ग्रामदैवत आई कोळाईदेवीच्या नावावरून कोळगाव असे नाव पडले. दक्षिण वाहिनी असणाऱ्या महिदेश्वराच्या डोंगरामधून उगम पावणा – या पळसा नदीच्या तीरावर असणारे कोळगाव. याच गावात रयत शिक्षण संस्थेच्या श्री कोळाईदेवी विद्यालयाची १९५६ मध्ये स्थापना झाली.
श्री कोळाईदेवी विद्यालय सुरुवातीलाकोळाईदेवी मंदिरात भरविले जात होते. नागेश खंडेराव लगड यांनी विद्यालयास जमीन देणगी स्वरुपात दिली. आज या जागेत ४२ वर्गखोल्या असलेल्या तीन इमारती आहेत. त्यामध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा, २ संगणक खोल्या, ग्रंथालय अशा प्रकारच्या सुविधा आहेत. विद्यालयात ५ वी ते १२ अखेर १ हजार ५१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे चिखली, कोथूळ, घारगाव, ढोरजा, हिवरे, काळेवाडी, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव या गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुख्याध्यापक एम.एस. लगड यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरु आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षामध्ये विद्यालयात विविध कामे करण्यात आली. त्यामध्ये १८ वर्गखोल्या असलेली सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची दुमजली इमारत, १० लाख खर्चाचे मुलींचे स्वच्छथागृह, १५ लाख रुपयांचे वॉल कंपाऊंडची कामे सद्यस्थितीत सुरु आहेत.
विद्यालयाच्या महाराष्ट्र शासनाचा १ लक्ष १३ कोटी वृक्ष या उपक्रमाअंतर्गत १० ते १५ फुट उंचीच्या विविध वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. कारगिल युध्दातील शहिद जवान सचिन साके व भाऊसाहेब तळेकर यांच्या वीरमाताच्या हस्ते व तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या प्रेरणेतून वक्षारोपण करण्यात आले आहे. उपक्रम राबविण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वषानिमित्त माजी विद्यार्थी हितचिंतक व देणगीदारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी सुमारे ३५ लाख रुपयांची देणगी विद्यालयाला मिळाली.
इग्लंड, अमेरिका, दुबई, नेदरलँण्ड, ऑस्ट्रेलिया शाळेतील विद्यार्थी नोकरीनिमित्त आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, कलकत्ता, नाशिक अशा मोठ्या विविध शहरांमध्ये काम करत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त विद्यालयास ३ लाख रुपयांची भरीव देणगी दिली. भौतिक विकासाबरोबरच विद्यालयात गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले. गुरुकुल उपक्रमामध्ये सुमारे ४०० विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केले जाते . स्पोकन इंग्लिश हा विद्यालयात उपक्रम राबविला जातो. दहावी, बारावीचे उन्हाळी व हिवाळी वर्ग, तसेच दररोज जादा तास घेतले जातात. विद्यार्थ्यांचे वाढदिवस विद्यालयात साजरे केले जातात. यावेळी विद्यार्थी त्यांच्या कुवतीनुसार इमारत फंडास देणगी देतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक कार्यक्रमही दरवर्षी होतो. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून २ लाख रुपयांची देणगी मिळाली. कमर्वीर अण्णांच्या जयंतीनिमित्ताने काढेलेल्या मिरवणुकीचे नेतृत्व लेझीम व झांज पथकाने केले. या पथकाला १ लाख रुपयांचे देणगी मिळाली. ग्रामस्थांनी रोख देणगीबरोबर १०५ बेंच दिल्या.
शाळेच्या विकासासाठी प्राचार्य एम. एस. लगड, उपमुख्याध्यापक राजेंद्र जंगले, पर्यवेक्षक संतप मेरूकर यांनी परिश्रम घेतले.
शब्दांकन : योगेश चंदन, प्रतिनिधी, पुण्य नगरी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी सहकारी शिक्षक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प उभारणार आहे. सहा एकर जागेत भव्य शैक्षणिक संकुल उभारणार आहे. संकुल रयत परिवारासाठी दीपस्तंभ राहिल.एम.एस.लगड, प्राचार्य
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे.)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
