फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग १९).

फकिरा..

होते . फकिरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता . साधू , सावळा , पिरा , मुरा , बळी अशी पन्नास माणसं दौडत होती . फकिराचं घोडं दुडक्या चालीवर पळत होतं . गावदरीला एक माणूस आडवा आला . त्यानं विचारलं ,

” कोन चाललंय ते ? ‘

” कोन आकाराम ? ” गोंदाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकिरानं घोडं उभं केलं

. ” मग गोंदानं विचारलं ,

” हं , कसं काय ? सत्तू कुटं हाय ? ”

“ मळीला पानवठ्याच्या वरल्या शेवऱ्यात . ” आकाराम म्हणाला , “ उमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठिवलाय . आम्ही आता मळीच येडलीया- “

” शाबास ! ” फकिरा म्हणाला , ” हं , चला . ” त्यानं टाच मारली आणि ते सर्व पांदीनं मळीकडे निघाले . फकिरानं वास घेतला . माशांचा हिवळ वास आला . शेजारी भुयांची घरं दिसत होती . त्यांची जाळी कुपावर वाळत पडली होती .

फकिरा सावळाला म्हणाला ,

” सावळूनाना , त्यातली दोन जाळी घे अन् चल !

” ते पाठवठ्याला आले . फकिरानं आपलं घोडं किंजाळात बांधून कंबर बांधली . सावळा आणि बळी यांनी भुई होऊन , दिवटी घेऊन नदीनं वर यायचं नि बाकीच्या लोकांनी जिथं सत्तू आहे , तिथपर्यंत गुमान जायचं आणि उमा चौघुल्याच्या लोकांचं लक्ष त्या दिवट्यांकडे वळताच हल्ला चढवायचा , असा सारा बेत करून ते आपापल्या मार्गाला लागले .

रात्रीची मिठी सैल होत होती आणि जसजशी रात्र संपत होती , तसतसा उमा उतावळा होत होता . तो बावरून कानोसा घेत फिरत होता . एकाएकी नदीत खळखळाट झाला आणि उमा डाफरला ,

” कबीरा ? “

” जी . ” कबीर धावत आला .

‘ काय दिसलं ? ”

” दरड कोलमडली पाण्यात . ‘

” दहाजणं खोपीजवळ असा , जा ! ” कबीरा गेला . थोड्या वेळानं सावळा आणि बळी नदीनं वर आले . त्यांच्या हातातील दिवट्या पाहून उमा चमकला . त्यानं निजलेल्या दादाला उठवलं . एवढ्यात एक इसम धडधड धावत आला .

” काय , रं ? काय झालं ? ” उमानं विचारलं .

” मला काय तरी दिसलं . ” तो इसम म्हणाला .

” काय दिसलं ? ” उमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला , , ”

” ” डुकार असंल- “”

मग डुकरासारखा पळतोस का ? ” उमा रागावला आणि त्या दिवट्या जवळ आल्या . त्यांचा गंभीर प्रकाश वारणेवर थरथरू लागला . त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोके खाऊ लागल्या . उमानं दरडावून विचारलं ,

” कोन आहे ते ? “

‘ आमी भुई हाय . ” त्याबरोबर सर्वच लोक त्या दिवट्यांकडे पाहत राहिले आणि फकिरानं एकदम हल्ला चढवला . दणादण कु – हाडी आदळू लागल्या . ‘ आलं , मेलो , ‘ धावा ‘ एकच दंगल उडाली . धडाधड माणसं कोसळू लागली . हातात तलवार घेऊन फकिरा चपळाईनं पुढं धावला आणि पुढं उमानं तळहातावर धुंकून कु – हाड फिरवली . तो खोपीकडे मटकन निघाला आणि गोंधळी फकिराला म्हणाला ,

” दाजी , उम्या आला ! “

” येऊ दे . ” असं म्हणून फकिरानं उमावर झेप घेतली . तोच साधू ओरडला , “ पाडा त्याला खाली ! ” मुरानं उमाला मध्येच आडवला . फकिरानं सत्तूचे दोन कापून त्याला मोकळा केला आणि आकारामानं एक कु – हाड त्याच्या मुठीत दिली . ती मुठीत आवळीत सत्तू म्हणाला ,

” हं , आता मागं सरा . कुठाय उमा चौघुला ?

” मुग़नं उमाला जखमी केला होता . दादा पाटील पायाला कु – हाड लागल्यानं लंगडत माघार घेत होता आणि जेव्हा सत्तू सुटल्याचं सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा एकच पळापळ सुरू झाली . उमा आणि दादा यांनी नदीत उड्या घेतल्या . साऱ्या शेवऱ्यात उमाची माणसं पांगली . रात्री पळत्याचा पिच्छा करू नये , म्हणून फकिरानं आपली माणसं एकत्र केली . दंगल शांत झालो . फकिरा आणि सत्तू दोघे होते , म्हणून उमा पळाला , नाही तर त्यानं कहर केला असता, याची सर्वांना कल्पना होती.

सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तूनं हातातील कु – हाड टाकून फकिराला मिठी मारली आणि तो म्हणाला ,

” नाईक , तुम्ही आला , म्हणून हा सत्तू वाचला . आता तुम्हाला माझ्या कैक आयाबहिनी , हा सारा वारनाकाठ दुवा देईल ! “

“ ह्यो दुवा देन्याचा सवाल काय ? ‘ फकिरा मांग म्हणाला , ” दगडाला दगडाची गरज लागती आन् मी तर मानूस हाय ! ”

” अशी मानसं थोडी असतात . सत्तू म्हणाला , ” तुम्ही माझ्यावर उपकाराचा डोंगरच रचला हाय . आता माझी एक विनंती- “

” काय ? ” फकिरा हुंकारला आणि सत्तू म्हणाला , ” असंच तुमच्या मदतीला येन्याची मला संधी द्या . मी धावत येईन ! ‘ ‘ तो क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारणेवर बोट रोखून म्हणाला , “ ही , ही वारनाच वळवून तुमच्याकडे आनीन !

” फकिरा काहीच बोलला नाही. ते सर्वजण नांदगावच्या रोखानं चालू लागले . नांदगावच्या गावदरीला येताच पहिला कोंबडा आरवला . ते सर्व थांबले .तिथून फकिराची वाट फुटून वेगळी होत होती . फकिराला पुढं जायची घाई झाली होती आणि – सरीलं माझं दळण , घास घालीते शेवटला , आळविते, देवा , दे आवृक्ष संत्याबाला या गीताचे स्वर सत्तूच्या कानात घुमत होते . दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला .

फकिरा पुढं पश्चिमेकडं निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली . ढगांच्या पायघड्या तुडवीत तो पुढं पुढं येऊ लागला . शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकिराची पाठमोरी आकृती पाहत सत्तू उभा राहिला . मग तो गोंदा गोंधळ्याला म्हणाला ,

” रोज पहाटे आवुक्ष मागणारी बहीन असावी आणि भाऊ हा असा फकिरासारखा असावा ! सुदैवानं मला दोघंही आहेत . चला ! “

८ . कधी ना कधी घात होणार , या एकाच विचारानं राधाचं काळीज पोखरलं होतं . जखमी हृदयावर फकिराच्या त्या हालचालींच्या सारख्या जखमा होत होत्या . फकिरानं शांत बसावं , त्यानं कुठं जाऊ नये , त्याचे वैरी टपून बसले आहेत , ते केव्हा तरी डोकं वर काढतील , याचाच ती विचार करीत दिवस मोजीत होती .

फकिरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्याच दिवशी बाबरखान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला . गावातून त्याचं बोलावणं येण्यापूर्वीच मांगवाड्यात एकाएकी दंगल उडाली. आपापसात हाणामारी झाली. एकूणएक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकाला शब्दानं न दुखावणारे मांग आपसात लढले, हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबरखान चरफडला. कारण बाबरखानाबरोबर उमा चौघुलाही आला होता. सत्तूची सुटका फकिरानंच केली, असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूणएक माणूस जखमी झाला आहे, असं त्यानं बाबरखानाला सांगितलं होतं. त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठीच मुद्दाम बाबरखान आला होता. जो जो जखमी दिसेल, त्याला अटक करायची त्यानं तरतूद करून ठेवली होती.

परंतु साराच डाव उधळला गेला. आपसात मारामारी करून सर्व मांग जखमी झाले आणि बाबरखानाची निराशा झाली. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावणे करण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयालाच चावडीवर बोलावलं. त्यावेळी दोन फळ्या करूनच मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकिरा, तर दुसरीचा सावळा हा पुढारी होता आणि सर्वच जखमी होते .

चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुडगुडी ओढीत बसला होता. पाठीमागे” एक बंदूकधारी शिपाई उभा होता . बाबर गुडगुडीचे मंद झुरके मारून , तोंड एकदम पसरून धूर सोडीत होता . त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळे अधिकच रुंदावला होता . त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भुवया , सणसणीत मिश्या . लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यांमुळे त्याची भीती वाटत होती .

सावळा एकदम पुढं झाला . त्यानं आपला जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली .

चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील व इतर बडी मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेल्या सावळाकडे रागानं पाहत म्हणाला,

” काय रे , मी कसा दिसतो तुला ? खरं सांग .

‘ ‘ अस्वलावानी दिसता , सरकार . ” सावळा उत्तरला .

त्याचं ते उत्तर ऐकून डेरा चरकला . सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले .

” तुला माझी भीती वाटत नाही ? ” ” न्हाय, सरकार ! ” का वाटत नाही ? “

” मेल्यालं मेंढरू आगीला भीत नसतं , रावसाहेब ! “

” खरं आहे तुझं . ” बाबरखान म्हणाला , ” रात्री मारामारी का केली , रे ? “

” मी वाईच दारू घेतली , म्हनून फकिराला राग आला . त्येनं मला काठी मारली . मग झाली जुपी . ” सावळानं एका दमात सारं सांगून टाकलं .

बाबरखान पुढं काहीच बोलला नाही . त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही . दुपारी राहुटी उठवून तो रवाना झाला.

आणि नंतर राधाला समजलं , की ती मारामारी केवळ नाटक होतं . वारणेच्या काठी मळीला झालेल्या जखमा पाहून आपण अडकू , म्हणून फकिरानं मुद्दाम मारामारी केली होती . त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा बेचैन झाली .

गावातील आयाबाया राधाला सल्ला देत , ‘ फकिराचं लग्न करून टाक . सर्वांत मोठा उपाय हाच आहे . एकदाचं लग्न झालं , की हा सुतासारखा सरळ होऊन प्रपंच करू लागेल . ‘ पण ते राधाला पटत नव्हतं . कारण त्याच्या बापाचा राणोजीचा- इतिहास ती विसरली नव्हती . पेढ्याची पुडी कमरेत खोचून त्यानं जीव दिला होता . त्याचीच अवलाद ! त्याचं लग्न झालं काय , न झालं काय सारखंच .

पंधरा दिवस झाले आणि एके दिवशी चिंचणीकर पिराजी आला आणि राधाला म्हणाला ,

‘आक्का, तू बारा वर्स गाव सोडून कुठं गेली न्हाईस. एकदा चल चिंचणीला , हा चार दिस नि ये मग !

क्रमशः

स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading