बनगरवाडी..
” हो, का रे ? “न्हाई, कधी न्हाई आन् आजच का, म्हणलं ?” आयबू एवढेच बोलला, पण मला त्याला काय म्हणायचे होते समजले. त्याने शेंगा भरून ठेवल्या. दार ओढून घेतले. आणि मी शाळेकडे निघालो, तेव्हा असेही वाटले की, आयबूला याची काही माहितीही नसेल. तो आपला सहज बोलला असेल आणि माझ्या मनाने त्याचे अर्थ लावले असतील. यानंतर रस्त्याने जाता – येता शेकू मला दोनचार वेळा भेटला, पण नित्याप्रमाणे तो माझ्याकडे बघून हसला नाही.
“ काय गडबड, मास्तर” असे त्याने विचारलेही नाही. लांबून मला बघितले की, खाली मान घालून तो तरातरा माझ्या अंगावरून जाई. त्याच्या तुटक वागण्यामुळे निश्चय करूनही अंजीसंबंधी त्याला काही विचारण्याचा धीर मला झाला नाही. अंजी – शेकूच्या संबंधाविषयी गावातली कुणकूण अधिक वाढली होती. रोज ती दोघे मिळून शेरडांमागे जातात. वाटेने जातानासुद्धा अंजी शेकूच्या अंगचटी येते, असे लोक बोलत. आज त्या दोघांना दूरवरच्या ओढ्याकाठी असलेल्या निरगुडीच्या ताटव्यात बघितले, उद्या मावल्या आईच्या देवळात जाऊन त्या दोघांनी शपथा घेतल्या, अंजीने देवीच्या काचोळीची शपथ घेऊन शेकूला दगा न देण्याबद्दल शपथ घेतली, परवा शेकूने शेरडे विकून अंजीसाठी तोडे करायला टाकले, अशा अनेक गोष्टी कळत.

शेकूचे हे प्रेमप्रकरण म्हणजे तरण्या पोरांच्या चेष्टेचा विषय झाला होता. जाणत्या माणसांच्या तिरस्काराची गोष्ट झाली होती. मग एके दिवशी शेकूचे आणि त्याच्या बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. काय झाले हे कळले नाही, कारण ती दोघे मध्यानरात्रीची आपल्या घरातच भांडली. आणि सकाळी बायको गावातल्या गावातच वेगळी राहू लागली. धुळा धनगराच्या घराशेजारचा गोठा मोकळा होता, त्यात चूल करून ती राहू लागली. शेतीवाडीकडे काही ध्यान न देता, रोजगार करून, मोलमजुरी करून पोट भरू लागली. तिने शेकूचे नावच सोडले. अंजी आणि शेकू एकत्र राहू लागली. लगीन करायचे म्हणून शेकू जुळवाजुळव करू लागला. शेरडे – करडे मोडून त्याने रोख पैसा जमा केला. धान्यधुन्य जमा केले. शेकूचे रान गावापासून थोडे लांबच होते.
याच्या रानापलिकडे असलेला मळा वाडी ज्या गावाखाली होती त्या येडशी गावचा होता. या मळ्यात खतासाठी मेंढरे बसू लागली. मळ्याच्या मालकाने कुणी परगावचे मेंढके बोलावले होते. रात्रभर ते दोघेतिघे जवान धनगर ओव्या गात, शेकटा घेत त्या रानात बसत. त्यांनी तालात गायलेल्या ओव्यांचे सूर आपल्या रानातून अंजी ऐके. एकदा रख्ख दुपारचा त्यांच्यापैकी एक मेंढका समाईक बांधावरच्या बाभळीवर चढला आणि बाभळ सवाळू लागला. त्याची मेंढरे खाली जमा झाली आणि काटे चुकवून बाभळीची पाने लबूलबू खाऊ लागली. हिरवटपांढऱ्या बाभळीच्या शेंगा वेचू लागली.
तेव्हा सपाट्याने अंजी पुढे झाली आणि खाली उभी राहून बाभळीवर चढलेल्या त्या गड्याकडे बघून म्हणाली, “ ए, कोन बाभळ सवळतया ते? “वर बसलेला मेंढका खाली बघून म्हणाला, “का ग, तुजी हरकत हाय काय ? “एकदम त्याने’ का ग ? ‘म्हणताच अंजी शहारली. तोच टपाटपा बाभळीची पिवळी फुले तिच्या अंगावर पडली आणि मागोमाग मेंढक्याने खाली उडी घेतली. रंगाने काळाभोर असा तो जवान, नाकेला मेंढका अंजीच्या पुढ्यात तोऱ्याने उभा राहिला.
त्याच्या डोळ्यांकडे बघण्याचा धीर काही अंजीला झाला नाही. तिची छाती धडधडू लागली. आजूबाजूला कोणी नव्हते. बाभळीच्या सावलीत मेंढरे डहाळा खात होती आणि गालातल्या गालात हसत तो धटिंगण आपला अंजीपुढे उभा होता. मग तो म्हणाला, “पाव्हण्या माणसाला असं जरबेनं बोलू ने. हे रान तुझं काय? “खाली बघतच अंजी ठसक्याने म्हणाली, “माजं रान असल्याबगार बोलतीय का ? मेंढका म्हणाला, ‘भरात आलेली बाभळ बघून सवळावी वाटली.” आणि त्याने धिटाईने चक्क अंजीचा हात धरला. अंजी ओरडली नाही, किंचाळली नाही. तिने जराशी धडपड केली, पण मेंढक्याच्या घट्ट पकडीतून तिचा हात सुटला नाही. मग त्याच्या डोळ्यांकडे बघत काकुळती येऊन अंजी म्हणाली,” बांगडी वाढली माजी. सोड की हात. “नाही सोडत. काय करशील ? ” ” अं, बराच की दांडगावा हाय तुजा ! सोड हात. ”तरीही मेंढका आपला हसतच राहिला. चारपाच दिवस मेंढरे रानात बसवून आणि त्याबदली मिळालेले जोंधळे घेऊन तो मेंढका मेंढरे हाकीत आपल्या गावी गेला, तेव्हा अंजीलाही त्याने बरोबर नेले. तीही गेली.

शेकूला तिने सांगितले नाही, सवरले नाही. काचोळीची शपथ मोडून अंजीने शेकू सोडून दुसरा दाल्ला बघितला. त्यानंतर आठपंधरा दिवसांनी वटाभर गाजरे घेऊन शेकूची बायको माझ्याकडे आली. तिचा चेहरा फुललेला होता. गाजरे भुईवर ओतीत ती म्हणाली, “मास्तर, आलं आमचं खुळं माघारी !”
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
