फकिरा..
” म्हणजे खोत जी जोगणी परत नेत असता हा प्रकार घडला , तर ! ” प्रांत म्हणाला .
त्यावर पंत म्हणाले , आणि त्या कामी तुमचा दुलारी मांग त्या खोताला मदत करीत होता . आम्ही त्याला अटक करून सरकारी नोकर म्हणून सोडला . रिवाजाप्रमाणे त्याचंही डोकं मारणं सहज सोपं होतं .
” हे ऐकून प्रांताला राग आला . त्यानं लगेच दुलारीला बोलावून घेतलं आणि विचारलं ,
” जोगणीच्या दंगलीत तू होतास ? ”
” हो , व्हतो . पन बघत व्हतो .
” खोटं बोलतो आहे हा ! ” पंत म्हणाले , ” यानं ती वाटी हिसकून खोताला दिली- ”
” काय ? खरं का ? ” प्रांत डाफरला . आणि दुलारी रडू लागला . तो केविलवाणा चेहरा करून म्हणाला , ” मला बाबरखानसाहेबानं सांगितलं- “
” मग खोटं का बोललास ? ” प्रांत चिडला .
” माझ्या गावचे मांग असले नाहीत . ” पंत म्हणाले , “ म्हणूनच म्हणतो , मांग जात इथून तिथून सारखी धरता येत नाही . कारण मोळापोटी केरसुणीही पैदा होत असते .
” मग प्रांत काहीच बोलला नाही . पंत उठून सज्जनगडावर जाण्यासाठी निघून गेले . कबूल केल्याप्रमाणे सातारचा दपाटा बेळगावला गेला . सावळाच्या वर्तनाची नोंद सातारला आली आणि त्याची हद्दपारी रद्द केल्याचा हुकूम रवाना झाला .
सावळा गावी आला , तेव्हा नाचत आला . त्याला हर्षवायू व्हायची पाळी आली . आल्याबरोबर त्यानं फकिराचे पाय धरले . दौलती , राहीबाई , राधा यांच्या पाया पडून तो गावात गेला . पंतांपुढं त्यानं दंडवत घातला .
‘ आता मी माझ्या पांढरीत मरंन . माझी बायकोपोरं मला बघीतल- ” असं म्हणत तो गावभर फिरला . भैरूला कडकडून भेटला .
आता आपण कुणाच्या पाचोळ्यावर पाय द्यायचा नाही , आगळीक करायची नाही , बायकापोरांत कष्ट करून जगायचं . कष्टानं मातीचं सोनं होतं , वाईट कायदा कुत्र्यावाणी असतो , असं तो सांगत फिरला .
सावळा आल्यानं त्याच्या घरात नवा तजेला आला . मांगांना धीर वाटला . गावालाही बरं वाटले . एक जवळचा दुरावलेला दिलदार माणूस जवळ आला , म्हणून फकिरालाही आनंद झाला .
फकिराच्या शब्दावर पंत सातारला गेले नि सरकारशी भांडले , म्हणूनच सावळाला नवा जन्म आला ; फकिरानं त्याला माणसात आणला ; नाही तर तो कुजून मेला असता , असं मांग म्हणू लागले . फकिराच्या शब्दाची किंमत त्यांना समजली.आणि त्या वयात ते त्याला आपला कर्ता पुढारी समजू लागले .
दूरदूरचे मांग येऊन त्याला पाहून जाऊ लागले . फकिराचे मैतर झाले . विंचू ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकिरा लोकांना आगळा वाटू लागला .
आणि राधालाही तो तसाच वाटू लागला . ती लहानपणापासून त्याला भीत आली होती . आताही ती भीत होती . ज्या दिवशी तो रागानं चिंचेवर चढून बसला , त्या दिवसापासून राधा त्याला चढत्या सुरात कधीच बोलली नाही . कधी राग आला , तर ती गिळून घेई . आता पुन्हा तिला हुरहुर लागली होती . आपलं कुंकू गाजलं . -आता आपली कुसही गाजणार ! पण पुढं काय ? खोत गप्प बसणार नाही . हात तुटला म्हणून काय झालं ? एक पाय मोडला , म्हणून गोम लंगडत नाही आणि तो खोत तर भयाण माणूस आहे . तो स्वस्थ न बसता सूड घेणार . त्यानं जर सूड घेतला , तर ?
ती कल्पना तिला असह्य झाली ; पण करणार काय ? फकिराला कसं सांगावं , हा प्रश्न होता . रोज नवेनवे लोक त्याला भेटत होते . तो चिंचणीकर पिराजी , साजूरकर निळू आणि कैक रामोशी , कैक मराठे आणि तो कुमजेचा सत्त्या – त्यानं तर उघड बंड केलं आहे . त्याला तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम सुटलाय म्हणे नि त्याची फकिराशी मैत्री … सत्तू येऊन फकिराला भेटून जातो . ही सारी माणसं फकिरासारखीच दिसतात . फकिराही घोडं कुठं तरी जात असतो . रात्री – अपरात्री येतो . जर एखादे दिवशी त्या खोतानं वेळ साधली , तर ?
या विचारांच्या जाचात राधानं किती तरी दिवस काढले आणि एकदा तिनं निश्चय केला की , फकिराला बोलायचंच .
एकदा फकिरा दोन दिवस कुठंतरी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटेस आला . चिंचेखाली येताच गबऱ्याच्या टापा ऐकून राधानं डोळे उघडले . तीन दिवस ती भिंतीला टेकून बसली होती . तिनं अन्नाचा घास घेतला नव्हता . गुडघ्यावर हनुवटी टेकून दौलती वाट पाहत होता . राहीबाई डोळे पुसत होती . पहाटे फकिरा आल्यानं सर्वांचा आत्मा शांत झाला . फकिरा घोडं बांधून घरात आला , तेव्हा दिवा जळत होता . राधाबाई भिंतीला टेकून बसली होती . दौलती खिन्न होऊन बसला होता .
ही सर्व परिस्थिती पाहून फकिराला चरका बसला . तो म्हणाला , ” आई ”
राधाच्या गालांवर आसवांची धार चमकली , ती पाहून फकिराचा आवाज चढला .
” आई , काय झालं ? साधू कुठाय ? “
” चावडीत . ” दौलती म्हणाला .
” आई , का रडतीस ? बोलत का न्हाई ?
“” ” माझं रडं कुनालाच न्हाय कळायचं .
” का ? सांग की . ” फकिरा जवळ बसला आणि राधा म्हणाली,
” कसं सांगू ? मला जलमभर तुझी भीती वाटली नि आता बी वाटतीय . ”
” माझी भीती ? आगं , तू माझी आई
” आई ? ”
” हो , हो . माझी आई ! “
” मग कुठं गेला व्हतास ? ”
” चिंचनीला – पिराजीकडं . ”
” कुनाला इचारलं व्हतं ? ‘
” कुनाला न्हाय इचारलं . ”
” का ? आम्ही तीन जिवांनी दिव्यावानी जळायचं ? “
‘ आई ! थोरले आई , बाबा , माझं चुकलं . “
” तुझ्या आईनं तीन दिस पानी शिवलं न्हाई . ” दौलती राधाकडे बोट दाखवीत म्हणाला , ” ही म्हातारी पाखरावानी वाट बघीत बसलीया . अन्न असून घास उतरंना , बाब्या
” पन तुम्ही एवढी काळजी का करता ? मी आता का प्वार हाय ? ”
” तू मोटा हाईस . ” राधा म्हणाली , ” पन ह्या काळजाला कसं सांगू ? खोतासारखा वैरी दोन पिढ्या मागं लागलाय . दुखवलेला साप परवाच बिळात गेलाय . आमास्नी त्येची भीती वाटती- “
” पर मी भीत न्हाय . ” फकिरा म्हणाला , ” आनी तो कवाबी येऊ दे . त्येनं नुसती फडी जरी वर केली , तरी मी त्येला चेचून काढीन ! मी सावध हाय नि मला सारं ठावं हाय . आपल्या गावचा रावसाहेब पाटील , त्यो काळगावचा धोंडी चौघला – ही खोताची बिळं हायती . आनी त्या बिळांवर माझी नजर हाय .
” पर पांदीनं जाऊ नगं , माझ्या आंगावरनं जा , असं म्हननं बरं नसतं . ‘ ‘ दौलती बोलला आणि फकिरा हसत म्हणाला ,
” मी तसं कसं बरं म्हनीन ? मी कुनाच्या अंगावर जानार न्हाय नि कुनाला येऊबी देनार न्हाय .
‘ आनी असाच रातचा – अपरातचा फिरत व्हानार ? ” मध्येच राही म्हणाली .
‘ न्हाय बरं- ‘ ” फकिरा म्हणाला ,
” आता तुमास्नी इचारल्यावाचून कुटंच जानार न्हाय .
” एवढंच कर . ‘ ‘ दौलती पुटपुटला नि फकिरा म्हणाला ,
” मला वाटलं , तुम्ही बिनघोरी असाल- “
” म्हंजी आमास्नी तुझी काळजी न्हाय , असंच न्हवं ! ” राधा म्हणाली , ” मी बोलत न्हाय . कारन नखाएवढा व्हतास , तवा ऐकलं न्हाईस – तोंड पोळलं- “
” आगं , तवा मी बच्चा व्हतो . ” फकिरा म्हणाला , ” आता परत चिंचंवर चढून खाली उडी टाकीन , असं मी म्हननार न्हाय ! खरंच आई ! “
” काय नेम सांगावा , बाबा , तुझा ! ‘ राधा कौतुकानं म्हणाली आणि फकिरा हसला .
” माझं नशीब शिकंदर हाय – तू माझीच आई हाईस . तू बोल मला . तू बाबा – थोरली आई , आरं तुम्ही सारी माझी पंढरी हायसा- ‘ ‘ फकिरानं त्या सर्वांच्या पुढं डोकं टेकलं . त्याबरोबर त्या तीन आत्म्यांना कळ आली . दौलती कळवळ्यानं पुढं सरकला . त्यानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला . राधाच्या डोळ्यांत सागर उसळला . राहीनं उठून मिरच्या उतरून टाकल्या . ती म्हणाली , ” तुम्ही दोघांसाठी म्हनून आम्ही जगलो . ”
” तुझा बाप तुझ्यावानीच व्हता . ” दौलती म्हणाला ; ” जोगणीला हात घालीस्तवर कुनालाच बोलला न्हाय- “
” तसं तेवढं तू करू नगं ! ‘ ‘ राधा म्हणाली , ” जे जे करशील , ते आमास्नी सांगून कर ! “
सूर्य उगवून वर आला . पहिली किरणं रांगत रांगत दौलतीच्या खोपटात शिरली . निवडुंगावर पाखरं भिरभिरू लागली . रात्रभर दौड मारून आलेला गबऱ्या फुरफुरू लागला . बोलण्याच्या भरात चुकून राहिलेली कोंबडी खुराड्यात धडपडली . राधाचं मन हलकं झालं . ती उठली . उठता उठता पुन्हा म्हणाली ,
” चांगली मानसं जोडावी , वाईचाची संगत करू नये . जिवाला जपावं . एवढंच आमास्नी कळतं- “
” आनी तेवढंच मला बी कळतं . ‘ फकिरा म्हणाला , ” माझी मानसं नुसती चिऱ्यासारखी हायती . जिथं बसवलं , तिथं बसनारी . आनी , आई ! मरान मानसाच्या पुढं जन्माला येतं आनी ते मानसाला घेऊनच मरतं ; पन मानसाचं मागं उरतं काय ? “
“ नाव – चांगुलपन . ” राधा मध्येच म्हणाली .
” आनी त्येच मला मिळवायचं हाय . तूच मला शिकवलंस , की मानसानं वाईट वागू नये , म्हनून . मी ते इसरत न्हाय – इसरनार न्हाय . पन- ‘
” पन काय ? ”
” तू रडायचं न्हाय . हे ऐकून ती हसली .
दिवस सुगीचे होते . दुःखाची जागा सुखानं घेतली होती . श्रीमंतीचं शिवार धुंद झालं होतं . पाखरं गुटगुटीत झाली होती . किडे माजले होते . गुरं उंडारली होती . माणसं दोन वेळा पोटभर खाऊन ढेकर देत होती . दिवसभर रानामाळात गेलेली माणसं घराकडे येत होती . रविनारायण आपल्या दारात उभा होता . त्याची ती पिवळी ऊन्हं हिरव्या निवडुंगावर पसरून एक नवाच रंग डोळे दिपवीत होता .
मांगांची पोरं कुंथत चक्र फिरवीत होती आणि सूर्याकडे पाहत मांग पेढाला
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
