फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग २४).

फकिरा..

परंतु आठव्याच दिवशी गावात खळबळ माजली . उभा गाव चकित झाला . कारण एकदम साताऱ्याहून दोन हुकूम चावडीत येऊन थडकले होते . त्यापैकी एका हुकूमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं .

ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं . एक कर्ता , दयाळू नि दिलदार पाटील सरकारनं कमी केला , याबद्दल गाव चरफडला . नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यात शिगावच्या खोताचा हात नक्की असावा , असं जो तो म्हणू लागला . खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली असावी , असा सर्वांचा कयास झाला .

आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला , त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं . विष्णुपंतांनी ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती . त्यामुळं त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं . चावडीत आग धुमसत होती . रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून जणू बसले होते . ते जाणून होते की , शंकररावांची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे . आता लौकरच मांग – महारांवर नवं संकट नक्कीच येणार !

आणि ते खरंही होतं . रावसाहेब कामावर रुजू होताच त्यानं डोकीचं पागोटं फिरवलं . हातात फरशी कु – हाड घेतली . आपल्या आळीची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला .

” आता शंकररावाचं राज इसरा . आता रावसाहेब पाटील हाय . नीट वागा ! ‘ ‘ असं तो उघडउघड बोलू लागला . त्यानं फकिरासह कित्येकांवर करडी कमान धरली .

रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन एक महिना झाला होता . सूर्य वरती पळत होता . उन्हातली प्रखरता नरम होत होती . रावसाहेब चावडीत बसला होता . पलीकडे पंत शांतपणे आपलं काम करीत होते . पाटलाच्या सभोवती बसलेली त्याची मंडळी चकाट्या पिटीत होती . खिदळत होती . आन्या जाधव पाटलाच्या समोर बसला होता . तो गांजा ओढून तर्र झाला होता . त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती . त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या दोन बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्यावर झुगारीत होता . चार दिवसांपूर्वी पहिल्यानं नांदाय आलेल्या आपल्या बायकोच्या गुणाचं , स्वरूपाचं वर्णन करीत होता .

जाधवाची बायको देखणी आहे , असा गावात गवगवा झाला होता . तो पाटलानंही ऐकला होता . म्हणूनच पाटील कानात जीव आणून जान्याच्या बाता ऐकत होता . बोलता बोलता पंताकडे चोरट्या नजरेनं पाहत दबक्या आवाजात जान्या म्हणाला ,

“ पाटील , एवढी देखणी बायको मला मिळंल , असं वाटलं नव्हतं ; पर देवानंच मला ही केळीच्या खुटावानी बायकू दिली बघा ! “

” त्याचं असं झालं … ” रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला , ” त्यावेळी देवानं बी गांजा ओढला हुता . म्हनून त्यो केळीचा खूट बाभळीच्या खोडाच्या गळ्यात बांधला , बघ … ” असं म्हणून पाटील पोट धरून हसला . त्या बरोबर सर्वच मंडळी नि चावडी दणाणली . त्यासरशी पंतांच्या कपाळाची शीर सणाणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले , “

पाटील ! ही चावडी आहे . चव्हाटा नव्हे ! ”

हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला . त्याचा चेहरा खर्रकन उतरला ; पण लगेच त्याच्याही कपाळावर आठी उमटली आणि तो डोळे वटारून म्हणाला ,

” आनि पंत , मी पाटील हाय , डोंबारी न्हवं ! ‘

” मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा ! ” पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिसाट झाला .

तो मान उंचावून पंतांकडे पाहत म्हणाला ,

” आम्ही कसंबी वागू . तुम्ही आमास्नी सांगू नगासा ! ‘

” ते कसंबी वागणं घरात ! ” पंत पुढे पाहत , काम करीत उत्तरले , ” देऊळ ,

चावडी , धर्मशाळा हे ज्याला कळत नाही , त्यान पाटीलकीची हौस धरू नये ! ”

” ह्ये तुम्ही आमास्नी शिकवू नगा ! ” पाटील तावात येऊन म्हणाला , हौसेनं पाटील झालो न्हाय . हक्कानं- “

” मग पाटलासारखं वागा ! ‘ ‘ पंत गुरकले .

” पर तुमी मला दाब देनारं कोन ? ” पाटील गुडघेमेटी घेऊन बोलला आणि पंत म्हणाल ,

” मी विष्णुपंत कुळकर्णी आहे . नीट वागा , नाही तर मी तुम्हाला चार दिवसात सरळ करीन ! पाटीलकीची धुंदी चढू देऊ नका !

” हा गलबला ऐकून पेठेतील लोक चावडीपुढं जमले . लोकांनी पाटलाला विचारलं ,

” पाटील काय भानगड हाय ही ! “

” इचारा त्या पंतास्नीच ” , असं म्हणून पाटलानं मान फिरवली आणि पंत म्हणाले , ” हे पाटील ह्या चावडीचा कुंटणखाना करू पाहत आहेत-

” एवढ्यात सातारचा खास पोलीस एक नवा हुकुम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला . पंतांनी तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला .

त्या हुकमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना तीन वेळ हजेरी लावण्याचा अधिकार पोलीसपाटील आणि कुळकर्णी यांना दिला होता .

तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलाने ताडकन उडीच मारली . उशीर चावडीच्या खांबाला टेकून ऐकत बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाला ,

” ए लेका रामुशा , पेंगत काय बसलायस ? पळ — सारी मांगं म्होरं घालून ये , चलऽ !

” त्याबरोबर रामोशी पटका सावरीत मांगवाड्याकडे निघाला . पाटलानं विजयी मुद्रेनं वळून पंतांकडे पाहिलं , तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले . त्यांच्याकडे पाहत पाहतच पाटील पुन्हा ओरडला ,

” ए रामुशा , येताना त्या तायन्या म्हाराला बी आन !

” मध्यान्ह रात्र झाली होती . सारं चराचर अंधारात एकरूप झालं होतं . हूं का चू होत नव्हतं . निवडुंगात फक्त रातकिडे दीर्घ नाद काढून चिरकत होते ; परंतु त्यांच्या चिरकण्यानं ती भीषण शांतता भंगत नव्हती . उलट , ती रात्र प्रखर नि क्रूर आहे , याचीच जाणीव होत होती .

ती हजेरीची वेळ होती . फकिरा अंथरुणावर पडला होता . त्याला रात्रभर झोपच येत नव्हती . आज पंधरा दिवस तो रात्री डोळ्यात काढीत होता . त्या दिवशी त्याला हजेरी लागली , तो दिवस नि त्या दिवशीचा तो रावसाहेब पाटलाचा कुर्रा हे सर्व त्याच्या मस्तकातून हालता हलत नव्हतं .

आपण माणूस असून हा केवढा अन्याय आहे ! आपण तीन वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलानं घ्यायची ! जर आपण कुठं निघालो , तर पाटलाचा लेखी हुकूम घ्यायचा . तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीन आणि जरी दिला , तरी तो ज्या गावी आपण जाऊ , तिथल्या पाटलाला द्यायचा नि त्याला हजेरी द्यायची आणि यात काही कसूर झाली , तर तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा . नाही तर …

या विचारानं फकिराचं काळीज तुटत होतं . सरकारनं , खोतानं एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला आहे , असं त्याला सारखं वाटत होतं . आता आपण कुठंही जाऊ शकत नाही . आता आपले हातपाय आपले नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीत बांधले आहेत . आपल्या नाकात बैलाप्रमाणं ह्या कायद्यानं वेसण घातली असून , ती आपल्या वैऱ्याच्या हाती दिली आहे . आता पुढं मार्ग कोणता ? आपण यापुढं हेच जीणं जगायचं का ?

फकिरा तळमळत होता . अंधारात डोळे मिटून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचं कणखर मन त्याला उपदेश करीत होतं :

‘ कालपरवा तू इतर माणसासारखा होतास ; पण आता तू सरकारचा बंदी आहेस . तुझ्यावर आता पाटलाची हुकमत आहे . आता शंकरराव पाटील किंवा विष्णुपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत . कायद्यानं त्यांच्यावरही मात केली असून , त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे . म्हणून तर नांगरट्या रावसाहेब पाटील आज पंधरा दिवस भर मध्यान्ह रात्री तुझी हजेरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतः जाऊन ती देत आहे , पुन्हा दिवस बुडताना पाटलापुढं तुला उभं राहावं लागत आहे .

‘ ‘ मग मी काय करू ? ‘ फकिरा हृदयाच्या आतल्या आत कुणाला ऐकू न येईल , असा ओरडत होता . ‘ मी किती दिवस हजेरी द्यायची नि ती का द्यायची ? सरकारनं हवं तर येऊन आमची गर्दन मारावी , आम्हाला तुरुंगात डांबावं ; पण तसं न करता ही गुलामी का ? मी गुलाम नाही . मी सनदशीर शिपाई – रखवालदार आहे . माझा बाप माळाला – गावासाठी कटून मेला ? अन् मला तीन वेळा हजेरी ? मी हजेरी देणार नाही ! ‘ ‘

काय ? हजेरी देणार नाही मग तीन महिने तुरुंगात जा . पुन्हा ये नि पुन्हा हजेरी दे . नाही म्हणशील , तर तुरुंग … चक्र चालू …

‘ फकिराच्या डोकीत भयंकर वादळ उठलं . तो आतून पेटला . त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले . त्याच्या सभोवतीचं वातावरण दाहक झालं . तो चटकन उठला . शेजारीच सरू शांत निजली होती . तिच्या नाकातून निघणारे निःश्वास निर्भय ये – जा करीत होते . पलीकडे राधा निपचित पडली होती . म्हातारा दौलती , राहीबाई यांची हालचाल मुळीच जाणवत नव्हती . साधू दारापुढल्या मांडवात होता . गबऱ्या ताठ उभा राहून झोप घेत होता . केवळ झोपेसाठी जमिनीला पाठ लावायची नाही , हा आपला अस्सल घोड्याचा धर्म तो काटेकोर पाळीत होता .

फकिराला ते वातावरण असह्य झालं . तो कावराबावरा झाला . मग पुन्हा शांत होऊन तो अंथरूणावर पडला . त्यानं दोन्ही हातांची खोबरमिठी मानेखाली घातली आणि त्याच्या डोळ्यांपुढं विचारांची भुतं नाचू लागली .

त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढं तो दिवस उभा राहिला . ज्या दिवशी तो रामोशी आला आणि त्यानं चावडीवरचं बोलावणं सांगितले , तेव्हा सर्व मांग ओळीनं चावडीवर उभे झाले होते आणि पाटील हातात फरशी कु – हाड घेऊन सर्वांकडे करड्या नजरेनं पाहत होता . त्यावेळी फकिराही त्या गर्दीत उभा होता , पाटलानं सर्वांची नावं नोंदली आणि बजावून सांगितलं ;

“ आजपासनं साऱ्या मांगांनी अन् मांगांच्या नादाला लागलेल्या म्हारांनी हतं येऊन दोनदा हाजीर व्हायचं आणि म्या एकटा रातचं येऊन तुमास्नी उटवून हाजरी घ्यायची . जर का कुनी गैरहजर ऱ्हायला , तर बेड्या नि खडी … ”

क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading