फकिरा..
येणाराला थोपवीत होती . तायनू महारानं एकट्यानंच एक पांद रोखली होती . त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भुतासारखा भासत होता . त्याच्या ओरडण्यानं तो खोरा दरदरत होता .
कणगीतील धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पळत होती , परंतु पुढील मुख्य पादच गावकऱ्यांनी रोखल्यामुळं एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं . हे जेव्हा फकिराला उमजलं , तेव्हा तो पुढं आला . त्यानं खुणा करून आपली माणसं बाजूला काढली आणि मठकऱ्याची दावण कापून सर्व गुरं त्या पांदीत लोटली व एकदम गुरांच्या पिछाडीवर गोफणी सुरू केला . त्या चिंचोळ्या पांदीत त्या गुरांनी भयंकर धडधडाट केला . त्या जबर रेट्यानं गावचे गडी मागं सरू लागले आणि सारखा गोफणीचा मारा करीत फकिरानं वाट गाठली .
पूर्वेला तांबडं फुटलं होतं . दुष्काळानं पोळलेला मुलूख भकास भासत होता . झाडं कशी तरी उभी होती . वारा मात्र जोरात पळत होता . रोगटलेल्या करवंदी झिपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्याप्रमाणं दिसत होत्या . मात्र पूर्वेला जुनाच तजेला आला होता . रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभिली होती . सर्व काही शांत भासत होतं . भूमी दग्ध होती , तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता .
निवडुंगात डंग करकरत होते . पक्षी किलबिलत होते . गावात देवापुढं कर्णा वाजत होता . त्याचा दीर्घ नाद दूर दूर जाऊन भिडत होता . निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यांसारखी धान्याची रास लागली होती . चिल्लीपिल्ली बुट्या , पाट्या घेऊन ओळीनं बसली होती . जाणती पोरं चेकाळली होती . कैक दिवसात आज प्रथमच ती दाण्याला स्पर्श करणार होती . नुसत्या धान्याच्या दरवळानं कैकांची भूक मेली होती . जणू अमृतच तिथं अवतीर्ण झालं होतं .
मुरा , सहदेव , तायनू महार ते कर्ते पुरुष धान्य वाटीत होते . बुट्या पळत होत्या . मांगामहारांच्या घरात एक आगळा आनंद पैदा झाला होता . कित्येक दिवस निपचित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणं घरघरत होती . थंड चुलींना उबारा आला होता . किती तरी दिवसांनी आजच प्रथम तवे जाळ खाऊन तापत होते .
धान्य वाटून एक लहानसा ढीग उरला . तो भापानं वाटता येणार नाही , म्हणून मुरानं फकिराला विचारलं ,
” दाजी , ह्ये दानं कसं वाटावं ? “
“ एक दाना गैर वाटू नक्षा . ‘ फकिरा म्हणाला , ” डाव घ्या आनि डावीनं सारखं वाटा . एक दाना एका मानसाला एक दिवस जगवील , ह्ये इसरू नगा ! “
सर्व धान्य डावीनं वाटून झालं आणि सूर्य निवडुंगावर आला . तो दिवस महार – मांगांना सोन्याचा दिवस भासला . कोवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं ऊन ऊन भाकरी शांतपणे खात होती.
सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकिरानं कंबर सोडली आणि तलवार देव्हाऱ्यात उभी केली.
दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांतसाहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला. बाबरखानाच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकिराला वेढा देऊन अटक केली आणि एकूण एक महार – मांग कैद करूनच त्यानं चावडी गाठली. चावडीत तरुण व गाजलेल्यांना प्रथम बेड्या ठोकल्या. काहींची दावण लावली. मग माळेवाडीच्या मठकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लावण्याचं कार्य सुरू झालं. आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकिरा उभा होता ; मुरा , बळी , बहिरू , तायनू , घमांडी , सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या . झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्या पोलिसांनी चावडीत आणून त्यांचा ढीग लावला होता . चावडीपुढील अंगण कैद्यांनी व गावकऱ्यांनी फुलून निघालं होतं .
पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या . सर्वत्र संगिनी लखलखत होत्या . त्या गर्दीत बाबरखान आपलं प्रचंड पोट सावरीत शांतपणे वावरत होता . माळवाडीच्या मठकऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता . जेरबंद मांगमहाराकडं कुर्यात पाहात तो मिशीला पीळ भरीत होता .
फकिराच्या अटकेची बातमी समजताच विष्णुपंत धावतच आले . त्यांना पाहून गर्दी पांगली . लोकांनी भांग करून पंतांची वाट मोकळी करून दिली ; परंतु पंत चावडीची पायरी चढले नाहीत दारातच उभे राहिले . ते संतापानं थरथरत होते . सर्वत्र निःशब्दता निर्माण झाली . पंत बोलले – नव्हे , जवळजवळ ओरडले . त्यांचा राग शिगेला पोचला होता . लोक प्रांताच्या तोंडाकडे पाहू लागले . पंत म्हणाले ,
” साहेब , काय आरंभलं आहे हे ? ”
” आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे . ‘ ‘ प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावे नोंदीत उत्तरला आणि पंत एक पाय वरच्या पायरीवर ठेवीत म्हणाले ,
” आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत , हे मान्य आहे का आपणाला ? ”
” हो . मान्य आहे . ”
” मग आम्हांस न विचारता ही धरपकड कां केलीत ? ” विष्णुपंतांनी गावकामगाराचा नियम पुढं केला . त्यांचा स्वर वाढता निघाला नि प्रांतही चिडला . तो गुरकला ,
“ तसा आम्हांला अधिकार आहे आणि त्यांनी तर माळवाडीच्या त्या मठकऱ्याला धडधडीत लुटलं आहे . “
” परंतु त्याला काय पुरावा आहे ? ” पंतांनी पुराव्याची मागणी करूनत्याच्याकडे रोखून पाहिलं , तेव्हा चटकन प्रांत म्हणाला ,
” मठकऱ्याच्या धान्याचा माग या गावाच्या सीमेपर्यंत आला असून ह्या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडली आहे . ” असं म्हणून प्रांतसाहेबान आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखानं फिरवलं .
हे शब्द प्रांतानं सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे उच्चारले ; परंतु विष्णुपंत खवळून गरजले ,
” मग मला का अटक करत नाही तुम्ही ? कारण तो माग माझ्याही गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला या क्षणी भाकरी सापडेल !
” हातापायांची आग झाल्याप्रमाणं चुळबुळत पंतांनी चौफेर दृष्टी फेकली. तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावर स्थिरावल्या होत्या .
” मग तुम्हाला काय म्हणायचं आहे ? ” प्रांत कपाळावर आठ्या आणीत म्हणाला .
” स्पष्ट बोला ना , पंत- ”
” मग ऐका , तर- ‘ पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलल्यागत बोलू लागले , “ साहेब , हा माझा गाव दुष्काळानं चिरडून काढला असून इथं माणसं माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यातच साथीच्या रोगानं आक्रमण करून इथं घरच्या घरं बसवली आहेत . इथं मांग – महार कुत्र्याच्या मोतीनं मरत आहेत , हे सर्व मी तुम्हाला कळवलं होतं की नाही?
” ” खरं आहे , पुढं बोला ! ” प्रांत बाबरखानाकडे पाहत म्हणाला .
” मग मला उत्तर को दिलं नाही ? ” पंतांनी कडाडून विचारलं .
” उत्तर दिलं नाही , याचा अर्थ असा नव्हे , की लोकांनी अराजकता माजवावी , कायदा हाती घ्यावा , एखाद्याला लुटावं ! हे सर्व आम्हाला मान्य नाही ! ” प्रांतानं नाक फेंदारलं , त्याचा चेहरा लालबुंद झाला .
” मग काय मान्य आहे ? ” पंतही लालेलाल होऊन म्हणाले , ” लोकांनी कुत्र्याच्या मौतीनं मरावं ? त्यांनी तीन वाटेची माती खावी ? दहाच्या ऐवजी विसांनी एका गोरीत गाडून घ्यावे ? हे मला मान्य नाही , सरकार ! ”
” मग काय मान्य आहे तुम्हाला ? ” प्रांत पाय आपटीत खेकसला . त्याने चावडी डोकीवर घेतली . तो पंतावर बोट रोखून म्हणाला , ” काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे ? बेबंदशाही मान्य आहे ? ”
” याला उत्तर – होय ! ‘ पंत धीरगंभीरपणे उद्गारले .
” ठीक . करा लुटालूट . आम्ही आरोपींना घेऊन आताच साताऱ्यास जातो , ” प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि मग पंतही त्यात तालात म्हणाले ,
” ठीक . खुशाल जा ! पण लौकरच परत या ! ”
” का ? कशाला ? ‘ प्रांत गोंधळला .
” मला – विष्णुपंताला – अटक करायला ! ” पंतांनी निर्वाणीचं सांगून टाकलं .
” म्हणजे तुम्ही – तुम्ही स्वतः लुटालूट करणार ? ” प्रांतानं चमकून विचारलं .
पंतांनी उपरण्यानं कंबर बांधली , प्रांतावर आपली जळजळीत नजर रोखली नि मान उंचावून उत्तर दिलं .
” साहेब , जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही , तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मौतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल ; आणि मी कुत्र्याच्या मौतीनं मरणारा माणूस नाही , साहेब !
” विष्णुपंतांच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडीस आला . तो नरमाईनं म्हणाला ,
” मग आम्ही काय करावं , म्हणता ? “
” तुम्ही सरकार आहात . हा दुष्काळ निवारा ! ” पंत निर्भान होऊन म्हणाले , ” लोकांना मरणाच्या दाढेतून वाचवा . नाहीतर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हाला मारीत मरेल , हे विसरू नका !
पंत बोलत होते . लोक ऐकत होते . आपणच साहेबाशी बोलत आहोत , असं प्रत्येकाला वाटत होतं . प्रांत निरुत्तर झाला आहे , हे लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपरखळ्या द्यायला सुरुवात केली .
साहेब , हे लोक मढी नसून जिवंत माणसं आहेत . जो बैल चुचकारून चालत नाही , त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत . तलवार ह्यांच्यावर काबू करू शकत नाही . कारण तलवारी ह्यांनी फार चालवल्या आहेत .
” हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजी एकदम हसला आणि नम्र स्वरात म्णाला , ” आम्ही तुमचं वय नि दर्जा विचारात घेतला नाही , याबद्दल राग मानू नका . आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू आणि आम्ही सर्व आरोपींना मुक्त करतो !
” प्रांतानं असं म्हणताच पोलीस पुढं सरसावले . सर्वांच्या हातातील बेड्या निखळल्या . त्याबरोबर क्षणात चावडीपुढील ते अंगण हास्यानं नि आनंदानं भरलं . पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि प्रांताशेजारी खुर्चीवर शांतपणे बसले . फकिराच्या बेड्या निघताच त्यानं पंतांच्या पायांवर मुरकुंड दिली . शंकरराव पाटलानं आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवाळली . ‘ माणूस असावा , तर पंतासारखा असावा ‘, अशा कौतुकपूर्ण नजरेनं अभा गाव पंताकडे पाहत होता .
थोड्याव वेळात प्रांताचं बि – हाड साताऱ्याच्या वाटेला लागलं आणि ‘ पंतांनी मांगा – महारांच्या बेड्या तोडल्या , लेका ! ‘ असं म्हणत लोक घरोघर गेले .
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
