फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग १२).

फकिरा..

परंतु जोगणीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणीच जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता. कारण जोगणी म्हटलं, की त्याच्या डोळ्यांपुढे भैरू रामोशी आणि सावळा मांग कु-हाडी घेऊन नाचत. त्यामुळं मनातले विचार मनातच राहत. आपण जोगणीविषयी काही तरी बोलू आणि ती बातमी कोणी तरी भैयाला देईल – मग तो यम येऊन आपलं वाटोळं करील, असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करीत होती. त्यामुळं कैकांना धीर आला होता.

आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली. ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. ती सोयरीक जोडण्यासाठी त्याने चौदा हजार रुपये हुंडा दिला होता आणि तोही पुढला सगळा विचार करूनच. कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबां कडे ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करीत नसला, तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि सासऱ्याच्या विचाराप्रमाणं फिरणाराही होता. त्याच्या आडून किती तरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या. हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता.

सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते. बाजीबा चौफाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता,

” मला मरायची भीती नाही. माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे; पण मी एकटा काय करू? मला बळ असून त्याचा उपयोग नाही. पाठबळ हवं . एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो ; पण आता मी निश्चित सांगतो , की आमची जोगणी परत आलीच पाहिजे ! “

” मग काय करू या ? बोला- ” गज्या माळ्याचा गलू माळी नाक फुावून म्हणाला आणि बापूला गज्याच्या पराक्रमाची आठवण झाली . तो म्हणाला , “ गलू ! तुझ्या बापानं ‘ फेक भाला ‘ म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसकन टिपला . तसा वीर मला हवा ! “

” मग मी तयार हाय !’ बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला,

” हो, हो. म्या गजूची जखम बघितली व्हती. टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापतूर खाली उतरली व्हती . “

हे ऐकून बापू चरकला. कुंभाराला गप्प करून तो म्हणाला, ‘ झालं , ते गेलं त्याच्यासंगं . आता आजचं बोला. माझी पन्नास माणसं बाहेरची येणार आहेत. इथं सोप्यात-ही पन्नासएक भरतील आणि पाचपन्नास गावातून काढू या नि- “

” देऊ या दंगल उडवून ! ” ज्ञानू सुतार जोरात येऊन म्हणाला. “

हो , दंगल झाली पाहिजे ! ” खोत म्हणाला, ” आता ताणून धरण्यात अर्थ नाही . शेंडी तुटो का पारंबी तुटो ! जे होईल ते होईल ! “

” उघड हाणामारी करायची का ? ” एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला .

” नाही. माझा जावई आहे त्या गावात. तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत. त्यापैकी काही मांगांची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरायचं नि दंगल झाली, की जोगणीचा पिच्छा करणाराचे पाय तोडीत गावाकडे सटकायचं .

”’ बरं , भैया रामोशाचं काय करायचं ? ” दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला ,

” हो. भैया आणि सावळ्या हे दोघे तिथं असतील , तिथं आपली आठ माणसं असणार नि दंगलीत प्रथम हे दोन मुडदे खाली पडतील- “

” मग जमलं ! … मग जमलं ! … ” सोप्यात एकच आवाज घुमला. जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुडदे पडले, आता त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं.

खलबत झालं. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागले. एखाद्या युद्धाची तयारी करावी , तशी बापूनं तयारी केली. घोंगड्यांच्या भाळीत हत्यारं घेऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली. काही जाऊन पोहोचले. काही पांगून बसले. कोण भैयाला शोधू लागले. कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले. ते सारेजण गर्दीत मिसळून गेले.

आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं. सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता. त्याच्या किरणांतील प्रखरता किंचित थंड झाली होती. मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता. गावातली लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होती. पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकीत होत्या. दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती.

जोगणी निघायची वेळ जवळ आली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती, राही, राधा गावात आली – गेली होती. गाव माणसांनी गजबजला होता. बारा बलुती धावपळ करीत होती. शंकररावांना आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता. रेशमी आबदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जिनालाच तलवार खुटवून स्वारी वर बसली होती.

रिवाजाप्रमाणे मांगांची तलवार वाजत – गाजत निघाली . मुरा, बळी, किसना, घमांडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिंचणीकर पिराजी, साजूरकर निळाजी, धोंचीकर बळी हे मातब्बर मांग त्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या. कैक भाले, कुन्हाडी लखलखत निघाल्या . हलगी कडाडू लागली. एकदम सारी जत्रा म्हणाली : ‘आली मांगाची तलवार!

फकिरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देव्हाऱ्यातील ती तलवार घेऊन तो निघाला . इतक्यात बोलावणं आलं,

” ताबडतोब ये!

फकिरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाडीमार्गानं पंतांच्या वाड्याकडं वावटीप्रमाणं निघाला. मार्गात दबा धरून गलू माळी बसला होता, त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकऱ्याला विचारलं,

” ह्यो कोन ? “

” ह्यो फकिरा . ” त्यानं उत्तर दिलं.

फकिरा.पंतांच्या वाड्यात गेला, तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघं चिंतातूर होऊन बसले होते . त्यांचे चेहरे पाहताच फकिराला शंका आली. काही तरी नक्कीच घडलं आहे ! त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत. तो खाली उतरुन आत गेला.

फकिरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले. तेही चिंतातुरच दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले,

‘ फकिरा , आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरले ” आहेत- “

” कोण म्हनतं ?

‘ सावळा आणि भैरू !

फकिराच्या कपाळावर आठी उमटली. तो सावळाला म्हणाला,

” मग आधीच न्हाय का सांगायचं ? परस्पर बंदोबस्त केला असता-

‘ हे ऐकून सावळा म्हणाला, “ पंतांच्या कानावर घातल्याखेरीज कसा- “

” हो ” , भैरू म्हणाला, ” न्हाय तर आंगलट याची भानगड .

” काहीही असो “, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले , ” आधी काय आणि नंतर काय , जी खबर मिळाली, ती महत्त्वाची. आम्ही सावध झालो. बेसावध असतो, तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा . सावळा, भैरू, – तुम्ही जुनी माणसं पोरांना लढाई शिकवा. ” पंत एकदम थांबले. त्यांनी फकिराला डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत न्याहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ” ही तलवार राणोजीची ? ‘

” हो. ” एवढंच म्हणून फकिराने होकारार्थी मान डोलावली.

पंत म्हणाले , ” फकिरा- “

एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले . त्यांनी वळून सनदी शिपायाला हुकमी आवाजात सांगितलं, “ नाथा, शंकररावांना मी बोलावलं म्हणून सांग. तातडीनं जा !

” नाथा पळतच गेला आणिपंत आवाज चढवून बोलू लागले, “

फकिरा , बापू खोतानं आमच्या हद्दीत शिरून राणोजीचं शिर मारलं आहे. जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील … तर … त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नको. तुझ्या हातातील तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे !

” हे ऐकून फकिरा काहीच बोलला नाही. उगीचच त्याचे डोळे पाण्यानं भरले. उरातील हिंमत उसळून ती डोळ्यांत तरळू लागली आणि सावळा म्हणाला,

” खोत शिवभाईर नेला , तर मी सरगाला जाईन ! “

” जावा . झटून प्रयत्न करा . थांबू नका ! मीही जोगण्या काढाया निघतोय. “

— फकिरा , सावळा , भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले , त्यांना पंत म्हणाले , “ पाटील, गावात काय घडामोडी होत आहेत ? ‘

” बरं झालं , तुम्ही बोलावलं. ” पाटील म्हणाला ,” ह्या वर्षी गावात काही तरी घडणार , असं वाटतंय. बुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागली आहेत आणि रावसाहेबांच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत. ‘

” म्हणजे खोतानं आमच्याखाली कोठार पुरुन ठेवलं असून ते पेटणार आहे. ” पंत म्हणाले. “

पेटू द्या. दहा वर्षं झाली. जिवाला अटण लागली आहे. ‘ पाटील चिडून बोलू लागला, “ एकदाचा शेवट होऊ दे . आजच जर- ‘

‘आजच लागणार आहे शेवट! ‘ ‘ पंत मध्येच म्हणाले, “ खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली, की फकिराची पाठ राखा. मी जोगणी काढतो. जा तुम्ही ! ” असं म्हणून पंत थांबले. पाटील काहीच बोलला नाही ; परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरारली. पाटलानं एकदम पंताला मिठी मारली आणि पंतांच्या हातांनी शंकररावाला विळखा घातला . पाटील उद्गारला,

” आता जगलो, तरच भेट ! “

सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला. शिंग वाजलं आणि जोगणी निघाली. एकच नाद उठला. आकाशाला गचके बसू लागले. धनगरी ढोलानं घरांवर कौलं नाचू लागली . ढबंव … ढबंव … ढबंव ! ताशा आणि मांग – हालगी यांनी माणसाचे शब्द मुके केले.

हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली. महाराच्या थळाजवळ दौलती, राही आणि राधा ही जोगणीची वाट पाहत उभी होती. ती त्यांची दरवर्षीची जागा होती.

जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकिरानं साधूला जवळ बोलावून म्हटलं, “तू माझ्या मागं आस. माझ्यावर मागनं येनाऱ्याचा मुडदा पाड. मुराला हकडं बोलावं ! ‘ ‘ असं म्हणून त्यानं वळून पाहिलं. शंकरराव जवळून घोडा आवरीत चालला होता. ‘ मी आहे ‘ अशी डोळ्यानं खूण केली. मुरा आला. तो फकिराला आता दाजी म्हणत होता. त्यानं विचारलं, ” काय , दाजी ? “

क्रमशः

स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading