फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग ११).

फकिरा..

मांगवाड्यात शिपाई गेला आणि सावळा आला . तो हुकूम ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी आले . तो खिन्न झाला . तो कापऱ्या आवाजात म्हणाला ,

” मी काय करू ? पांढरीचं मत काय ? “

” तू जा आता या घडीला . मी काहीच सांगत नाही , ” पंत उत्तरले नि सावळा म्हणाला ,

” निघायची तयारी करून येतो . “

कर जा !

” सावळा उठून निघाला . तो पोलीसही त्याच्यामागं चालू लागला . तेव्हा शंकरराव बिथरला ,

“ ए , मागं फिर ! तू कुठं निघालास ? सावळा परत येणार आहे . धडपडू नको . घाई करू नको !

” आणि हे पाहा- ” पंतानं सल्ला दिला , ” बेळगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाग. आडवंतिडवं बोलू नको. तो माणसाळलेला वाघ आहे. तुला फाडूनही टाकू शकेल. लक्षात ठेव !

पोलीस पुन्हा हबकून बसला. सर्व तयारी करून सावळा आला. तो ऐटबाज पटका बांधून, एक गठलं काखेला अडकवून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणं निघाला. हां हां म्हणता सर्वत्र बातमी गेली. लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले. मांगाची बायकापोरं डोळे टिपू लागली . घम्यानं हंबरडा फोडला . मांगाचा आघाडीवरचा तो चिराच निखळून निघाला होता.

माळापर्यंत लोक आले . त्यांनी सावळ्याला निरोप दिला. सावळ्यानं पंतांचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं म्हटलं,

” गावकर , माझी भाकरी पोकरी व्हतीया . वाईच नजर असू द्या . मी जातू , पर जर कमीअधिक झालं , तर मी न्हाय – तुम्हीच हायसा ! “

” तू जा , काळजी करू नको ! ‘ ‘ पंत उद्गारले .

सावळा सर्व मांगांना ओरडून म्हणाला, “ जावा, जावा . मी जातू. घाबरू नका . मी हाय . जर काय भानगड पैदा झाली, तर मी गोरीतनं परत येनार हाय . जावा , दाबात असा ! ” त्यानं दौलतीचे पाय धरले . भैरूला मिठी मारली . घम्याला पोटाशी धरले . बायकोला धीर दिला आणि पुढा फिरवला . तो बेळगावची वाट चालू लागला.

आज आपण आपल्या जन्म दिलेल्या गावाला , मातीला सोडून निघालो ; आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जगणार ; आपली मुलंमाणसं , गाव दिसणार नाही ; वतनदार असून परदेशी , घर असून वनवासी – आपलं कोण असणार तिथं ? या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारख्या काळजाचा तो सावळा लहान मुलाप्रमाणं ढसाढसा रडू लागला.

ज्या कायद्यानं सावळा बेळगावला गेला, त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला . हजारो मांगांना त्यानं वनवास दिला . हजारो पोराबाळांना नादार केलं . वतनापेक्षा जातीलाच महत्त्व प्राप्त झालं . मांग हा लायक असूच शकत नाही , असा नियम झाला . लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून, घरांपासून , पोराबाळांपासून अलग करून टाकण्यात आलं . मांग जातीतील झुंझार वृत्ती नमावी , नाहीशी व्हावी , त्यांनी लाचार व्हावं , हाच त्या कायद्याचा हेतू होता .

परागंदा केलेले मांग परगावात जे मिळेल ते काम करू लागले . कैकांनी आपली गावं सोडून , जमिनी सोडून बायकापोरं बरोबर नेली . ते फिरस्ते म्हणून फिरू लागले. त्या कायद्यानं आपला फास इतका आवळून टाकला, की मांग ही जात सांगणंही कठीण झालं . मांग म्हणाला की क्षमा नाही , हा अंमलदार लोकांचा खाक्याच ठरला. फिरते मांग स्वतःला मांग सांगण्याऐवजी जात चोरू लागले. कैक मांगांचे गारुडी बनले. महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तरवारीच्या धारेवर धरला.

सावळानं बेळगावात जाऊन वडाराचं दगड फोडायचं काम सुरू केलं ; पण गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती . तो बेचैन होत होता . जोगणी निघेल . बापू खोत येईल नि ती घेऊन जाईल – मग नाव जाईल , राणोजीचं बलिदान फुकट होईल . ती कल्पना सहन न होऊन त्यानं एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली ,

” मी हतं वडाराचं काम करून व्हाईन . कुनाच्या पाचोळ्यावर पाय देनार न्हाय- “

” ” मग तुझं म्हणणं काय ? ” अधिकाऱ्यानं विचारलं. “

मला दर वर्षी आषाढी अमावास्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी.

” ते तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे. ” अधिकारी म्हणाला आणि सावळा स्वच्छ वागू लागला . अगदी वडार बनला . अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त एक दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली. सावळा आषाढात जोगणीला हजर झाला . लांब दाढी वाढलेला सावळा कु – हाड घेऊन जोगणीबरोबर फिरला . रात्री सर्वांना भेटला. पंत, शंकरराव, दौलती, आपली बायकापोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला .

सावळा पुढं नियमानं येण्याची धडपड करू लागला. आपल्या जत्रेला आपण नाही गेलो, तर खोत येऊन जोगणी पळवील, म्हणून तो राबू लागला. दगड फोडू लागला . सर्व लोक त्याला वडार म्हणूनच ओळखू लागले आणि सावळा दिसेही तसाच .

गाव सोडल्यापासून चार वर्षं त्याला दर वर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली; परंतु पाचव्या वर्षी त्यांच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला. त्या नव्या अधिकाऱ्याला खूष करून हाताखाली घेण्यात सावळा अपेशी ठरला आणि त्यापुढे पाच वर्षे गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही . ती पाच वर्ष त्यानं झुरत काढली . घमांडी किंवा बायको – जे काही येई, तेच त्याला खुशाली सांगे आणि ती ऐकून त्याला समाधान होई.

आणि नवव्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला , तेव्हा त्याला सारंच एकदम बदललेलं दिसलं. ते जुने निवडुंगांचे डांग वाळून नवे तरतरून आले होते . त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती. मरायचं नाही, असं ठरवून जगलेला दौलती एक वेगळ्या समाधानाचे सुस्कारे टाकीत होता . त्यानं कुसळाएवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता . त्याच्या त्या पिळदार देहाला आता बाक आला होता. वाघासारख्या मिश्या रेशमासारख्या चमकत होत्या. पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या . त्याच्या शरीरातील भरीव हाडं लखलखत होती . कातड्याच्या आडून शिरा सणसणीत दिसत होत्या.

मुलाप्रमाणं नातवाचा लौकिक पाहून मग मरायचं , अशा निर्धारानं जगलेली राहीबाई निर्धास्त झाली होती . तिच्या मानेत कंप निर्माण झाला होता . डोकीचे केस पांढरे झाले होते . चेहरा सुरकुम्यांनी झाकाळला होता आणि आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखीत होती.

आपल्या कष्टाचं चीज झालं. असं राधाबाईला वाटत होतं. तिच्या अकरा वर्षांच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं , कुंकवावीणं जगणं दुर्धर असतं , पण तेच जिणं राधा जगली होती . आत तिच्या घरात एक नव्हे , दोन जवान मुलं कर्ती झाली होती . दौलती आणि राही यांच्या डोळ्यांपुढं दोन राणोजी वावरत होते . फकिरा- साधू हे घरचा सर्व भार सांभाळीत होते . त्यांच्या त्या जुन्या घरात नवं आनंददायी वारं खेळत होतं.

फकिरा आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते. त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळणं लावली होती. तो शांतपणे बोले, अन् मोजक बोले. तो आपल्याच धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड असे. आपणही पंतासारखं वागावं, असं त्याला वाटे. तो आता हट्ट करीत नव्हता, तर देव्हाऱ्यात ठेवलेली राणोजीची तलवार पुजीत होता . गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं . ते खोगीर नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता.

साधू सरकारी नोकरी सांभाळीत होता.

विष्णुपंत आता उतरणीला लागले होते . त्यांच्या पल्लेदार मिश्यांत करड दिसू लागली होती. रुंद, देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता . त्याचबरोबर त्यांच्या मुळच्या करारीपणात अधिक भर पडली होती.

शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता, म्हातारपणाने त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती; पण उरातील अहंकार संपला नव्हता. तो पूर्वीसारखाच होता. अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मरतात. शंकरराव पाटील त्यांपैकीच एक होता. भैरू , आप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती; परंतु जीवनातील तापट वृत्ती त्यांनी सोडली नव्हती . उलट , आता ती वाढली होती ! इशा, किशा, बळी, मुरारी, घम्या , भिवा ही पोरं आता मोटी होऊन वाघाप्रमाणं वागत होती.

हे सारं पाहून सावळ्याला आनंद आला.

आषाढी अमावास्येचा तो दिवस उगवला. गावात आनंद पसरला. जोगण्या पाहण्यासाठी गावोगावचे लोक आले. सकाळपासून गावात एकच घाई सुरू झाली.

“एवढी ईर्ष्या असंल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील, तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील! “हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता . त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज दहा वर्षे ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता. परंतु त्याला अपेशच आलं. त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळला होता.

जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही, तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जिवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू रामोशी, तायन्या महार यांनी बापूला निष्प्रभ केला होता. जोगणी परत आणण्यासाठी बापूने काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. सर्व खटपटी करूनूही त्याला यश आलं नव्हतं. सहा माणसं मरूनही जोगणी केल्यामुळं शिगावकरांचा हिय्याच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती; पण नेमकं तेच होत नव्हतं.

परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता. गावातली नेटकी पोरं त्याच्या कह्यात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं. इभ्रतीखातर मरावं, असंही अनेकांना वाटत होतं; पण आपल्या एकट्यानं काय होणार, असा पेच पडत होता.

बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतःकरणाने तो त्या रंडक्या जोग्याकडे पाहत होता ;

क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading