यांनी दिलेला उमेदवार आम्ही निवडून आणू,” असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

या बैठकीत पोपटराव खेतमाळीस, गणपतराव काकडे, बाळासाहेब महाडीक, प्रताप पाचपुते, माऊली हिरवे, मारुती औटी, बाबासाहेब काळे, सुभाष निमसे, संतोष भापकर, नानासाहेब कोथंबिरे, पुरुषोत्तम लगड, मिलिंद दरेकर आणि विविध जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांनी विक्रम पाचपुते यांची उमेदवारी मागितली.
तत्पूर्वी, आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पोहचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रास्ताविक केले आणि उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
विक्रमसिंह यांची उमेदवारी सक्षम ठरणार..
भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांना स्थानिक तरुण वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांच्या अस्वास्थ्यामुळे तालुक्यातील विकासकामांसाठी मंत्रालयातून निधी मिळवण्याची जबाबदारी विक्रम यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. त्याचबरोबर जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची त्यांची क्षमता उमेदवारीसाठी फायदेशीर ठरू शकते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




