दिनांक १७ जुलै २०२४, अ. नगर:
आषाढी वारीच्या निमित्ताने जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने दिंडी मार्गावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातून विविध धार्मिक प्रतिष्ठान तसेच गावांमधून दोनशेहून अधिक दिंड्या आषाढी करीता पंढरपूरला जातात. गेली अनेक वर्षांची ही परंपरा सुरू आहे. मात्र मागील वर्षी सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर मंत्री विखे यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी दिंडी मार्गावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. यासाठी महसूल, आरोग्य, पाणी, स्वच्छता अशा सर्व विभागाच्या यंत्रणेतून या सुविधा दिंडीतील भक्तांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय केला होता.
यंदाच्या वर्षी सुध्दा या सुविधा उपलब्ध करून देत जिल्हा प्रशासनाने आपला सेवाभाव जोपासला आहे. नगर ते सोलापूर मार्गावर विशेषतः दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी या सर्व सुविधा उभारण्यात आल्या होत्या. पिण्याच्या पाण्यापासून ते आरोग्य सुविधांचा यामध्ये समावेश होता.
या सुविधांमुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांना कोणतीही अडचण आली नाही. प्रशासनाने सुध्दा या सर्व समन्वयासाठी अधिकाऱ्याच्या नेमणुका करून सुविधांवर देखरेख करण्यात येत होती. स्वतः जिल्हाधिकारी यामध्ये योग्य समन्वय राखून होते. जिल्ह्यातून गेलेल्या सर्व दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेटी घेतल्या.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






