दिनांक ३० ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
आज घनश्याम अण्णा शेलार यांच्या संपर्क कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्राध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार घनश्याम अण्णा शेलार यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी २१ कलमी विकासाची ब्लू प्रिंट सादर केली. या कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परिषदेच्या वेळी बच्चुभाऊ कडू यांनी शासकीय धोरणांवर टीका करत ग्रामीण भागासाठी अधिक आर्थिक तरतुदींची गरज असल्याचे सांगितले. कडू यांनी असेही नमूद केले की, सत्ता कोणत्याही पक्षाच्या हातात असो, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतील समस्या कायम आहेत. प्रहार पक्षाच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
घनश्याम अण्णा शेलार यांनी त्यांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. या २१ कलमी कार्यक्रमात डिंबे माणिक डोह बोगदा, डींबे धरणाची उंची वाढवण्याची योजना, स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, विसापूर धरण, संत शेख महंमद महाराज तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणे, जिल्हा रुग्णालय, रस्ते व दळणवळण सुविधा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तसेच ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क उपलब्धता अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

कारखानदारांशी लढा देणाऱ्या सर्वसामान्य उमेदवाराच्या रूपात घनश्याम अण्णा शेलार यांनी जनतेचा विश्वास संपादन केल्याचा दावा कडू यांनी केला. या निवडणुकीत “तालुक्याच्या प्रश्नांसाठी लढा” या भावनेने शेलार हे उभे असून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर नेतृत्व आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात अजीम भाई जकाते, संजय आनंदकर, सुरेश सुपेकर, राजेंद्र पोकळे, विनोद सिंग परदेसी, माधव बनसुडे, नितीन रोही, कृष्णा खामकर, विमल अनारसे ताई, राजेंद्र काकडे, ज्ञानदेव भैलुमे, संतोष गायकवाड, सुरेश गलांडे यांच्यासह घनश्याम अण्णा शेलार मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)




