दिनांक १६ मार्च,श्रीगोंदा:
सर्व ग्रामसेवकांनी तालुक्यातील ज्या गावामध्ये शासकीय जागेवर, गायरान, गावठाण ठिकाणी निवासाच्या हेतूने लोकांनी घरे बांधली आहेत, त्या घरांचे नियमांकुल करण्यासाठी ऑनलाइन, ऑफ लाईन मागणी अर्ज दाखल करावेत. असे लेखी आदेश गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी काढले असून, “नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस” कडे तक्रारी आलेल्या गावातील अतिक्रमणाचा पंचनामा करण्यास सुरूवात केली आहे.

अतिक्रमण नियमांकुल करण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु, त्या सोडविण्याचे आश्वासन ही काळे यांनी ‘एन.डी.एम.जे’.ला दिले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय जागेवरील निवासी हेतूने केलेले अतिक्रमण नियमांकुल करावे व अतिक्रमण धारकांची नावे अपलोड करतांना दुजाभाव करू नये. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा “नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस” (NDMJ) च्या कार्यकर्ता तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यता मिराताई शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी काळे यांनी दि.१५ मार्च रोजी चर्चा करण्यासाठी मिराताई शिंदे यांना दूरध्वनी वरून निमंत्रण दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी यांच्या दालनात बैठक करण्यात आली.
शिंदे यांनी वांगदरी, ढवळगाव, सांगवी दु., लिंपणगाव, चिंभळा या गावातील समस्या मांडल्या. ढवळगाव मध्ये दिनांक १५ रोजी पंचनामा करून, याद्या अपलोड करण्यात आल्या.

यावेळी ‘एन.डी.एम.जे’ चे सचिव ऍड. वैभव गीते यांच्याशी दूरध्वनी वरून गटविकास अधिकारी यांची चर्चा झाली. मुदत १५ मार्च असली तरी, राहिलेल्या गावातील अतिक्रमण नोंद घेण्यासाठी अतिक्रमण धारकांनी ऑफ लाईन अर्ज लवकरात लवकर देण्याचे आवाहन मिराताई शिंदे यांनी केले असून, लिंपणगाव अतिक्रमण या विषयावर उपविभागीय अधिकारी यांच्याशी गुरुवारी दिनांक १८ मार्च रोजी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे काळे यांनी सांगितले.
यावेळी विस्तार अधिकारी कैलास जगताप, भोंग तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव राजेंद्र राऊत, लता सावंत, गणेश दिवेकर उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
