दिनांक ४ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील रत्न कमल मंगल कार्यालयात श्री घनश्याम अण्णा शेलार मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमाने संपूर्ण शहरात उत्साह निर्माण केला. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे या दहीहंडीत खेळ किंवा मनोरंजन व्यतिरिक्त समाज प्रबोधनावर विशेष भर देण्यात आला. या प्रबोधनाच्या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील बहुसंख्य नागरिक या कीर्तनाला उपस्थित होते, ज्यामध्ये महिलांची संख्या विशेषतः लक्षवेधी होती. यावेळी, श्री इंदुरीकर महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली आणि त्यातून निघालेले पुस्तक, वह्या, तसेच शालेय उपयोगी साहित्य वितरित करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा शहरात दहीहंडी निमित्ताने चाललेल्या थिल्लर पणाचा अनुभव स्थानिक नागरिकांनी घेतला होता. त्यात फक्त तरुणाईची उपस्थिती असायची. मात्र, या प्रबोधन रुपी दहीहंडीत शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती, त्यामुळे इंदुरीकर महाराजांनी यावेळी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी श्री घनश्याम अण्णा शेलार यांचे याबाबत आभार मानले.
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर महाराजांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जेव्हा समाजात साधूचा अपमान होतो आणि धर्माचा नाश होतो, तेव्हा देव अवतार घेतो. या संदर्भात त्यांनी नामदेव महाराज, तुकाराम महाराजां सह संतांचे दाखले दिले. तसेच, देव सर्व समाजात माध्यम म्हणून वापरला जातो आणि धर्माचे भांडवल केले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराजांनी आजच्या पिढीला भजनाच्या माध्यमातून आचरण सुधारणे गरजेचे आहे, असे सांगितले. समाजात मुलं जास्त असूनही लग्न होत नाहीत, कारण मुलींच्या लायकीचे वर मिळणे आता कठीण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
इंदुरीकर महाराजांनी समाजातील विदारक स्थितीवरही प्रकाश टाकला. त्यांनी मोबाईलच्या अतिरेकाने तरुण पिढी कशी बरबाद होत चालली आहे, हे खेदाने नमूद केले. तसेच, समाजात व्यसनाधीनता कशी वाढत आहे, याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
या कार्यक्रमात महिलांच्या उपस्थितीने एक वेगळा माहोल निर्माण झाला होता. यावेळी, सौ. मीनाताई दिलीप गाडे यांच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया साठी मदत म्हणून फेरी काढून जमा करण्यात आलेली रक्कम त्यांना देण्यात आली. तसेच, तालुक्यातील एमपिएससी विद्यार्थ्यांना मदत म्हणून ए.पी.जी. अब्दुल कलाम अभ्यासिका व विठ्ठलराव कापसे वाचनालयांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी पुस्तके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी, इंदुरीकर महाराजांनी अंगातील ताकद आणि खिशातील पैसे जपून वापरण्याचा सल्ला दिला. त्यांनी प्रबोधनाच्या दहीहंडीच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आणि तो यापुढेही सुरू ठेवावा, असे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री घनश्याम अण्णा शेलार मित्र मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच, महाराजांनी श्री घनश्याम अण्णा शेलार यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
स्रोत: (प्रबोधनाची दहीहंडी)







