श्रीगोंदा: अपघातात गंभीर जखमी पती-पत्नीला वकिलाच्या प्रसंगावधानाने मिळाली माणुसकीची मदत..

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ श्रीगोंदा::

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काष्टीहून श्रीगोंद्याकडे येणाऱ्या मोटरसायकलची माल ट्रकला धडक लागल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर साधारण अर्धा तास मदतीविना पडून राहिले, प्रवासा दरम्यान श्रीगोंदा शहरातील नामांकित वकील आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप खामगळ यांनी घटनास्थळी थांबून मदतीचा हात पुढे केला.

त्यावेळी श्री. खामगळ हे नियोजित कामानिमित्त काष्टीहून श्रीगोंदा येथे जात होते. या मार्गावर जात असताना त्यांना ही दुर्दैवी घटना निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ 108 क्रमांकावर संपर्क साधून ॲम्बुलन्सची मागणी केली, मात्र ॲम्बुलन्स उपलब्ध न झाल्याने त्यांनी आपल्या गाडीमध्ये जखमी पती-पत्नींना घेत श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे शिफारस केली.

घटनेबाबत ॲड. श्री. खामगळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “अपघाताच्या ठिकाणी गर्दी जरी खूप असते, तरी मदत करणारे फार कमी असतात. मदतीची गरज असताना अनेकजण सेल्फी, फोटो, आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त असतात. आज मी माणुसकी दाखवली नसती, तर जखमी पती-पत्नींना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले असते. ही कृत्य केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून केले असून, समाजानेही असे सामाजिक भान जागृत ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.”

अपघातात जखमी झालेले रूपाली आणि अशोक फुलमाळी हे मूळ कानडी बेळगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील आहेत. सध्या कामानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथे ते वास्तव्यास होते. त्यांच्यावर, अहमदनगर येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading