फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग १३).

फकिरा..

वाईच जपून . दगा व्हनार हाय ! ” गबऱ्यावरून चालता चालता फकिर । वाकून म्हणाला , ” बरोबरीच्या गड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करील , त्याची झपाट्यात मान उतरा . चिंचनीकर , साजूरकर नि धोंचीकर ह्यास्नी म्हनावं , हटू नका ! जा .

मुरा गेला . बळीला सांगितलं . एकमेकांनी एकमेकांना खवर दिली . बळी गर्रकन फिरून फकिराजवळ येऊन टाचा वर करून म्हणाला , ” दाजी , शिगावची किती मानसं असतील ?

” हे ऐकून फकिरा चिडक्या सुरात म्हणाला , ” किती बी दोनशे , हजार ! पुढं येनाराचं खांडुळं करा . जा . रामुश्यास्नी सांगा !

” खबर सर्वत्र पोचली . किंचित चोरटी हालचाल झाली . रामोश्यांनी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसांजवळ देऊन ते सरळ झाले . जोगणीजवळ असलेली पोरं नाहीशी झाली . ज्या बाजूला मोकळीक असेल , त्याच बाजूला फकिराचा गबऱ्या वळत होता आणि जिकडे फकिरा जाई , तिकडे साधू जात होता . त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवीत होता . पुढं भैरू निसावळा , शिवाय पंतांचा घोडा होता .

वातावरण तापलं . झटापट क्षणोक्षणी जवळ येऊ लागली . फकिराची पापणी हलेनाशी झाली . जोगणी थळात आली .

दौलतीनं नमस्कार करून मिशीला स्पर्श केला. राहीबाईच्या डोळ्यांपुढं राणोजी उभा राहिला . राधाबाईनं फकिरा – साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली . जोगणी पुढे सरकली . नवखी माणसं लगट करू लागली . हत्यारं जिभा चाटू लागली .

जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडीमार्गानं मांगांच्या चिंचेखालून सरळ आपला घोडा फेकीत बापू खोत पुढं आला . त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं . नजरा चढल्या . पहाऱ्याची पकड सैल झाली आणि जोगणीभोवती एकच मुरकुंड पडली . लगेच रामोशी परत फिरले , मांग उलटले , तरवारी चालू लागल्या . माणसं तुटून पडू लागली . सावळा , मुरा , बळी , निळू , भिवा , ईश्वरा रक्तबंबाळ झाले . भैरूनं डोळे झाकून कु – हाड चालू केली .

परंतु फकिरा जागचा हालला नाही . तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता . दंगल शिगेला पोचली . कोण तरी ओरडलंः ‘ जोगणी गेली !

‘ एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला . फकिरानं गबऱ्याला हळूच टाच मारली . फकिरानं जागा सोडताच साधूही धावला. शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता . फकिरा काय करणार , याचं त्याला कोडं पडलं होतं .

गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलट फिरविला आणि … आणि फकिराचा गबऱ्या भरभरला .

जोगणीजवळची दंगल मांग – रामोश्यांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले , तेव्हा फकिरा बापू खोताच्या मागं जाऊन बिलगला होता . सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यांसमारे ती दोन कारवानी घोडी पळत होती . अखेर जोगणी गेली – म्हणून सर्वांनी निःश्वास कोंडून टाकले . पळत पळत फकिरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण करून टाकलं . तरीही चिडक्या खोतानं तलवार उक्षारली . त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकिरानं मुठीसकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला .

हातासह हत्यार गमावलेला खोत क्षणात गांगरला . त्यानं पटकन घोड्यावरून अंगच टाकलं आणि गबऱ्यापुढं झुकांडला . परंतु दुसऱ्याच क्षणी गर्रकन फिरून तो उलटला . तो तसाच भरवेगात खोताच्या अंगावरून पुढं गेला . खोत टापांखाली तुडवून पुन्हा गबऱ्याला उलट वळवून फकिरा परतला. गडबडीनं उठून खोत केविलवाणा चेहरा करून म्हणाला , ” मला मारू नको . ही जोगणी-

” फकिराला धीरच झाला नाही . माणसाला ठार मारणं सोपं नसतं . त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली ,

“ ठीक . ती तलवार तितंच पडू दे . तो घोडा नि जीव घेऊन पळ . परत हिकडं बघू नगं . हातं फकिरा नावाचं मरान गबऱ्यावर बसून फिरत असतं-

” बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकिराकडे धावत आले . पंतांनी गर्दीत शिरून विचारलं ,

” फकिरा , काय झालं ? “

फकिरानं ती मुठीसकट तुटून पडलेली तलवार दाखविली आणि जोगणी पुढं ठेवली . सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली . पंत गालात हसत म्हणाले ,

” तू त्याचं डोकं का मारलं नाहीस ? “

” ते त्याचं डोस्कंच हाय ! ” खोताच्या तलवारीकडे बोट करून फकिरा उत्तरला आणि पंतांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली .

” बापाचं नाव राखलंस ! “

” हा काटा काढून माझा जीव मोकळा केलास ! ” शंकररावानं फकिराला मिठी मारीत म्हटलं आणि फकिरा ओरडला , ” जोगणी खोताकडं कुनी दिली ? “

“ सातारच्या दुला मांगानं . ” मुरा म्हणाला .

” कुठाय त्यो ? “

” चावडीत ! चला . ‘ ‘ पंत म्हणाले , ” जोगणी पुढं चालू द्या .

” खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या . पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली . दौलती , राहीबाई , राधा यांनी फकिराला मिठ्या मारल्या . राधानं फकिराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे पाहिलं . तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली . लहानपणी फकिरा व साधू बापाला नैवैद्य दाखवायला गेले होते , तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाला माती लागली होती . ती माती पुसून निघेल , असं वाटून तिनं हात आवरला होता आणि स्वतःचे आसू पुसले होते .

लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या . जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले . तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि भैरू पहारा करीत बसले होते . रात्री त्याची चौकशी झाली . त्यानं डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकली .

दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता . तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बराच हुद्याला चढला होता . साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती . पुढं त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता . इथं तो रावसाहेबांच्या वाड्यात दोन दिवस पाटील म्हणूनच राहत होता . त्यानंच गावात दंगल करावयाचे सर्व डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते . आणि ते रावसाहेबांना माहीत होते .

ही सारी हकीकत ऐकून पंतांचं व शंकररावांचं डोकं सुन्न झालं . रावसाहेब खोताला सामील आहे , हे कळताच साप आपल्या उशाखाली आहे, असं शंकररावाला वाटलं. परंतु त्या संकटाची तोंडओळख झाल्यानं त्याला आनंदही झाला.

दुलारी सरकारी माणूस आहे, हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली, ” तू सरकारी चाकर असून, ह्या झगड्यात पडू नये, तो पडलास . सरकारी नोकर , म्हणून तुला आम्ही एक वेळ क्षमा करून सोडत आहोत. तू आत्ताच्या आत्ता निघून जा ! “

” पन मला मांग रामूशी जाऊ देनार न्हायती . ” दुलारी रडत म्हणाला . ” ठीक आहे . आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ . ” असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं , ” भैरू , याला शिगावला पोचव ! “

आणि भैरू आपणाला पोचवणार, हे ऐकून दुलारी अधिकच रडू लागला. तो म्हणाला, “ह्यो मला शिगावऐवजी सरगाला पोचवील ! “

हेही जोगणी प्रकरण भलतंच दणाणलं. जत्रेला आलेली हजारो माणसं जाताना फकिराची तारीफ करीत परतली. फुलांतील मधमाश्यांनी पळवावा, तद्वत माणसानी फकिराची कीर्ती गावोगाव पोचवली. जो तो म्हणू लागला ‘ फकिरा जबर माणूस ! त्यानं खोताला चीत केलं. मुठीसकट तलवार मारून त्या विंचवाची नांगीच मारली.खोत निकामी केला !

‘फकिराच्या त्या दिवशीच्या वर्तनावर गाव बेहद्द खूष झाला. फकिरानं आपल्या पराक्रमाला घोडदौडीनं प्रारंभ केला. दौलती, राही, राधा यांच्यापेक्षाही” सावळा आणि भैरू यांना आनंद झाला. ते आपल्या जखमा विसरले. कर्तबगार माणसाची कीर्ती दिगंतरास जाते. ती ऐकून इतरांना क्षणभर आश्चर्य वाटतं; पण त्या कीर्तीच्या पाठीशी असलेला त्याग नि झीज ह्याकडे त्यांचं लक्ष नसतं .

सकाळीच सावळा बेळगावला निघाला . जाताना तो प्रथम फकिराकडे आला . त्यानं फकिराला मिठी मारली . त्याचे डोळे भरून आले आणि तो मोठ्यानं हसू लागला . त्याचं ते हसणं पाहून फकिरा गोंधळून गेला . दौलती , राही , राधा , साधू यांना नवल वाटलं .

‘ का हसतूस , गा? ” फकिरानं विचारलं आणि सावळा म्हणाला ,

” मला जुनी याद आली . तुम्ही लस्कर बघाय गेला नि मी दौलू आबाबरं भांडलो त्येची मला आज याद आली ‘ असं म्हणून तो पुन्हा गंभीर झाला . त्यानं भुवया चढवल्या . नाक फेंदारलं आणि तो म्हणाला , ” काल नाव गाजवलंस माझ्या मनाजोगं झालं . शेनातला किडा शेनात ऱ्हात न्हाय ! ‘

‘आता कवा येणार ? ” फकिरानं विचारलं .

” ते मी कसं सांगू ? ‘ ‘ सावळा लाचार स्वरात म्हणाला , “ जरी एखादा खून केला असता , तरी बरं झालं असतं . काळं पानी भोगून आलो असतो . पर ह्यो काळ्यापान्यापरास वंगाळ कायदा माझ्यामागं लागलाय.

” ‘ काय खटपट न्हाय का व्हनार ? ‘ फकिरा बोलला . “

कोन करनार ? ” सावळा चिडला नि म्हणाला, “ आम्ही मुकी मानसं . त्यात कानफाटी . आमचं कानावर कोन घेनार ?

” ” पंतास्नी न्हाय का सांगायचं ? ” “

काय सांगू ? त्येस्नी न्हाय का दिसत ?

” ” बरं , मी बोलतो एकदा . “

बोल . करा काई तरी . ” सावळा दुखावल्यासारखा बोलू लागला , ” आठनऊ वसं काढली . लई वंगाळ काढली . वतनदार असून वनवासी झालोय . आता- ‘ ‘ तो बोलता बोलता थांबला . त्याचा गळा दाटून आला आणि फकिरा म्हणाला ,

‘ आता काय ? “

‘ आता गाव सोडू नये , असं वाटतंय !

” हे ऐकून फकिरा खिन्न झाला . त्याच्या काळजाला चिमटा बसला . तो हुकमी आवाजात म्हणाला , “ तू आता जा . मी गप्प बसनार न्हाय नि पंतास्नी बी बसू देनार न्हाय ! “

“ हो , हो . ” सावळा एकदम हसरा चेहरा करीत म्हणाला , परमुलखात मरू दिऊ नगा . माझी हाडं हातं माझ्या पांढरीत पडावी . माझ्या मढ्याला साऱ्यांचं हात लागावं.म्या तकडं कुत्राच्या मोतीनं मरू नये, असं मला वाटतं.

” फकिराच्या वर्मी बाण लागला. तो संतापून म्हणाला,

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading